Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १३.१८ डाॅलरवर पोचले होते. पण सोयापेंडचे वायदे आजही ३९३ डाॅलरवर होते. देशातील बाजारातही सोयाबीच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनला आजही बाजारात सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील सोयाबीन आवक १ लाख ७० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील नव वर्षाचा माहोल आणि देशातील बाजारातील आवक यामुळे सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारत कापसाची आवक १ लाख ७८ हजार गाठींच्या दरम्यान आहे. तर बाजारातील कापसाचे भाव ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसतात. भावपातळी कमी असतानाही बाजारातील आवक चांगली आहे. उद्योगांना गरजेप्रमाणे माल मिळत आहे. त्यामुळे भावपातळीही स्थिर दिसते.
देशातील वायदे आज दुपारपर्यंत कमी होऊन ५६ हजार ३०० रुपयांपर्यंत आले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८०.६१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारात कापसाची आवक आणखी एक दीड महिना कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
केंद्र सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. त्याचा आधार तुरीच्या भावाला मिळत आहे. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारने सर्व प्रयत्न केले. पण भाव कमी करण्यात सरकारला यश आले नाही. त्यामुळे शेवटी सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला.
सध्या तुरीला बाजारात सरासरी ८ हजार ते ९ हजारांचा दर्जाप्रमाणे भाव मिळत आहे. यंदा तुरीचे उत्पादन घटले. त्यामुळे तुटवडा जाणवणार आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन ग्राहकांना स्वस्त तूर डाळ देण्यासाठी सरकार खरेदी करणार आहे. पण खुल्या बाजारात यामुळे तुरीचे भाव जास्त कमी होतील, याची शक्यता कमीच आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
नवा गहू बाजारात येण्याच्या काळात हमीभावाने गहू मिळावा यासाठी सरकारचा खटाटोप सुरु आहे. सरकारने यंदा गव्हासाठी २ हजार १२५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या भावपातळी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. सरकारने अलिकडेच साठा मर्यादा कमी केल्याचा परिणाम काहीसा भावावर दिसून आला होता.
पण आता भावपातळी स्थिरावून काहीशी वाढली देखील. पण जसा नवा गहू बाजारात येण्यास सुरुवात होईळ तसे सरकार भाव कमी करण्यासाठी आणखी प्रयत्न करु शकते. पण सरकारला यंदा हमीभावाने पुरेसा गहू मिळण्याची शक्यता दिसते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांद्याच्या किमान भावातील नरमाई सुरुच आहे. कांद्याला आता सोलापूर आणि नामपूरसह इतर काही बाजारांमध्ये किमान भाव १०० रुपये क्विंटलपासून मिळत आहे. तसेच पुढील महिन्यात आता लेट खरिपातील मालही सुरु होणार आहे. यामुळे दरावरील दबाव आणखी वाढू शकतो.
सध्या कांद्याचा सरासरी भाव १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारातील आवक मात्र आजही जास्तच दिसते. कांदा बाजारावरील हा दबाव आणखी काही आठवडे दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.