Agrowon Podcast : गहू बाजारात काय स्थिती आहे?

Market Bulletin : देशातील बाजारात सध्या गव्हाचे भाव स्थिर आहेत. सणांमुळे गव्हाला मागणी आहे. पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादीत दिसतोय. त्यामुळे भावाला आधार आहे.
Market Bulletin
Market Bulletin Agrowon

1. कापसाच्या वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरु आहेत. देशातील कापूस वायदे आज दुपारपर्यंत २८० रुपयांनी नरमले होते. कापूस वायदे ६० हजार ८०० रुपयांवर पोचले. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८७.३१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान होती. पुढील काही दिवस कापसाचे भाव स्थिर राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. 

2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भावपातळी निचांकी पातळीवर पोचली. सोयाबीनचे वायदे १२.६८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३८८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील सोयाबीन पिकाला प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पण पुढील काही दिवस ही भावपातळी कायम राहू शकते, असे अभ्यासकांनी सांगितले. 

3. मागील काही दिवसांमध्ये कारल्याच्या बाजारात नरमाई आलेली दिसते. सध्या बाजारात कारल्याची आवक काही प्रमाणात वाढली आहे. परंतु कारल्याचा उठाव कायम आहे. त्यामुळे कारल्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत असतो. पुढील काही दिवस कारल्याची आवक आवक स्थिर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्याचे भाव सध्याच्या पातळीला टिकून राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

4. पावसामुळे कोथिंबीर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे बाजारात कोथिंबीरची आवक काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोथिंबीरीचे भाव वाढलेत. सध्या बाजारात कोथिंबीरीला सरासरी शेकडा १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळतोय. कोथिंबीरचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

5. देशातील बाजारात सध्या गव्हाचे भाव स्थिर आहेत. सणांमुळे गव्हाला मागणी आहे. पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादीत दिसतोय. त्यामुळे भावाला आधार आहे. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये गव्हाचे भाव प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकारही गव्हाच्या भाववाढीविषयी गंभीर आहे. सरकारने यंदाही गहू निर्यातबंदी कायम ठेवलीय. स्टाॅक लिमिटही लावले. काही दिवसांपूर्वीच सरकारने गहू स्टाॅक मर्यादा कमी केली. म्हणजेच काय तर सरकार गव्हाच्या दरावरूनही आक्रमक झाले असून बाजारावर बारीक लक्ष ठेऊन आहे. नुकत्याच पार पडलेल्या फ्लोअर मिल्स असोसिएशनच्या बैठकीत देशातील गहू उपलब्धतेचा आढावा घेतला गेला. असोसिएशनच्या मते, देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले तरी सध्या गव्हाचा पुरेसा साठा आहे.

यंदा एफसीआयने २६२ लाख टन गव्हाची हमीभावाने खेरदी केली. तर व्यापारी, शेतकरी आणि पाईपलाईमध्येही माल उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा गव्हाचा तुटवडा भासण्याची शक्यता कमीच आहे. पण सध्या देशभरात पाऊसमान कमी दिसते. धरणे आणि जलाशयांमध्ये पाण्याचा साठा कमी आहे. यामुळे रब्बी हंगामात पिकाला किती प्रमाणात पाणी उपलब्ध राहू शकते, याबाबत शंका आहे. एल-निनोमुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्याचा गव्हाच्या पिकावर परिणाम होऊ शकतो. हे सगळे मुद्दे गव्हाच्या भावासाठी महत्त्वाचे ठरतील, असे अभ्यासकांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com