जळगाव : दुधाळ व इतर पशुधनासाठी कोरड्या चाऱ्यांमध्ये ज्वारी, बाजरीच्या कडब्याची मागणी आहे. परंतु, कडबा उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. दर तेजीत आहेत. परंतु, शेतकऱ्यांकडे या तेजीचा लाभ घेण्यासाठी कडबाच पुरेसा नसल्याची स्थिती आहे.
अतिपावसात खानदेशात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडदाचे नुकसान अधिक झाले. ज्वारीचा कडबा दुधाळ व इतर पशुधनासाठी लाभदायी किंवा सकस मानला जातो. त्याची खरेदी-विक्री खानदेशात दिवाळीनंतर किंवा डिसेंबरमध्ये अधिक होत असते.
मध्य प्रदेश, धुळे, जळगाव, बुलडाणा या भागात कडब्याचे व्यवहार होतात. अनेकदा कडब्याच्या परजिल्ह्यातील विक्रीला आळा घालण्याची मागणी केली जाते. परंतु, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ज्वारी, बाजरीचा कडबा पुरेसा उपलब्ध नाही. कडब्याचे दर सध्या प्रतिशेकडा तीन हजार रुपये एवढे आहेत. परंतु, कडबाच कुठे उपलब्ध नाही. मका पीक अतिपावसात हाती आले. पण, मक्याचा चाराही काळवंडला. त्याचा दर्जा खराब झाला.
या चाऱ्यास दुधाळ पशुधनासाठी उठाव नाही. कडब्यासाठी जळगावमधील पाचोरा, रावेर, यावल, चोपडा, जामनेर, नंदुरबारमधील नंदुरबार, धुळ्यात धुळे, शिरपूर भागात अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरीची पेरणी केली.
चाराटंचाई नसल्याचा ‘पशुसंवर्धन’चा दावा
चाराटंचाई कुठेही नाही, असा दावा पशुसंवर्धन विभाग करीत आहे. पण कोरडा चारा कुठेही उपलब्ध नाही. सोयाबीन, उडीद, मुगाची काडही अतिपावसात उपलब्ध झालेली नाहीत. तूर पीक कमी असल्याने मळणीनंतर मिळणारा तुरीचा भुसाही फारसा उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे.
माळरानातील हिरवे व कोरडे गवतही संपले आहे. केळी, उसाच्या भागात केळीचे फुटवे, कंद यांचा पशुधनासाठी उपयोग होत आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे, त्या शेतकऱ्यांनी मका व इतर संकरित गवताची लागवड कमी अधिक प्रमाणात केली आहे. परंतु चाराटंचाई मात्र जाणवू लागली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.