कापूस खरेदी कधी करणार? म्हणणे मांडाः औरंगाबाद खंडपीठ

राज्य शासन आणि कापूस पणन महासंघाला कापूस खरेदी कधी करणार, आदीसंदर्भात म्हणणे मांडण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
कापूस खरेदी कधी करणार? म्हणणे मांडाः औरंगाबाद खंडपीठ
कापूस खरेदी कधी करणार? म्हणणे मांडाः औरंगाबाद खंडपीठ
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद : राज्य शासन आणि कापूस पणन महासंघाला कापूस खरेदी कधी करणार, आदीसंदर्भात म्हणणे मांडण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती आर.जी.अवचट यांनी यांसदर्भातील याचिकेवर १६ जून रोजी सुनावणी ठेवली आहे.  राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला कापूस १२ जूनपर्यंत खरेदी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ५ जूनला राज्य शासन व पणन यांना दिला होता. संबंधित याचिका शुक्रवारी (ता. १२) सुनावणीस आली. या वेळी सरकारी वकिलांनी, संबंधित याचिकाकर्त्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे याचिका निकाली काढण्याची विनंती केली. याचिकाकर्त्याच्या वकिलांतर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्‍न नसून, राज्यभरातील खरेदी शिल्लक राहिलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या आहे. अजूनही बहुतांश कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरच उपलब्ध नसून, कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना दोन-तीन दिवस रांगेत थांबावे लागत आहे. शेतकऱ्यांची अन्न, पाण्याची सोय नाही, तसेच कापूस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अतिरिक्त भाडे द्यावे लागत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या वेळी खंडपीठाने राज्य शासन आणि कापूस पणन महासंघाला कापूस खरेदी कधी करणार आदीसंदर्भात आपले म्हणणे १६ जूनला मांडण्याचे आदेश दिले.    अशी करता येईल शेतकऱ्यांना तक्रार  शेतकऱ्यांना कापूस खरेदीसंदर्भात असणाऱ्या तक्रारी नोंदविण्यासाठी खंडपीठाने मुभा दिली आहे. तक्रार अर्ज करताना पीआयएल एसटी नं १०६४९/२०२० या याचिकेचा संदर्भ देऊन सातबारा (असेल तर टोकनची प्रत) आदी कागदपत्रे खंडपीठाच्या hcaur.db@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. 

काय होती याचिका?  परभणी येथील काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नाव नोंदवले नसल्याने अशा शेतकऱ्यांचा कापूस बाजार समितीने खरेदी करू नये, असे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, परभणी यांनी दिले होते. शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. विशांत कदम यांच्या वतीने याचिका दाखल करून जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाला आव्हान दिले होते. सरकारतर्फे ॲड. डी. आर. काळे यांनी बाजू मांडली. कापूस पणन महासंघातर्फे ॲड. एस. टी. शेळके यांनी बाजू मांडली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.