
फ्यूचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २५ एप्रिल, २०२५
या वर्षी (२०२४-२५ मध्ये) भारतातील मक्याचे उत्पादन विक्रमी होण्याचा अंदाज केंद्र सरकारने नुकताच वर्तवला आहे. त्याचा प्रत्यय बाजारातील आवकेत दिसत आहे. १ ऑक्टोबर २०२४ ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान देशातील बाजार समित्यांमध्ये झालेली मक्याची आवक गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या आवकेपेक्षा ७५ टक्क्यांनी अधिक आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान येथील वाढ लक्षणीय आहेच; पण सर्वात अधिक वाढ कर्नाटक व आंध्र प्रदेश मध्ये झाली आहे. यांचा एक परिणाम म्हणजे १० जानेवारी २०२५ पासून मक्याचे भाव सतत घसरत आहेत. रु. २,५०० वरून ते सध्या रु २,२०० वर आले आहेत. त्यामुळे यापुढे मक्याच्या किमती वाढण्याची शक्यता कमी दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू आहेत. भारताने मलेशियातून पाम तेलाची खरेदी वाढवली आहे. गेल्या पाच महिन्यांत सोयातेलाच्या किमती पामतेलापेक्षा कमी असल्याने भारताने पामतेलाची खरेदी कमी केली होती. पण आता पामतेल सोयातेलापेक्षा स्वस्त झाल्यामुळे भारतातील रिफायनरीजनी पामतेलाच्या खरेदीकडे पुन्हा मोर्चा वळवला आहे.
भारत हा पाम तेलाचा जगातील सगळ्यात मोठा खरेदीदार देश आहे. त्यामुळे भारताने वाढविलेल्या पाम तेल खरेदीचे जागतिक बाजारावर पडसाद उमटले आहेत. मलेशियन पाम तेल फ्युचर्सला आधार मिळाला आहे. भारतात स्थानिक बाजारात या सप्ताहात मका, मूग, सोयाबीन व तूर यांचे भाव घसरले. इतर पिकांचे भाव वाढले. कांद्याचे भाव रु. १२४२ वर आले आहेत, तर टोमॅटो रु. १,००० पर्यंत गेला आहे.
२५ एप्रिल २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात पुन्हा ०.६ टक्के वाढून रु. ५४,५८० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ५५,५०० वर आले आहेत. जुलै भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्याने अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात १.५ टक्क्याने वाढले.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. १,४६८ वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्के वाढून रु. १,४८१ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५४० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ०.९ टक्क्याने अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात ०.४ टक्के वाढून रु. २,२५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ७.२ टक्क्यांनी घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. मे फ्युचर्स किमती ८.१ टक्क्याने घसरून रु. २,२१० वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,४३४ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २.१ टक्क्याने अधिक आहे. सध्याचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) कमी आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने वाढून १४,७४० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने वाढून १४,८८९ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. १४,२२८ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १५,९३० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ७ टक्क्यांनी अधिक आहेत. सांगलीमधील (राजापुरी) स्पॉट भाव रु. १५,८५० आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात ४.४ टक्क्यांनी घसरून रु. ५,९२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने वाढून रु. ६,००० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे. आवक वाढती आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.५ टक्क्याने घसरून रु. ४,५९६ वर आली होती. या सप्ताहात ती २.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,४६९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात ०.६ टक्क्याने वाढले.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,३०८ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ७,०६७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात रु. १,२४२ वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ६०२ वर आली होती; या सप्ताहात ती रु. १,००० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.