कसमादे पट्टयात पावसामुळे कांदा पिकाला फटका

नजर लागावी तशी कांदाभावात घसरण झाली. पावसामुळे कांद्याची रोपे व पीक खराब झाले. टोमॅटोला भाव नाही. डाळिंबाने निराशा केली. सापशिडीच्या खेळाप्रमाणे शेतकरी पुन्हा खाली घसरला आहे. - बापू चव्हाण, वरवंडी, ता. देवळा, जि. नाशिक.
कांदा पिकांचे नुकसान
कांदा पिकांचे नुकसान
Published on
Updated on

देवळा, जि. नाशिक : येथील देवळा- चांदवडसह कसमादे पट्ट्यातील बहुतांश भागात परतीच्या पावसाने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित केल्या असल्या, तरी शेतांमधील कांद्याचे रोप व पीक मरू लागले आहे. यामुळे त्याचे प्रमाण विरळ झाले असून, उत्पादनक्षमतेत कमालीची घट होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय चाळींत साठवलेला उन्हाळी कांदाही प्रतिकूल वातावरणामुळे खराब होऊ लागल्याने शेतकरीवर्गात चिंता आहे.

परिसरात महिनाभर पावसाने पाठ फिरवली होती; परंतु पितृपक्ष सुरू झाला आणि पावसाने जो धडाका लावला तो दररोज बरसू लागला. यामुळे एकीकडे पाऊस पडल्याचा आनंद, तर दुसरीकडे हे असे नुकसान यामुळे शेती करावी तरी कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. थोडे बरे दिवस आले असे वाटत असतानाच अशी आस्मानी, तर कधी सुलतानी संकटांची मालिका कायम आहे.

पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके घेता येणे शक्‍य होणार आहे. पण उन्हाळ कांद्यासाठी टाकलेले उळे व पोळ्यादरम्यान लावलेले कांदापीक सडून खराब झाले आहे. याशिवाय जो कांदा आपल्याला पैसा मिळवून देईल अशी आशा होती तो चाळीतील कांदाही आता काही भागात खराब होऊ लागला आहे.

कांद्याला चांगले दिवस आल्याने शेतकऱ्यांनी सध्या कांदापिकावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या अशा प्रतिकूल स्थितीमुळे कांदा खराब होऊ लागल्याने आगामी काळात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नवीन कांदा बाजारात भाव खाणार असला, तरी त्याची उत्पादनक्षमता घटणार आहे. यावर पर्याय म्हणून काहींनी पुन्हा काळे उळे टाकले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com