दत्त कारखान्याचा एकरी २०० टन ऊस उत्पादन कार्यक्रम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

 कोल्हापूर : एकरी दीडशे टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य केलेल्या शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने शुक्रवारी (ता. ४) एकरी २०० टन ऊस उत्पादनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. इतके मोठे लक्ष्य ठेऊन सूत्रबद्ध कार्य करणारा हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी याबाबत झालेल्या मेळाव्यात ही घोषणा केली.  'झेप एकरी २०० टनाचा दत्त पॅटर्न' या नावाने ही योजना राबविण्यात येईल.

या कार्यक्रमात २२५ शेतकरी सहभागी झाले आहेत. २५० एकर क्षेत्रावर जूनपासून या नियोजनबद्ध मशागत करून ऊस लागवडी करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या हंगामात एकरी दोनशे टन उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यांना माती, पाणी परीक्षणासारख्या सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.

सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी हा कार्यक्रम राबविण्यासाठी विविध शास्त्रज्ञ, कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक सूत्रबद्ध कार्यक्रम आखला आहे. या मध्ये पूर्व मशागतीपासूनच शेतकऱ्यांना कार्यक्रम आखून दिला आहे. यामध्ये पूर्वीच्या उसाचे पाचट ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने बारीक करून नांगरटीद्वारे गाडणे, सब सॉयलरचा वापर, दुसरी नांगरट करणे, सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर, रोटर मारणे, सरी सोडणे, हिरवळीचे खत, सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान प्रमाणे ऊस रोपे निर्मिती, एकात्मिक खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड - रोग नियंत्रण, आदींसह अपेक्षित एकरी खर्चाचा तक्ता तयार करण्यात आला आहे.

यामध्ये ऊस रोप लागवड संख्या, सरासरी फुटवे, एकूण ऊस संख्या, अपेक्षित फुटव्यात मर संख्या, अपेक्षित गाळप योग्य तयार झालेली ऊस संख्या, अपेक्षित उसाचे वजन, अपेक्षित एकरी सरासरी उत्पादन आदी बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत.

सेंद्रिय कर्ब वाढविण्याला प्राधान्य ही झेप घेण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचे आहे. जमिनीची सुपीकता महत्त्वाची असल्याने कारखान्यातर्फे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. कारखान्याने सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम नुकताच यशस्वी केला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी २०० टनांपर्यंत उत्पादन नक्की घेऊ शकतील असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी व्‍यक्‍त केला. 

दर आठवड्याला चर्चासत्र या कार्यक्रमाबाबत प्रत्येक आठवड्याला चर्चासत्र होणार आहेत प्रत्येक घटकावर ही चर्चासत्रे होतील. कारखान्याच्या अधिकाऱ्यांबरोबर अध्यक्ष श्री. पाटील ही यात सहभागी होणार आहेत. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह प्रयोगशाळा व्यवस्थापनाचा या चर्चासत्रात सहभाग असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com