सोयाबीन, सोयातेलाच्या सुलभ व्यवहारांसाठी ‘सोयाडेक्स’

‘एनसीडीईएक्स’ने मंगळवारी (ता. ३१) सोयाबीन आणि सोयातेलचा समावेश असलेल्या ‘सोयाडेक्स’ या दुसऱ्या प्रवर्गीय कृषी निर्देशांकला प्रारंभ केला.
सोयाबीन, सोयातेलाच्या सुलभ व्यवहारांसाठी ‘सोयाडेक्स’ Soybean, Soyadex for Easy Soybean Transactions
सोयाबीन, सोयातेलाच्या सुलभ व्यवहारांसाठी ‘सोयाडेक्स’ Soybean, Soyadex for Easy Soybean Transactions
Published on: 
Updated on: 

मुंबई : ‘एनसीडीईएक्स’ने मंगळवारी (ता. ३१) सोयाबीन आणि सोयातेलचा समावेश असलेल्या ‘सोयाडेक्स’ या दुसऱ्या प्रवर्गीय कृषी निर्देशांकला प्रारंभ केला. या कृषी निर्देशांकात सोयाबीन आणि रिफाइंड सोया तेलाचा वाटा अनुक्रमे ६७.९२ टक्के आणि ३२.०८ टक्के असेल. ‘सोयाडेक्स’ वायदा हे एक रोख-सेटलमेंट प्रकारचे करार आहेत. यातून एकाच व्यवहारातून दोन जिन्नसांमध्ये गुंतवणूक किंवा व्यापार करण्याची संधी मिळते.  भारतात दर वर्षी १०० ते १२० लाख टन सोयाबीनचे उत्पादन होते. त्यापैकी तब्बल ७० ते ७५ टक्के उत्पादन मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये होते. भारत सोयातेलाचा प्रमुख आयातदार आणि सोयापेंडीचा निर्यातदार आहे. ‘एनसीडीईएक्स’ने मंगळवारी अधिकृतरीत्या ‘सोयाडेक्स’ला प्रारंभ केला असून, सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठीचे वायदे करार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  ‘एनसीडीईएक्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण रास्ते म्हणाले, की सोयडेक्स हा सोयाबीन आणि शुद्ध सोयातेल या दोन वस्तूंच्या किमतींवर आधरित प्रवर्गीय निर्देशांक असून, या दोन्ही वस्तूंच्या वायद्यांच्या किमतीनुसारच सोयाडेक्सच्या किमतीत बदल होईल. या निर्देशांकात सोयाबीन आणि रिफाइंड सोया तेलाचा वाटा अनुक्रमे ६७.९२ टक्के आणि ३२.०८ टक्के असेल.

‘सोयाडेक्स’चे फायदे सोयडेक्समध्ये सोयाबीन आणि सोयातेल या दोन कमॉडिटीजचे एकत्रीकरण केल्यामुळे गुंतवणूकदारांना केवळ एकाच वायद्याद्वारे दोन्ही कमोडिटीजमध्ये व्यवहाराची संधी मिळते. सोयडेक्सची किंमत ही सोयाबीन आणि सोयातेल या दोन्ही वायद्यांच्या किमतींनुसार बदलत राहील. सोप्या भाषेत सांगायचे तर एक कॉन्ट्रॅक्ट खरेदी केल्यास सोयाबीन फ्यूचर्स आणि सोयातेल फ्यूचर्समध्ये ६७.९२ः३२.०८ प्रमाणात हक्क मिळतो. सोयाबीनपासून तेल आणि पेंड करणाऱ्या उद्योगाला कच्चा माल म्हणून सोयाबीन आणि तयार माल म्हणून सोयातेल या दोन्ही पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची किंमत जोखीम असते. त्याच्यासाठी दोन वेगवेगळे व्यवहार करण्यापेक्षा आपल्या उद्योगाच्या स्वरूपानुसार सोयडेक्स अधिक परिणामकारक होऊ शकेल. सोयडेक्सच्या व्यवहारामध्ये द्यावे लागणारे अत्यंत कमी मार्जिन हा महत्त्वाचा फायदा आहे. सोयाबीन आणि सोयातेल वायद्यामध्ये सुरुवातीचे मार्जिन आणि त्यानंतर वायदा समाप्तीपर्यंत परिस्थितीनुसार द्यावी लागणारी इतर मार्जिन्स ही बदलत राहतात. त्यामुळे अधिक भांडवलाची गरज लागत असते. परंतु सोयडेक्सवरील मार्जिन सुरुवातीपासून वायद्याच्या समाप्तीपर्यंत १० टक्के एवढेच राहील. हे वायदे कॅश-सेटल्ड असेल. म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट समाप्तीच्या वेळी जो काही नफा किंवा तोटा असेल त्याचा हिशेब रोखीने होईल. डिलिव्हरीची तरतूद या कॉन्ट्रॅक्टमध्ये नसल्यामुळे यात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदार, शेतकरी कंपन्या किंवा व्यापार उद्योगांना सोयाबीन आणि सोयातेलमधील किंमत जोखीम व्यवस्थापन करताना डिलिव्हरी घेण्याची गरज नाही.

प्रतिक्रिया ‘सोयाडेक्स’चा प्रारंभ योग्य वेळी झाला आहे. कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबिया आणि खाद्यतेलाच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. देशात सोयाबीनचे नवीन उत्पादन पुढील काही दिवसांत सुरू होईल. अशावेळी व्यापारी, शेतकरी आणि गुंतवणूकदार यांना बाजारातील जोखीम व्यवस्थापनासाठी योग्य साधनाची अवश्यकता होती.  -अरुण रास्ते, व्यवस्थापकीय संचालक  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एनसीडीईएक्स

प्रतिक्रिया रोख-सेटलमेंट असल्याने सोयाडेक्सला मोठा प्रतिसाद मिळेल. सोयाडेक्सच्या माध्यमातून एनसीडीईएक्सने व्यापाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. सोयाडेक्स हे सोयाबीन आणि सोयातेल यांच्या व्यवहारात समाविष्ट घटकांसाठी जोखीम व्यवस्थपनाचे काम करेल. - कपिल देव, मुख्य व्यवसाय अधिकारी, एनसीडीईएक्स

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.