मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही? पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच,’ या भूमिकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे, ‘‘मराठीला माय मराठी म्हणण्याचा, अमृतातेही पैजा जिंकणारी भाषा म्हणून तिचा अभिमान मिरविण्यासाठी मी मराठी, माझी मराठी, असा बाणा जपू या. त्यासाठी मराठीत विचार करू या, मराठीत बोलू या, व्यक्त होऊ या. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या. मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचा स्वीकार करू या. मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी, तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करू या. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर करू या.’’
मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझे मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय आहे. हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या. मग पाहू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही ? या आपल्या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.