
Kolhapur News: गेल्या वर्षीपेक्षा २९ लाख टन साखरेची घट दर्शवत यंदाचा (२०२४-२५) राज्याचा हंगाम समाप्त झाला आहे. यंदा साखर उत्पादनाबरोबरच साखर उताऱ्यात झालेली घटही उद्योगाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली. प्रत्येक वर्षी वाजत गाजत संपणारा हंगाम यंदा शुकशुकाटाने संपला. साखर कमी उत्पादित झाल्याने याचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे.
अनेक कारखान्यांचा व्यवस्थापन खर्च वाढला, पण गाळप क्षमतेइतके ऊस गाळप झाले नाही यामुळे याचा ताण साखर कारखान्यांच्या यंत्रणेवर आला. सुरुवातीला यंत्राने मोठ्या प्रमाणात तोडणी झाली यामुळे कारखान्यांचे अड्डे जाम झाल्याचे चित्र होते. शेवट्या एक महिन्यात मात्र मजुरांनी ऊस तोडणी सुरू केल्यानंतर याच ठिकाणी क्षमतेइतका ऊस येण्याचीही पंचाईत झाली. राज्याचा सरता हंगाम निराशाजनक ठरल्याचे चित्र राहिले.
यंदा ऊस पटट्यामध्ये शेतकरी संघटनांनी फारसे आक्रमक आंदोलन केले नाही यामुळे अपवाद वगळता ऊस हंगाम वेळेत सुरू झाला. गेल्या वर्षी २०८ साखर कारखाने सुरू होते. यात ८ साखर कारखान्यांची घट झाली. गेल्या वर्षी अवर्षणामुळे ऊस क्षेत्र घटल्याने यंदा गाळप कमी होईल, असा अंदाज होता. पण क्षेत्राबरोबरच उसाच्या उत्पादनातही एकरी दहा ते पंधरा टनांपर्यंत घट आल्याने याचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच पण कारखान्यांचे नियोजनही बिघडले.
दोन वर्षांपूर्वी जादा उसामुळे तोडणी यंत्रणांकडून ऊस उत्पादक अक्षरशः वेठीला धरले गेल्याचे चित्र होते. यामुळे कारखान्यांनी यंदा तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत ऊस तोडणी यंत्राचा वापर वाढवला. यामुळे पहिल्या टप्प्यात गतीने तोडणी झाली. पण वेळेपेक्षा लवकर तोडणी झाल्याने ऊस तोडणी यंत्र धारकालाही याचा फटका बसला. लवकर तोडणी संपल्याने अनेकांना यंत्रांचेही हप्तेही फेडता आले नसल्याची यंदाची स्थिती राहिली.
वाढत्या उत्पादन खर्चाने हैराण झालेल्या ऊस उत्पादकाला उत्पादन घटीने मोठा दणका दिला. अगदी मातब्बर शेतकऱ्यांच्या उत्पादनातही दहा ते पंधरा टनांपर्यंत घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे चित्र होते. पन्नास ते साठ टनांच्या वर येणारे उत्पादन ४० ते ४५ टनांपर्यंत घसरल्याने उत्पादकांनाही यंदाच्या हंगामाचा फारसा फायदा झाला नसल्याचे चित्र आहे.
पंधरा दिवस ते तीन आठवडे हंगाम लवकर संपला
सर्वाधिक कारखाने असणाऱ्या सोलापूरचा हंगाम यंदा लवकर संपला. खोडवा ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने सोलापूर विभागात गतीने तोडणी झाली. उसाचे गाळप कमी असले तरी यंदाही शेतकऱ्यांना ऊस तोडणीवेळच्या अडचणीत वाढच झाली. विशेष करून यंत्राने ऊसतोडणी संपल्यानंतर मजुरांनी ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. अनेक विभागात प्रति वर्षीपेक्षा पंधरा दिवस ते तीन आठवडे हंगाम लवकर आटोपल्याचे चित्र होते.
...अशी राहिली यंदाच्या गाळपाची स्थिती
यंदा सुरू झालेले कारखाने : २००
सहकारी कारखाने : ९९
खासगी कारखाने : १०१
यंदाची एकूण दैनिक गाळप क्षमता : ९ लाख ७० हजार ५० टन
गेल्या वर्षीपेक्षा यंदा वाढलेली दैनिक गाळप क्षमता : १८ हजार ९०० टन
ऊस गाळप (लाख टन)
वर्ष २०२४-२५ २०२३-२४
घट ८५३ १०७६ २२३
निव्वळ साखर उतारा (टक्के)
वर्ष २०२४-२५ २०२३-२४
घट ९.४८ १०.२४ ०.७६
साखर उत्पादन (लाख टन)
वर्ष २०२४-२५ २०२३-२४
घट ८१ ११० २९
विभागवार साखर उत्पादन
विभाग हंगाम घेतलेले कारखाने एकूण ऊस गाळप साखर उत्पादन साखर उतारा
सहकारी खासगी
(लाख टन) (लाख टन) (टक्के)
कोल्हापूर २६ १४ ४० २०२ २२ ११.०८
पुणे १८ १३ ३१ २०८ २० ९.६६
सोलापूर १७ २८ ४५ १३२ ११ ८.१३
अहिल्यानगर १४ १२ २६ ११४ १० ८.९३
छ.संभाजीनगर १३ ९ २२ ८१ ६.५ ८.०३
नांदेड १० १९ २९ ९९ ९.५ ९.६७
अमरावती १ ३ ४ १२ १ ८.९७
नागपूर ३ ३ ४ ०.१० ५.१२
एफआरपीची स्थिती (३० एप्रिल अखेर)
वाहतूक खर्चासहित रक्कम : ३१५३३ कोटी
वाहतूक खर्चासहित अदा एफआरपी : ३०,४५३ कोटी
शिल्लक एफआरपी : १०८० कोटी
पूर्ण एफआरपी दिलेले कारखाने : ९२
शंभर टक्के एफआरपी न दिलेले कारखाने : १०८
८० ते ९९ टक्के एफआरपी दिलेले कारखाने : ९३
६० ते ७९ टक्के एफआरपी दिलेल कारखाने : ९
५९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेले कारखाने : ६
आरआरसी अंतर्गत कारवाई केलेले कारखाने : २०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.