‘आॅक्टोबर हीट’चा जळगावला तडाखा

‘आॅक्टोबर हीट’चा जळगावला तडाखा
‘आॅक्टोबर हीट’चा जळगावला तडाखा
Published on
Updated on

पुणे : कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र उघडीप असल्याने तापमानाचा पारा ३५ अशांच्या वर सरकला आहे. राज्याला ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत असून, रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  कोकण पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जवळपास आठवडाभरापासून वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. सकाळपासून उन्हाचा चटक्यामुळे उकाडा वाढून दुपारी ढग गोळा होत, सायंकाळी आणि रात्री जोरदार सरी कोसळत आहेत. तर उर्वरीत महाराष्ट्रात मुख्यत: कोरडे हवामान असल्याने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. जळगावसह, बीड, मालेगाव, अकोला येथे तापमान ३६ अंशांवर, तर सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले अाहे.

कर्नाटकच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. या भागात शनिवारपर्यंत (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, त्याची तीव्रता वाढणार आहे. यातच नैऋत्य बंगालच्या उपसागरापासून पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. बुधवारपासून (ता.३) दक्षिण काेकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  रविवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३१.६, महाबळेश्‍वर २५.७, मालेगाव ३६.०, नाशिक ३२.५, सांगली ३१.०, सातारा ३१.७, सोलापूर ३५.८, सांताक्रुज ३२.२, अलिबाग ३१.६, रत्नागिरी ३३.५, डहाणू ३२.४, आैरंगाबाद ३४.४, परभणी ३५.४, नांदेड ३४.०, बीड ३६.४, अकोला ३५.९, अमरावती ३४.६, बुलडाणा ३१.१, ब्रह्मपुरी ३५.५, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३४.०, नागपूर ३५.२, वर्धा ३५.०, यवतमाळ ३५.५. रविवार (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) :  कोकण : मालगुंड २५, तरवल ३७, पाली २६, तुलासणी ३१, म्हाबळे ३२, राजापूर ५६, कोंडेया ४१, कुंभवडे २८, पाचळ २०, शिरगाव २७, पाटगाव २४.  मध्य महाराष्ट्र : अंबवणे २३, कुडे ३२, कडूस ३४, निंबार्गी २०, विंचूर ३४. माॅन्सूनची आणखी माघार शक्य नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) शनिवारी (ता. २९) परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. पश्‍चिम राजस्थान, कच्छचा काही भाग, उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २) राजस्थानचा उर्वरीत भाग, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले अाहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com