Turmeric Market : हळदीचा कल अजूनही तेजीकडेच

Turmeric Market Update : मागील तीन-चार महिने हळद बाजारासाठी धामधुमीचे गेले. हळदीच्या किमतींमध्ये ६,५०० रुपये क्विंटलपासून तेजी सुरू झाली होती.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon

Commodity Market Update : मागील तीन-चार महिने हळद बाजारासाठी धामधुमीचे गेले. हळदीच्या किमतींमध्ये ६,५०० रुपये क्विंटलपासून तेजी सुरू झाली होती. वायदे बाजारात विक्रमी १८ हजार रुपयांची पातळी तर हजर बाजारात प्रीमियम दर्जासाठी २० हजार रुपयांची उच्च पातळी गाठल्यावर तेजी एकदम गारठल्यासारखी झाली आहे.

हळदीचे मूलभूत बाजार घटक जरी तेजीदर्शक असले, तरी केवळ चार महिन्यांतच जवळपास तिप्पट झाल्यामुळे बाजारात नफारूपी विक्रीचा सपाटा येणे स्वाभाविक होते. स्टॉकिस्ट आणि व्यापारी यांनी या संधीचा फायदा घेऊन एकवार चांगला नफा कमावला असून, अनेक उत्पादक कंपन्यांना देखील यातून चांगला फायदा झाला आहे.

सर्वच बाजारात मोठ्या तेजी किंवा मंदीनंतर साधारणपणे अशी परिस्थिती येते जेव्हा किमती एका छोट्या कक्षेत वर खाली होत राहतात. यालाच कंसॉलिडेशन अवस्था असे म्हणतात. हा काल महिना किंवा दोन महिन्यांचा असतो. त्यानंतर बाजारातील मूलभूत घटकांमध्ये काही बदल झाला असेल तर त्याला अनुसरूनच तेजी किंवा मंदीचा नवीन कल चालू होतो.

हळदीच्या बाबतीत बोलायचे तर मागील तेजीमागे मूलभूत घटक होता तो चालू खरीप हंगामात लागवडीत आलेली घट, त्यापाठोपाठ पावसाने दिलेला दगा आणि त्यामुळे उत्पादनात येऊ घातलेली घट. ही घट सुरुवातीला २५-३० टक्के तरी असेल या धारणेने बाजार तेजीत आला. त्यानंतर निर्यातीचे आकडे जोरदार आल्यामुळे देखील तेजीला अधिक बळ मिळाले.

Turmeric Market
Turmeric Market : हळदीचे भाव काही दिवसांपासून का स्थिरावले?

परंतु जसजसे पावसाच्या पुनरागमनाच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा नफारूपी विक्री अधिक वाढून हळदीचे वायदे १३ हजार ६०० रुपयांपर्यंत गडगडले. बाजाराच्या दृष्टीने यात काहीच वावगे नसले, तरी ज्यांनी १८ हजार रूपयांच्या किंमतपातळीला हळद विकली नाही त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हळद परत १० हजार रुपयांखाली येते की काय, या शंकेने माल विकून टाकण्याच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे बाजाराची यापुढील चाल कशी राहील हे ठरविण्यासाठी आवश्यक माहिती घेणे गरजेचे आहे.

सप्टेंबर महिन्यात हळद उत्पादक प्रदेशांपैकी तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग येथे बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे हळदीच्या पिकाचे नुकसान सुरुवातीला अनुमानित आकड्यांपेक्षा कमी होणार असले, तरी एकंदर पुरवठा दबावाखालीच राहील. तसेच निर्यातयोग्य दर्जाच्या हळद उत्पादनावर कमी पावसाचा परिणाम जास्त होण्याची शक्यता आहे. एकीकडे हळदीची निर्यात वाढत असताना त्यासाठी पुरवठा कमी झाल्यास किमती चढ्या राहण्याची शक्यता अधिक असल्याची बाजाराची धारणा आहे.

या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांची (एप्रिल-जून) आकडेवारी दर्शवते की हळदीच्या निर्यातीने मागील वर्षाच्या ४९,५०० टनांच्या तुलनेत या तिमाहीत सुमारे ५८,००० टनांपर्यंत भरारी घेतली आहे. मागील संपूर्ण वर्षात निर्यात १२ टक्के वाढली होती. ती या वर्षी १८-२० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा पहिल्या तिमाहीतील आकडेवारीवरून निर्माण झाली आहे. सध्याच्या तेजीत ही अपेक्षा कुठेतरी दिसून येत आहे.

मात्र जुलै-सप्टेंबर या चालू तिमाहीत विक्रमी किमतीचा निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे ही आकडेवारी पुढील काळातील बाजारकलासाठी मार्गदर्शक ठरेल. मात्र मसाला बोर्ड अशी माहिती खूपच विलंबाने देत असल्यामुळे तोपर्यंत बाजारातील ‘कही-सुनी’ माहिती बाजार चालवत राहील.

बाजाराची चाल ओळखणे कठीण असले, तरी एकंदरीत पाहता पुढील दोन महिने बाजारात कंसॉलिडेशन अवस्था चालूच राहील. दरम्यान, टेक्निकल चार्ट आणि मूलभूत घटक यांचा एकत्रित विचार करून केडिया सेक्युरिटीजने केलेल्या अनुमानानुसार हळदीच्या किमतीत चढ-उतार चालूच राहिले, तरी २०२३ अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हळद किमतीतील पूर्वीचे सर्व विक्रम मोडून नवीन शिखर गाठले जाईल.

Turmeric Market
Turmeric Variety : हळदीच्या ३३ वाणांची संशोधन प्रात्यक्षिके

सोयाबीनवर खाद्यतेल आयातीचे सावट

मोसमी पाऊस शेवटच्या टप्प्यात आला असून, हंगामातील पाऊस निदान १० टक्के पिछाडीवर राहणार हे जवळपास नक्की झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरलेल्या सोयाबीनची काढणी सुरू होऊन आठवड्याभरात पीक बाजारात येण्यास सुरुवात होईल. मध्य प्रदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही बाजारांत सोयाबीनची आवक लवकरच सुरू होईल. त्यामुळे बाजारात नवीन सोयाबीनला काय भाव मिळेल याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

अशा वेळी बाजाराचा कल समजण्यासाठी देश-विदेशांतील खाद्यतेल आणि तेलबिया बाजारांत कशी परिस्थिती आहे, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. अमेरिकी कृषी खात्याने (यूएसडीए) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या जागतिक शेतीमाल मागणी-पुरवठा मासिक अनुमानांमध्ये सोयाबीन आणि सोयातेलाची वार्षिक सरासरी किंमत वाढवून ती अनुक्रमे १२.९० डॉलर प्रति बुशेल आणि ६३ सेंट्स प्रतिपौंड केली आहे.

तसेच सोयाबीन उत्पादन, वर्षअखेरीस शिल्लक साठे यांची अनुमाने कमी केली आहेत. ही अनुमाने मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी मजबूत किंमतकल दर्शवत असली, तरी नजीकच्या काळात बाजारकल नरम राहील असे वाटते. कारण अमेरिकन सोयाबीन बाजारात येऊ लागले असून, त्यात पुढील तीन चार आठवड्यांत वाढ होईल; तेव्हा किमती दबावाखालीच राहतील असे दिसून येत आहे.

Turmeric Market
Turmeric Market : पाच महिन्यांत सव्वादोन लाख क्विंटल हळदीची आवक

भारतातील परिस्थितीशी जागतिक बाजाराची सांगड घातल्यास चित्र वेगळे दिसत आहे. यामध्ये मागील दोन-तीन महिन्यांपासून बाजारात येत असलेला आयातीत खाद्यतेलाचा महापूर नेमका काढणीच्या वेळीच आल्यामुळे बाजारावरील दडपणात वाढ होणार आहे. ऑगस्टमध्ये संपलेल्या तेलवर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत खाद्यतेल आयात १४१ लाख टनांचा टप्पा पर करून गेली असून, ऑगस्टमध्ये साडेअठरा लाख टनांचा मासिक स्तरावरील विक्रम नोंदवला आहे.

ऑक्टोबरमध्ये संपणाऱ्या वर्षामध्ये एकंदर आयात १६०-१६५ लाख टनांचा विक्रम करेल हे आता नक्की आहे. तेलाच्या या महापुरामुळे तेलबियांची मागणी घटणार आहे. तेलावरील आयात शुल्क कपातीमुळे रिफाइंड किंवा शुद्ध केलेल्या पाम तेलाची आयात जोरदार वाढ नोंदवत आहे.

त्याबरोबरच रशिया, युक्रेनमधून स्वस्त सूर्यफूल आयात करून पुढील काळात येऊ घातलेल्या महागाईपूर्वी आयात सवलतींचा फायदा घेऊन तेलाचे मोठे साठे निर्माण केले जात आहेत. अर्थात, महागाईच्या चिंतेने ग्रासलेल्या सरकारला याचा अप्रत्यक्ष फायदा मिळत असल्याने त्यावर बंधने येण्याची शक्यता कमीच आहे.

दुर्दैवाने तेलाची विक्रमी आयात आणि येथील विलंब झालेल्या सोयाबीनच्या काढणीचा कालावधी एकाच असल्यामुळे सोयाबीन किमतीवर सावट आले आहे. आधीच पूर्वीच्या हंगामातील सोयाबीन शिल्लक असताना नवीन सोयाबीनच्या मागणीतील घट चिंता निर्माण करणारी आहे. सोयापेंड उद्योगाकडून मागणी चांगली असली तरी ती पुरेशी नाही. त्यामुळे इतर घटक निर्णायक ठरणार आहेत.

पुढील काही दिवसांत खाद्यतेल आणि सोयाबीनशी संबंधित विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा देशात होत आहेत. त्यात होणाऱ्या चर्चांमधून पुढे येणारी माहितीदेखील बाजारसाठी मार्गदर्शक ठरेल.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com