

नागपूर : ‘‘ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील ६ हजार १२३ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. ‘जल जीवन’ कार्यक्रमाची मिशन मोडवर अंमलबजावणी करा,’’ असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘जल जीवन मिशन’ तसेच ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचा आढावा जैस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन, पाणी व स्वच्छता मिशनचे संचालक ऋषीकेश येशोद, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी आदी उपस्थित होते.
जैस्वाल म्हणाले, ‘‘राज्यातील १२ लाख घरांना नळाद्वारे पाणी देण्याचे ध्येय साध्य करावयाचे आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावनिहाय सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करताना पिण्याच्या पाण्याचा स्रोत निश्चित करण्यासोबतच स्रोत वाढविण्यासाठी इतर योजनांचा समन्वय करून हे मिशन यशस्वी करावे.’’
‘‘प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे पाणी पुरविणे, प्रति व्यक्ती किमान ५५ लिटर बारा महिने पिण्याचे पाणी पुरवठा करणे. तसेच गुणवत्तापूर्ण पाण्याचा दर्जा राखणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा करताना प्रत्येक घराची चेकलिस्ट तयार करून आराखडा तयार करावा. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता द्यावी,’’असेही जैस्वाल म्हणाले.
‘‘दहा टक्के लोकसहभाग असला तरी योजना पूर्ण झाल्यानंतर हा निधी संबंधित गावांना मिळेल. त्यातून पुढील पाच वर्षे योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे करणे शक्य होईल. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या गावांमध्ये सौर ऊर्जेवर योजना कार्यान्वित करता येईल,’’ असे जैस्वाल म्हणाले.
शाळा, अंगणवाड्यांना पिण्याचे पाणी
विभागातील शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मिशन अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विभागातील १० हजार ३९९ शाळा तसेच ११ हजार ४८३ अंगणवाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी पुरविण्यासाठी ९० दिवसांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत ३१ डिसेंबरपूर्वी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा या वेळी प्रधान सचिवांनी घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.