Sharad Pawar Vs Ajit Pawar : भाजपचं हिंदुत्व विखारी आणि समाजात फुट पाडणारं; भाजपसोबत जाऊ शकत नाही... शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

Todays Rashtrawadi Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसतील अजित पवार यांच्या बंडाचे निशाण फडकावल्यानंतर शरद पवार यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या बैठकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रभर फिरून राष्ट्रवादीचे बंडखोर आणि भाजप विरोधात मैदानात उतरून संघर्ष करण्याचा नारा दिला.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Rashtrawadi Crisis : ‘भाजपचं हिंदुत्व विखारी असून समाजात फुट पाडणारे लोक राष्ट्रवादी असू शकत नाहीत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याची भूमिका आम्ही घेऊ शकत नाही. भाजपला सत्तेतून बाजूला करून राष्ट्रवादी कॉंग्रेसला शक्तिशाली बनवणे हाच आमचा एककलमी कार्यक्रम आहे,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बुधवारी (ता. ५) आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलेत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार महाराष्ट्रभर फिरणार; असा असणार दौरा?

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. अजित पवार यांनी बुधवारीच मुंबईत झालेल्या आपल्या गटाच्या बैठकीत शरद पवार यांच्यावर निशाणा साधत पक्ष शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपबरोबर जाण्यात काय गैर आहे, अशा शब्दांत सरकारमध्ये सहभागी होण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन केले होते. तसेच नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारमध्ये सहभाग घेतला तर महाराष्ट्रात वेगळा न्याय का, असा सवाल विचारला होता. तसेच शरद पवार यांनी १९७८ मध्ये भाजपचा पुर्वावतार असलेल्या जनसंघाला बरोबर घेऊन पुलोद सरकार स्थापन केले होते, तर आता भाजपला विरोध का, असाही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

शरद पवार यांनी अजित पवार, छगन भुजबळ आदींचे नाव न घेता त्यांचा शांत, संयत शब्दांत समाचार घेतला. भाजपबरोबर जाणे ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका असू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले, ‘‘शिवसेना आणि भाजपमध्ये मी फरक करतो. शिवसेनेचं हिंदुत्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारं आहे तर भाजपचं हिंदुत्व विखारी आहे. ते मनुवादी, विभाजनवादी, समाजात विद्वेष, तेढ वाढवणारं आहे. जिथे आपली सत्ता नाही तिथं दंगली घडवून आणून राजकीय फायदा उठवण्याची भाजपची भूमिका आहे. समाजात फुट पाडणाऱ्या अशा प्रवृत्तींसोबत आपण जाऊ शकत नाही.''

Sharad Pawar
Ajit Pawar Meeting LIVE : ८२ वय झालंय, आता तरी थांबणार की नाही? अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल

पुलोद सरकारमध्ये जनसंघ नव्हे तर जनता पक्ष होता. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला होता, याची आठवण शरद पवारांनी करून दिली. तसेच नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे, महाराष्ट्रासारखं ते सत्तेत जाऊन बसले नाहीत. शिवाय नागालॅंड हे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेले ईशान्येकडील संवेदनशील राज्य आहे. तेथील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, असे पवार यांनी सांगितले.

आज देशात महागाई, बेकारी, महिलांची सुरक्षितता आदी प्रश्न गंभीर झाले असून राज्यकर्ते त्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. त्यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीमध्ये बंड करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गटाकडून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार, आमदार-खासदार आणि राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com