
पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. मात्र, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसल्याने धरणांतील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
सध्या १२ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर चार धरणे शंभर टक्के भरली आहेत. बुधवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण १६०.६० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यात उजनी धरणातील पाणीसाठ्याचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात चालू महिन्यात तीन ऑगस्टपासून बहुतांशी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे पश्चिम भागात अनेक ठिकाणी मुसळधार तर पूर्व भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. बुधवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कासारसाई, मुळशी, कळमोडी, आंध्रा, वडीवळे, गुंजवणी, वीर, नाझरे, वडज, चिल्हेवाडी या १२ धरणांतून पाण्याचा विसर्ग मुळा व भीमा, कऱ्हा, नीरा, मुठा, पवना, आरळा, इंद्रायणी नदीत सोडण्यात आला होता. त्यामुळे नद्या काही प्रमाणात दुथडी भरून वाहत होत्या.
गेल्या दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांतील पाणीसाठा वाढत आहे. सध्या धरणे तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सोडण्यात आला आहे. पानशेत, कळमोडी, आंध्रा, नाझरे ही धरणे १०० टक्के तर खडकवासला, वरसगाव, कासारसाई, मुळशी, वडीवळे, शेटफळ, गुंजवणी, भाटघर, नीरा देवधर, वीर, येडगाव, वडज ही धरणे ८० ते ९९ टक्के दरम्यान भरली आहेत. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी, भामा आसखेड, चासकमान, पवना आणि टेमघर या धरणांत ६५ टक्केपेक्षा अधिक भरली आहेत.
धरण पाणलोट क्षेत्रनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये ः टेमघर ४०, वरसगाव २५, पानशेत २६, खडकवासला ६, पवना २४, कासारसाई ६, मुळशी ३३, कळमोडी २१, चासकमान ३, भामआसखेड १२, आंध्रा १२, वडीवळे ३४, गुंजवणी ४७, भाटघर ११, नीरा देवघर ३६, वीर १, पिंपळगाव जोगे ५, माणिकडोह ६, वडज २, डिंभे ११, चिल्हेवाडी ३, विसापूर १, उजनी ६.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.