नाशिक : ग्लासगो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत कार्बन उत्सर्जनासंबंधी परिणामांवर चर्चा झाली. त्याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३०पर्यंत ते ३० टक्के कार्बन उत्सर्जन कमी करून २०५० पर्यंत ते शून्यावर आणण्याचा संकल्प केला आहे. या पद्धतीने काम करताना बांबू लागवड वाढविण्यासाठी देशभर संघटितपणे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व जण मिळून सोबत काम करू, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ आणि जिओलाइफ ॲग्रीटेक इंडिया प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २७) ‘बांबू लागवडीतील संधी, मूल्यवर्धन, मार्केटिंग’ या विषयावर कार्यशाळा झाली. राज्यातील २१ जिल्ह्यांत कार्यशाळा होणार असून, नाशिकपासून त्याचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, ‘जिओ लाईफ’चे अध्यक्ष विनोद लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित त्रिपाठी, लेखा परीक्षक कृष्णा काबरा, बांबूतज्ञ संजीव कर्पे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले, उद्धव निमसे, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर आदी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण आणण्यात आले. यातून तापमान कमी करण्यासह ऑक्सिजन वाढविला जाणार आहे. भारत या दिशेने जात असून शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा कर्ज योजना बँकांच्या माध्यमातून राबवू. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. अशी धोरणे राबवून बँकांना तशा सूचना करून शेतकऱ्यांचा विकास साधू, असे नमूद केले. पटेल म्हणाले, की खनिजतेलाचा वापर बंद करून बांबूचा वापर वाढवावा लागेल.
या वेळी आमदार आहेर, फरांदे यांची मनोगते झाली. ‘एसआयआयएलसी’चे सरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.