
Kolhapur News: इथेनॉल वर्षाच्या (२०२४-२५) सुरुवातीच्या सहामाहीत उत्तर प्रदेशने तेल कंपन्यांना सर्वाधिक इथेनॉल पुरवठा करून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. जूनअखेर उत्तर प्रदेशने ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्राचा क्रमांक या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राने ६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे, इथेनॉल निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र आघाडीवर असूनही, प्रत्यक्षात पुरवठ्याच्या बाबतीत मात्र तो उत्तर प्रदेशच्या मागे पडला आहे.
तमिळनाडू ६० कोटी लिटरचा पुरवठा करत तिसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटकने ४७ कोटी लिटरचा पुरवठा केला आहे. यंदा कमी क्षमतेने ऊस हंगाम चालल्याने याचा फटका महाराष्ट्रातील उसावर आधारित इथेनॉल प्रकल्पांना बसला आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण विभागाकडील माहितीनुसार, सध्या देशाची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता १८२२ कोटी लिटर इतकी आहे. या क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. महाराष्ट्राची इथेनॉल उत्पादन क्षमता ३९६ कोटी लिटर आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश ३३१ कोटी लिटर क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर, तर कर्नाटक २७० कोटी लिटर क्षमतेसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये असलेली उत्पादन क्षमता आणि प्रत्यक्षात झालेला पुरवठा यात कमी तफावत आहे. याउलट, महाराष्ट्राची क्षमता सर्वाधिक असूनही, प्रत्यक्षात मात्र क्षमतेच्या तुलनेत इथेनॉल निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे इथेनॉल पुरवठा घटल्याचे दिसून येत आहे.
जूनअखेरच्या आकडेवारीनुसार, देशभरातून एकूण ४९९ प्रकल्पांनी तेल कंपन्यांना ५८७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्रात १६८ प्रकल्प आहेत. तर उत्तर देशात ही संख्या केवळ ७८ आहे. कर्नाटकात ४६ तर तमिळनाडूत केवळ १५ प्रकल्प आहेत. उत्तर प्रदेश, तमिळनाडूमध्ये ऊस, साखरेबरोबर धान्य आधारित प्रकल्प अधिक असल्याने या राज्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती चांगली आहे.
महाराष्ट्राला फटका
साखर तज्ज्ञांच्या मते २०२४-२५ हंगामात गाळपासाठी केवळ ८५३ लाख टन ऊस उपलब्ध होता, तर मागील हंगामात तो १,०७६ लाख टन होता. या सुमारे १६ टक्केच्या घटीने इथेनॉल आणि साखर दोन्हीच्या उत्पादनावर थेट परिणाम केला आहे. एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत अवर्षण, त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत अति पर्जन्यवृष्टीमुळे उसाची लवकर पक्वता झाली. उसाला तुरा आला आणि वाढ कमी झाल्याने हेक्टरी उत्पादन घटले.
अनियमित आणि अपुऱ्या पावसामुळे उसाची गुणवत्ता आणि वाढीवर नकारात्मक परिणाम झाला. हवामान बदलाचा इथेनॉल पुरवठा साखळीवर थेट परिणाम झाला. अनियमित पाऊस, अवर्षण आणि अतिवृष्टीमुळे उसाचे हेक्टरी उत्पादन कमी झाले, उसाची लवकर पक्वता झाली आणि साखर उतारा घटला. यामुळे साखर आणि इथेनॉल दोन्हीसाठी कच्च्या मालाची उपलब्धता कमी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.