Soybean : अमेरिका, भारतातील सोयाबीन हंगामाची स्थिती काय?

जगात ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना हे तीन महत्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. तीन देशांमध्येच जगातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल ८३ टक्के उत्पादन होतं. उत्पादनानुसार क्रमांक पाहायचा झाल्यास प्रथम ब्राझील, दुसरा अमेरिका, तिसरा अर्जेंटीना, चौथा चीन आणि पाचव्या क्रमांकावर भारत आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

पुणेः देशात यंदा सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) गेल्यावर्षीपेक्षा कमी होत असल्याचं ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालं. त्यातच पिकाचं नुकसानही (Soybean Crop Damage) वाढतंय. तर तिकडे अमेरिकेतही पिकाबाबत वेगवेगळे अंदाज येत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यांत (Soybean Future Rate) सुधारणा झाली. या दरवाढीचा लाभ देशातील सोयाबीनलाही (Soybean Rate) मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

सुरुवातीला जगातील महत्वाच्या देशातील सोयाबीन काढणीचा हंगाम केव्हा सुरु होतो, ते पाहू… जगात ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना हे तीन महत्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. तीन देशांमध्येच जगातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल ८३ टक्के उत्पादन होतं. उत्पादनानुसार क्रमांक पाहायचा झाल्यास प्रथम ब्राझील, दुसरा अमेरिका, तिसरा अर्जेंटीना, चौथा चीन आणि पाचव्या क्रमांकावर भारत आहे. हे पाच देश जगाचं ९७ टक्के सोयाबीन उत्पादन घेतात.

Soybean
Soybean : अमेरिकेत सोयाबीन दर स्थिरावले

वर्षातील हंगामाचा विचार केला तर ब्राझील आणि अर्जेंटीनाचा हंगाम आधी सुरु होतो. दोन्ही देशांमध्ये मार्च महिन्यात सोयाबीन काढणी जोमात असते. तसं लवकर लागवड झालेलं सोयाबीन फेब्रुवारीतच बाजारात येतं. मात्र त्याचं प्रमाण कमी असतं. एप्रिल महिन्यात ब्राझील आणि अर्जेंटीनाची सोयाबीन काढणी पुर्ण होते.

भारताचा सोयाबीन हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरु होतो. मात्र याच्या नेमकं आधी म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटी अमेरिकेचा हंगाम सुरु होतो. अमेरिकेतील सोयाबीनही भारताच्या सोयाबीनसोबतच बाजारात येतं असं मानलं जातं. तसं पाहिलं तर दोन्ही देशांमधील सोयाबीन उत्पादनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन १२०० लाख टनांच्या दरम्यान असतं. तर भारताचं उत्पादन सरासरी १२० लाख टन असतं. म्हणजेच भारत अमेरिकेच्या उत्पादनाच्या तुलनेत केवळ १० टक्के उत्पादन घेतो.

Soybean
Soybean : गडहिंग्लज तालुक्यात सोयाबीनवर तांबेरा

मात्र अमेरिकेत जीएम पीक असतं. तर भारतात नाॅन जीएम सोयाबीन होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात तुलना करताना अमेरिकेच्या सोयाबीनच्या दराशीच तुलना केली जाते. त्यामुळं सहाजिकच अमेरिकेतील दराचाही परिणाम भारतातील दरावर होत असतो. यंदा अमेरिकेत सोयाबीन पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय, असं येथील शेतकऱ्यांनी सांगितलं. मात्र अमेरिकेचा कृषी विभाग अर्थात युएसडीएनं अमेरिकेत यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला. यंदा अमेरिकेतील शेतकऱ्यांना प्रतिएकर १४ क्विंटल १२ किलो उत्पादकता मिळेल, असाही अंदाज आहे. मात्र अमेरिकेतील अनेक भागांतील पिकाला पावसाची गरज आहे. त्यामुळं उत्पादकता कमी येऊ शकते, असा दावा शेतकऱ्यांनी केला, असं येथील फार्मींग फ्यूचर या संस्थेनं म्हटलंय.

अमेरिकेतील सोयाबीन वायद्यांचा विचार करता आठवड्याचा शेवट दर सुधारणेने झाला. नोव्हेंबरच्या वायद्यांमध्ये ३० सेंटने वाढ होऊन १४.६१ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. एक बुशेल्स म्हणजे २७.२१ किलो सोयाबीन. तर डिसेंबरचे सोयापेंडचे वायदे १४.२ डाॅलरने वाढून ४२८.५० डाॅलर प्रतिटनांवर पोचले. अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाबाबत अद्यापही अनिश्चतता असल्यानं वायद्यांत सुधारणा झाल्याचं येथील काही संस्थांचं म्हणणं आहे.

भारतातही यंदा सोयाबीन लागवड गेल्यावर्षीपेक्षा काहीशी कमी झाली. आत्तापर्यंत देशात जवळपास १२० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानं पिकाला फटका बसला. तसंच पिकावर येलो मोझॅक, खोडमाशी आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळं पिकाचं नुकसान वाढलं. अनेक ठिकाणी पीक पिवळं पडलं, पिकाची वाढ खुंटली, फुले गळून पडली त्यामुळं उत्पादतेवर परिणाम होऊ शकतो, असं शेतकऱ्यांनी सांगितलं.

दुसरीकडे आतापर्यंत देशात ३५ ते ४० लाख टन सोयाबीनचा शिल्लक साठा असल्याचं उद्योगाचं म्हणणं आहे. मात्र आता लागवडही कमी झाल्याचं स्पष्ट होतंय. तर पिकाचं नुकसानही होतंय. त्यामुळं हंगामाच्या शेवटी २० ते २५ लाख टन सोयाबीन शिल्लक राहीलं तरी सोयाबीन दरावर फार दबाव येणार नाही. हंगामात शेतकऱ्यांना किमान ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी दर पातळी लक्षात ठेऊन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com