

यवतमाळ : कापसाचे माहेरघर, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा, कॉटन सिटी अशी बिरुदावली जिल्ह्याला प्राप्त झाली. मात्र, जिल्ह्यातील नेत्यांची उदासीनता, शासनाचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांचा अपुरा पाठपुरावा, उद्योजकांचा अनुत्साह, राजकारण करण्यासाठीच असलेल्या सूतगिरण्या यात शेतकरी भरडला जात आहे. कापूस उत्पादन जिल्ह्यात आणि धागानिर्मिती मात्र परजिल्ह्यात, अशी स्थिती दिसून येत आहे.
सूतगिरण्या राजकारणासाठी
कापसाचे उत्पादन होत असल्याने जिल्ह्यातील नेत्यांनी व्यापक विचार करून चार सहकारी तत्त्वावर सूतगिरण्यांची उभारणी केली. मात्र, याठिकाणी सूत तयार करण्याऐवजी राजकारण जास्त होत आहे. जिल्ह्यात प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी (यवतमाळ), बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सूत गिरणी (महागाव) सुरू आहे. तरीही शेतकरी सहकारी सूतगिरणी (बोरी अरब, ता. दारव्हा), इंदिरा सहकारी सूतगिरणीत (वणी), एक बंडलही सूत तयार झाले नाही. त्यामुळे केवळ राजकारण करून सत्ता मिळण्यासाठी सूतगिरण्या उरल्या आहेत.
जिल्ह्यात कापसावर आधारित टेक्स्टाईल पार्क व्हावे, यासाठी भाषणात मुद्दे आहेत. मात्र प्रत्यक्षात काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हमीभाव कमी
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालास रास्त व किफायतशीर भाव मिळण्यासाठी कापूस खरेदी योजना सन १९७२ पासून राबविण्यात येत होती. २००७-८ च्या हंगामापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कापसाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी राज्यशासन व केंद्रशासनाने हमीभाव जाहीर केला. त्यानुसार कापसाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हमीभाव कमी असल्याने व्यापारीही जास्त दराने कापूस खरेदी करत नसल्याची स्थिती आहे.
सहकारी जिनिंग अवसायनात
जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर २४ जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था आहेत. मात्र, यातील काही ठिकाणी जिनिंग, तर काही ठिकाणी प्रेसिंगची सुविधा असल्याने या सहकारी सूतगिरण्यांना मरगळ आली आहे. गिरण्यांवर लाखो रुपयांचे कर्ज आणि अत्याधुनिक सुविधा नसल्याने अनेक जिनिंग प्रेसिंग अवसायनात निघाल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.