नगर ः दुधाचे दर आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांबाबतचे धोरण ठरवण्याचे अधिकार दुग्धविकास मंत्री, शासनाच्या हातात राहिले नसून याबाबतचे धोरण खासगी दूध संघातील प्रमुख लोक ठरवत आहेत. दुग्धविकास मंत्रालय हे निष्क्रिय असून, दुग्धविकासमंत्री बड्या नेत्यांच्या हातचे बाहुले आहे, असा आरोप किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला.
तरुण, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध धंद्यात गुंतलेल्या मोठ्या नेत्यांच्या, खासगी दूध संघाच्या विरोधात लढा देण्यासाठी उतरावे लागले. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर येणार नाहीत, तोपर्यंत लूट सुरूच राहील, असे डॉ. नवले म्हणाले.
दूधदराच्या प्रश्नावर मंत्रालयात चर्चा होऊन एक महिना झाला, परंतु त्यावर अजून काहीच निर्णय झाला नाही. याबाबत दूध उत्पादक शेतकरी विचारत असल्याचे सांगत बुधवारी (ता. २१) किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली. डॉ. नवले म्हणाले, की ऊठसूट आंदोलन करतात, आम्हाला काम करण्याची संधी दिली जात नाही असा आमच्यावर आरोप होतो, म्हणून महिनाभर संयम ठेवला. मात्र मंत्रालयातील बैठकीनंतरही खासगी दूध संघाच्या चालकांनी पुन्हा स्वतंत्र बैठक घेऊन झालेले निर्णय मान्य नसल्याचे सांगत दुग्धविकासमंत्र्याची शिष्टाई वाऱ्यावर सोडली. दर न वाढवण्याची भूमिका बैठकीत घेतल्याची माहिती मिळाली आहे.
प्रभात, पतंजली, पंचंमहल, कुटे ग्रुप, पारस, डायनामिक्स, सोनाई, नेचर डिलाइट, रियल डेअरी, कात्रज डेअरी, पराग संघाकडून राज्यातून लाखो लिटर दूध संकलित होत आहे. या प्रमुख संघाच्या जोडीने साडेतीनशे ब्रॅण्ड एकत्र येतात आणि महाराष्ट्रातील दूध धंद्यात एकाधिकारशाही निर्माण करत आहेत. किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, माजी खासदार हानंदा यांच्या नेतृत्वाखाली देशाची दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करून आंदोलन पुकारणार आहोत, असे डॉ. नवले म्हणाले. डॉ. नवले म्हणाले...
दाखवायचे आणि खायचे दात वेगळे दूध संघाच्या मालकाचे नाव वेगळे असले, तरी त्यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमधील बड्या लोकांची गुंतवणूक आहे. यातील मोठा नफा या लोकांना पोहोच होतो. या वेळी दूध व्यवसायाबाबत एकाधिकारशाही राबवणाऱ्या संघाची नावे घेतली, पुढच्या वेळी यात सहभागी मंत्री, नेत्यांची नावे घेऊ, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.