Sindhudurg News : जुलैमध्ये सलग २० दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सुपारी पिकाला बसला आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली असून बागांमध्ये फळांचा खच साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे सुपारी बागायतदार संकटात सापडले असून नुकसानीचे पंचनामे देखील केले जात नसल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, देवगड या किनारपट्टीच्या तालुक्यांसह कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्गात मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड आहे. नारळ बागांमध्ये आंतरपीक म्हणून देखील सुपारीची लागवड केली जाते. या भागातील सुपारीला दर देखील चांगला मिळतो.
मात्र गेली दोन, तीन वर्षे वातावरणातील बदलाचा सुपारीला फटका बसू लागला आहे. मागील दोन वर्षांप्रमाणे जिल्ह्यात या वर्षीदेखील सुपारी बागायतदारांना फळगळीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अर्धपरिपक्व झालेली हजारो फळे गळून पडत असल्याचे चित्र सुपारीच्या बागांमध्ये दिसून येत आहे.
जुलै महिन्यात २० पेक्षा अधिक दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे हे संकट उभे राहिले आहे. सुपारीच्या झाडांवरील सर्वच फळे गळून पडत असल्याने सुपारी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नुकसानीचे पंचनामेच केले जात नसल्याने बागायतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
मालवण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तर तालुका कृषी कार्यालयात जाऊन यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला आहे. सुपारीचे ८० टक्के नुकसान होऊन देखील पंचनामे केले जात नाहीत ही शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.