
Nashik News : केंद्राने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लादल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये निर्माण झालेला रोष अद्याप शमण्याची चिन्हे नाहीत. राज्यात आजही काही ठिकाणी बाजार समित्यांतील कांद्याचे व्यवहार विस्कळीत राहिले. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी दरांत १०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण झाली. एकाही ठिकाणी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’चे प्रतिनिधी कांदा खरेदीसाठी उतरले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रालाही ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांनी धुडकावले. त्यामुळे पुन्हा नवा पेच निर्माण झाला असून, शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २५) काही ठिकाणी लिलाव झाले, तर काही ठिकाणी शुकशुकाट राहिला. नगरमध्ये ३०० ते ४०० रुपयांची घट वगळता सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत दर स्थिर राहिले.
‘‘केंद्राच्या सूचनांनुसार होणारी कांदा खरेदी शिवार खरेदी पद्धतीनेच होईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे नाशिक, नगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत खरेदी होत आहे. मात्र ही खरेदी बाजारात उतरून करणे शक्य नाही; त्यामुळे आम्ही आमच्या खरेदी केंद्रावरच ती करू. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांना बांधील आहोत,’’ असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना भेटून याबाबत खुलासा केला. मात्र अजूनही केंद्रांची नावे, पत्ता, खरेदी स्थिती याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही.
केंद्राने कांद्यासाठी प्रतिक्विंटल २४१० रुपये दर निश्चित केला आहे. मात्र या दराने काही केंद्रांवर खरेदी केली जात नाही. शेतकरी संघटनेचे बागलाण तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी हे मुंजवाड (ता. सटाणा) येथील ‘एनसीसीएफ’मार्फत इंडिजिनस ॲग्रोव्हेट प्रोड्यूसर कंपनीच्या राघव गोडाउन या खरेदी केंद्रावर कांदा विक्रीसाठी गेले. ‘‘आम्हाला दराबाबत केंद्राकडून असे कुठलेही आदेश आलेले नाहीत,’’ असे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. प्रत्यक्षात ठरलेल्या दराने खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात दरात झालेली घसरण व ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’चे प्रतिनिधी बाजार समितीत खरेदीसाठी न उतरल्याने अनेक ठिकाणी लिलाव बंद राहिले. यासंबंधी पालकमंत्री दादा भुसे यांनी शिष्टाई करत जिल्हाधिकारी व दोन्ही खरेदीदार प्रतिनिधींना बाजार समितीमध्ये खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खरेदी यंत्रणांना बाजार समिती आवारात खरेदीसाठी उतरण्याच्या सूचना केल्या. मात्र ते न उतरल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २४) कांद्याचे लिलाव बंद पाडले. हा पेचप्रसंग पाहून गुरुवारी पालकमंत्री भुसे यांनी शिष्टाई केली. जिल्हाधिकारी शर्मा, ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ प्रतिनिधींशी बोलणे केले. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नाफेड’ने बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, या संबंधीचे उशिराने पत्र काढले. बाजार समित्यांमध्ये ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरेदी करावी, असे कळविले. मात्र संबंधित खरेदीदार केंद्राला बांधिल आहेत. यापूर्वी खरेदी करार झाले असल्याने हे पत्र त्यांनी धुडकावून लावले. त्यातच दोन्ही मंत्र्यांच्या आदेशाची कार्यवाही न झाल्याने पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. २५) कांद्याचे व्यवहार सुरळीत सुरू राहिले. दरही काहीसे स्थिर राहिले. कांद्याला सरासरी १३०० रुपये इतका दर मिळाला. कांद्याची आवक १२ हजार ३७६ क्विंटल झाली. तर प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाला. कोल्हापूर येथील बाजार समितीत देखील भाव स्थिर राहिले. कांद्यास क्विंटलला किमान १००० ते कमाल २४०० रुपये इतका दर होता. येथे कांद्याची ७६०० पोती आवक झाली. ‘नाफेड’द्वारे प्रत्यक्ष सर्वच कांदा उत्पादकांना २४१० रुपये भाव मिळणार नसल्याचे पुढे आले आहे. फक्त उच्च प्रतीचा कांदा खरेदी केला जात आहे. तेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या कांद्याबाबत केंद्र सरकारने काय धोरण निश्चित केले आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी ‘बीआरएस’ नेते संजय पाटील यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी पंतप्रधान मोदी यांना ई-मेलद्वारे पाठविले.
केंद्राने कांद्यासाठी प्रतिक्विंटल २४१० रुपये दर निश्चित केला आहे. मात्र या दराने काही केंद्रांवर खरेदी केली जात नाही. शेतकरी संघटनेचे बागलाण तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी हे मुंजवाड (ता. सटाणा) येथील ‘एनसीसीएफ’मार्फत इंडिजिनस ॲग्रोव्हेट प्रोड्यूसर कंपनीच्या राघव गोडाउन या खरेदी केंद्रावर कांदा विक्रीसाठी गेले. ‘‘आम्हाला दराबाबत केंद्राकडून असे कुठलेही आदेश आलेले नाहीत,’’ असे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. प्रत्यक्षात ठरलेल्या दराने खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.