

वर्धा : पावसाने ओढ दिल्याने आधीच अडचणीत आलेल्या सोयाबीन उत्पादकांसमोर खोडमाशी नियंत्रणाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. सेल्सुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात सुमारे २५ टक्के सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.
कृषी विभागाने ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची लागवड करू नये असे आवाहन केले होते त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. वर्धा जिल्ह्यातील काही भागात लागवडीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यात सोयाबीन पीक सध्या अंकुरण होऊन सुमारे पंधरा ते वीस दिवस झाले आहे. काही भागात पाच ते सहा इंचापेक्षा जास्त याप्रमाणे पिकाची वाढ झाली आहे. असे असले तरी पंधरा ते वीस दिवस असा अंकुरण कालावधी झालेले पीक सध्या अचानक पिवळे पडत आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला.
शेतकऱ्यांच्या या संदर्भाने तक्रारी वाढल्याने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी जिल्ह्यात विशेष सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २५ टक्के सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा विचार केल्यास वर्धा सेलू व देवळी तालुक्यातील सोयाबीन पिकावर खोडमाशीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे दिसून आले आहे. या तालुक्यात ३० ते ३५ टक्के तर हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर तालुक्यातील सोयाबीन पिकावर १५ ते २० टक्के प्रादुर्भाव झाल्याचे देखील सर्वेक्षणात पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांनी योग्य खबरदारी घेत तज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययोजनांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक नुकसान पातळी नुसार लेबल क्लेम असलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. प्रतिक्रया खोडमाशीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून आला आहे. पीक १० ते १२ दिवसांचे असताना पाणी पिवळी पडतात. अशा शेतातील सात ते आठ झाडे उपटून खालच्या बाजूस उभा चिरा मारल्यास किडीमुळे झालेले नुकसान दिसून येते. पाणी पिवळे असल्याने शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांची कमतरता आहे असे वाटते. त्यानुसार ते उपाययोजना करतात. परंतु खोडमाशीमुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा थांबत असल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडतात. शेतकऱ्यांनी सापळे व शिफारशीत कीडनाशकांचा वापर करून प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी नियंत्रण मिळविले पाहिजे. - डॉ. प्रशांत उंबरकार, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रा सेलसुरा, वर्धा जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. काही भागात त्यावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानुसार शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविल्या आहेत. अनुदानावर कीडनाशकांचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता मागणी नोंदविली आहे. - अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.