
Todays Turmeric Market Rate : सोयाबीन व हरभरा वायद्यावरील बंदीने आणि शेतकऱ्यांसाठी आवाक्याबाहेरील कापूस वायदे यामुळे निराश झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागील दोन-तीन महिन्यांपासून हळदीने चांगला आधार दिला आहे. सुरुवातीला जिरे या मसाला पिकातील वायद्याने रेकॉर्ड-तोंड कामगिरी केली असताना आता हळदीने देखील वायदेबाजारात जोर पकडला आहे.
यापूर्वीच्या लेखामध्ये सुचविल्याप्रमाणे मागील आठवड्यात हळदीने ११,८०० रुपयांचे लक्ष्य अपेक्षेपेक्षा लवकर पार करून १२,००० रुपये प्रतिक्विंटल दराचे शिखर गाठले गाठले देखील. मागील तीन महिन्यांतील हळद वायद्यांची कामगिरी पाहता दोन वर्षांपूर्वी सोयाबीन वायद्यातील तेजीची आठवण व्हावी. विशेष म्हणजे ही तेजी उलढालीतील वाढीच्या साथीने आली असल्यामुळे ती फंडामेन्टल म्हणजेच मूलभूत घटकांवर आधारित असल्याची साक्ष देत आहे.
मूलभूत घटक विचारात घ्यायचे तर जुलैचा मध्य आला असताना तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, चेन्नई आणि ओडिशा या प्रमुख हळद उत्पादक राज्यांमध्येच पावसाने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. दीर्घ कालावधीच्या या मसाला पिकांच्या पेरणीमध्ये सध्या १५-२० टक्के घट होईल असे चित्र आहे. सध्याची तेजी पाहता पुढे ही पेरणीतील तूट कमी झाली तरी एकंदरीत उत्पादन मागील वर्षापेक्षा १० टक्के कमी राहण्याची शक्यता आहेच.
टेक्निकल चार्ट आधारित गुंतवणूकदार हळदीमध्ये खूप सक्रिय आहेत. हळदीने ११,८०० रुपयांचे लक्ष्य पार केले असल्याने ते आता १२,८०० आणि १४,८०० रुपयांच्या लक्ष्याकडे डोळे लावून बसले आहेत. काही टेक्निकल चार्ट पॅटर्न अभ्यासक २०२३ मध्ये जिऱ्यानंतर हळद मालामाल करेल असे म्हणू लागले आहेत.
या क्षेत्रातील गाढे अभ्यासक आणि कमोडिटी बाजारातील निष्णात सल्लागार अजय केडिया यांच्या मते एक चार्ट हळद १७,००० चे शिखर गाठण्याची शक्यता दर्शवत आहे. परंतु सर्वोच्च शिखर सर केलेच तर ते पायरी-पायरीने गाठले जाणार आहे. त्यामुळे आंधळेपणाने ट्रेडिंग न करता आपले नियोजन करावे लागेल.
यापूर्वी २०१० मध्ये हळदीने १७ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. १२ हजार रुपयांचे लक्ष्य अधिक वेगाने गाठल्यामुळे यापुढील मार्ग थोडा अधिक चढ-उतारांचा राहील. १० हजार ते ९ हजार ८०० रुपयांपर्यंत करेक्शन येऊन नंतर तेजी-मंदी पाऊस-पाणी-पेरणी इत्यादी गोष्टींवर निर्भर राहील, अशी बाजाराची धारणा आहे. मात्र सोयाबीन आणि कापूस बाजारातील मागील सहा महिन्यांचा आढावा घेतला तर हळदीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपापल्या जोखीम-क्षमते नुसार फायदा घेणे कधीही श्रेयस्कर ठरेल.
कापूस-सोयाबीन
या वर्षात आतापर्यंत सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांनी उत्पादकांची आणि व्यापाऱ्यांची देखील परीक्षा पाहिली आहे. बहुतेकांनी परिस्थितीला शरण जात आपला साठवणूक केलेला माल अखेर कोणती ना कोणती गरज भागवण्यासाठी विकून टाकला आहे. त्याचा अधिकच उलट परिणाम होऊन बाजार काही काळासाठी अधिक घसरले.
मे-जूनमध्ये कापसाची आवक विक्रमी झाली. त्यावरून बाजारातील तज्ज्ञ लोकांचे आपले पूर्वीचे अंदाज बदलू लागले आहेत. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापसाचे देशांतर्गत उत्पादन सुरुवातीच्या ३५५ लाख गाठींवरून २९० लाख गाठींच्याही खाली आणले आणि आता मात्र ते ३१० लाख गाठींपार नेले आहे. तर अनेक सरकारी आणि खासगी खरेदीदार हाच आकडा ३३० ते ३४० लाख गाठी असल्याचे सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर अमेरिकी कृषी खात्याच्या (यूएसडीए) भारतातील संस्थेने कापूस पीक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अनुसार भारतातील कापसाचे क्षेत्र यूएसडीएच्या मासिक अहवालात दिलेल्या १२.५ दशलक्ष हेक्टरपेक्षा थोडे अधिक राहील. या हंगामासाठी कापूस हमीभावामध्ये सुमारे १० टक्के वाढ केल्यामुळे क्षेत्रवाढीस चालना मिळेल, असे या मुंबईस्थित संस्थेने म्हटले आहे. मात्र त्या बरोबरच निर्यात आणि स्थानिक मागणी या दोन्ही अनुमानांमध्ये बऱ्यापैकी वाढ केली आहे.
यामुळे ऑफ-सीझन (हंगामाच्या अखेरची) तेजीला आधीच लगाम घातला गेला आहे. तरीही या वर्षीच्या उत्पादनावर अजूनही असलेले प्रश्नचिन्ह आणि पंजाब-हरयाना वगळता सर्वत्र कापूस पेरण्यांना किमान तीन आठवड्यांचा झालेला उशीर या गोष्टी बाजाराला कितपत सहारा देतात हे पाहावे लागेल.
तसेच जुलैअखेर कापूस क्षेत्र अपेक्षेपेक्षा खूप कमी राहिले तर त्याचा उलट परिणाम होऊन कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच चांगली किंमत देऊन जाणे देखील सध्याच्या परिस्थितीत शक्य आहे. शुक्रवारअखेर कापसाचे क्षेत्र ९.६ दशलक्ष हेक्टर एवढे म्हणजे ५ टक्के पिछाडीवर आहे. तसेच अजूनही महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांत बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.
सोयाबीनच्या बाबतीत यूएसडीएने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या जुलै अहवालात २०२३-२४ हंगामाच्या सुरुवातीच्या साठ्यांमध्ये वाढ केली असून, जागतिक उत्पादनात ५० लाख टन कपात केली आहे. तसेच शिल्लक साठ्याच्या अनुमानामध्ये देखील कपात केली आहे. परंतु २०२३-२४ च्या हंगामातील सरासरी किंमत अनुमान सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड या तिन्ही गोष्टींसाठी वाढवले आहे. तरीही सोयाबीन आणि सोयापेंडची अनुमाने सध्याच्या किमतीपेक्षा बरीच कमी आहेत. एकंदरित परिणाम सोयाबीन किमती मंदीत राहण्याकडे झुकलेला आहे.
भारतात मात्र चालू खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र दणदणीत १५ टक्के पिछाडीवर आहे. तसेच पेरण्या झालेल्या अनेक भागांत पाऊस जेमतेम असल्याने उत्पादकता कमी राहू शकेल. पेरण्या अखेरच्या टप्प्यात असल्याने उत्पादकांमध्ये छोट्या कालावधीची पर्यायी पिके घेण्याकडे कल वाढणार आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांच्या क्षेत्रात मोठे फेरफार होतील, हे उघड आहे.
परंतु सोयाबीनचे चालू हंगामाअखेरील साठे २० लाख टनाहून अधिक राहण्याची अपेक्षा आहे. जोडीला मागील आठ महिन्यांत खाद्यतेल आयातीत २० टक्के वाढ झालेली असल्याने आणि आयात शुल्कात कपात झाल्यामुळे पुढेही ती तशीच राहण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा देखील येथील तेलबिया किमतीवर विपरीत परिणाम होत असतो. या परिस्थितीत खरीप उत्पादनात १५ टक्के घट अपेक्षित असली, तरी नवीन हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे भाव कसे राहतील, हा मोठा प्रश्न आहे.
तूर तेजीतच
या सर्व जर-तर या परिस्थितीत तूर मात्र आपले भाव खाणे चालूच ठेवणार आहे. तुरीच्या क्षेत्रातील घट अजूनही ३८ टक्क्यांहून अधिक आहे. त्यातच पावसाने देखील हळदीप्रमाणे देशातील तुरीच्या क्षेत्राकडे पाठ फिरवलेली आहे.
हा मोठा धोक्याचा इशारा समजून तुरीसाठी सरकारी यंत्रणा आफ्रिका, म्यानमारच्या पलीकडे शोध घेऊ लागल्या असून, आता भारतासाठी ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील यांनी तूर पिकवावी, या दृष्टीने कडधान्य आयातदार संघटनेने प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे २०२३-२४ वर्षात आपली डाळ ‘इंपोर्टेड'च राहणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.