

पुणे : मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अंदमानात मॉन्सून दाखल झाल्यानंतर शनिवारी (ता. २२) बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने मॉन्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर ‘तौत्के’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर आणखी एक चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने येत्या बुधवारी (ता. २६) आणि गुरुवारी (ता.२७) चक्रीवादळ पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. हे चक्रीवादळ तीन दिवस असण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे.
हवामान विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे. बुधवारपर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये मंगळवारपासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असताना बंगालच्या उपसागरात व अंदमान सागरात ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहू शकतात. ते बंगालच्या खाडीपर्यंत येईपर्यंत ताशी ७० किमीची वेग पकडू शकतात. या चक्रीवादळाच्या संभाव्यतेमुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रीवादळ येऊन गेले. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या वादळापेक्षाही याची तीव्रता जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल आणि ओडिशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. नुकत्याच आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे, त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.