Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत, असे सोमवारी (ता. ३) पत्रकारपरिषदेत अजित पवार यांनी सांगितले खरे, परंतु प्रत्यक्षात शुक्रवारी (ता. ३०) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना हटवून अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावर नेमण्यात आल्याचे उघड झाले आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील नेत्यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला होता. पण या शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असल्याचे समोर आले आहे. ३० जून रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एक ठराव संमत करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यपदावर अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडे केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
विशेष म्हणजे सोमवारी (ता. ३) रोजी मंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण या प्रश्नावर तुम्ही शरद पवार यांना विसरलात का, असे उत्तर अजित पवार यांनी दिले होते. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असे अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. पक्षातून कोणाची हकालपट्टी करणार नाही, आपण बेरजेचे राजकारण करतो, अशी पुस्ती त्यांनी जोडली होती. परंतु निवडणुक आयोगाकडे केलेल्या याचिकेत मात्र शुक्रवारीच (ता. ३० जून) प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड केल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीतील बंडमुळे महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांनी रविवारी शपथ घेण्यापूर्वी दोन दिवस विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांची वेगवेगळी बैठक झाली. दोन्ही गटांकडून एकमेकांवर निशाणा साधण्यात आला.
दरम्यान, आता अजित पवार यांनी पूर्ण पक्षावरच दावा केल्याचे समोर आले आहे.
अजित पवार गटाकडून संपूर्ण पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर अजित पवार यांच्या गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.