Alibag News : उंच वाढणारी सुपारीची झाडे वादळात उन्मळून पडतात. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीवरील ६० टक्के झाडे उन्मळून पडली होती. वीस वर्षांची मेहनत वाया गेल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्यातून रोठा सुपारीची उंचीने कमी असलेली, बुटकी जात विकसित केली जात आहे. श्रीवर्धनच्या प्रसिद्ध रोठा सुपारीच्या बागा आणि बागायतदारांना नवसंजीवनी देण्यासाठी रोठा सुपारीच्या नवीन बुटक्या जातीचा हातभार लागणार आहे.
रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग तालुक्यांत सुपारीचे पीक घेतले जाते. श्रीवर्धनची रोठा सुपारी जास्त उत्पन्न देणारी आहे; मात्र या सुपारीच्या झाडांची उंची सरासरी २२ फूट असते. वादळात ही झाडे उन्मळून पडतात. यावर उपाय म्हणून नव्याने रोठा सुपारीची कमी उंचीची जात विकसित करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर सुपारीची लागवड केली जाते. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ ते ४० कोटींची उलाढाल होत असते.
कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावून इतर कामांसाठीही जागा वापरता येते. जिल्ह्यातील भौगोलिक परिसर आणि हवामान सुपारीसाठी उपयुक्त आहे. चार वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्यातील सुपारी बागांना बसला. वादळामुळे जवळपास ६० टक्के सुपारीच्या बागा नष्ट झाल्या होत्या. भुईसपाट झालेल्या बागामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले इतकेच नव्हे तर श्रीवर्धन प्रसिद्ध रोठा सुपारीचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. रोठा सुपारीची नव्याने लागवड करण्यासाठी रोपांचीही कमतरता भासू लागली. बाहेरील रोपे आणून त्यांची लागवड करण्यास स्थानिक बागायतदार उत्सुक नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागा आणि सुपारी संशोधन केंद्राच्या रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून ती वितरित करावीत, अशी मागणी बागायतदारांची होती.
सुपारीच्या स्थानिक जातींची झाडे उंच वाढतात. त्यामुळे वादळात ती उन्मळून पडतात. शिवाय झाडे उंच असल्याने त्यांचे व्यवस्थापन किंवा काढणीची कामे त्रासदायक ठरतात. अशा वेळी रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बागायतदारांना अधिकाधिक उत्पन्न घेता येईल.
श्रीवर्धनची रोठा सुपारी जगप्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला मधूर असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांत निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने रोठा सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.