
पुणेः देशात सध्या जवळपास ४० लाख टन सोयाबीन (Soybean Stock) शिल्लक आहे. त्यामुळं सोयापेंड उत्पादन (Soymeal Production) १६ लाख टनांनी घटलं. तर निर्यातही (Soymeal Export) कमी राहिली. मात्र यंदा शिल्लक सोयाबीन (Soybean) अधिक असले तरी नवीन हंगामात सोयाबीनला चांगला दर (Soybean Rate) मिळेल, असं जाणकारांनी सांगितले.
देशात यंदा १११ लाख टन सोयाबीन गाळपासाठी (Soybean Crushing) उपलब्ध असल्याचं सोयाबीन प्रोसेसर्स् असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)ने म्हटलंय. मात्र चालू हंगामात ऑक्टोबर २०२१ ते जुलै २०२२ या काळात गेल्यावर्षीपेक्षा बाजारातील आवक ८ लाख टनांनी कमी राहिली. यंदा केवळ ८२ लाख टन सोयाबीन बाजारात आलं. तर गाळपात तब्बल २० लाख टनांची घट झाली. यंदा पहिल्या दहा महिन्यांमध्ये केवळ ६७ लाख टन सोयाबीनचं गाळप झालं. त्यामुळं देशात अद्यापही ४० लाख ५२ हजार टन सोयाबीन शिल्लक असल्याचं सोपानं म्हटलंय.
यंदा गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचं गाळप कमी झालं. त्यामुळं सोयापेंडचं उत्पादनही घटलं. जुलैपर्यंत देशातील सोयापेंड उत्पादन जवळपास १६ लाख टनांनी कमी राहिलं. यंदा केवळ ५४ लाख टनांचं सोयापेंड उत्पादन झालं. देशात सोयातेलाचे दर वाढले होते. मात्र सोयापेंडचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा अधिक होते. त्यामुळं देशातून होणारी निर्यात १३ लाख टनांनी कमी राहिली. यंदा केवळ ६ लाख टन सोयापेंड निर्यात झाली. ही निर्यात गेल्याअनेक वर्षांतील निचांकी आहे. गेल्या वर्षी याच काळात १९ लाख टन सोयापेंड विविध देशांना निर्यात केली होती.
यंदा मानवी आहार आणि पशुखाद्यातील सोयापेंड वापर ३ लाख टनांनी वाढलाय. देशात यंदा सोयाबीनचं गाळप कमी झाल्यामुळे सोयापेंड उत्पादन कमी झालं. त्यामुळे निर्यात कमी होऊनही सोयापेंडेचा शिल्लक साठा जास्त नाही, असंही सोपानं स्पष्ट केलंय. सध्याही देशातील सोयापेंडचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा अधिक आहेत. त्यामुळं निर्यात धिम्या गतीनं सुरु आहे.
चालू खरिपात जून महिन्यात कमी पाऊस झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांत सोयाबीनच्या पेरणीला उशीर झाला. तर जुलैमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक पट्ट्यात सलग १० ते १२ दिवस पाऊस झाला. तसंच ऑगस्ट महिन्यातही पावसानं तडाखा दिला. याचा फटका सोयाबीन पिकाला बसतोय. परिणामी उत्पादन कमी होईल, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं चालू हंगामातील सोयाबीन जास्त शिल्लक राहिलं तरी दरावर परिणाम होणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.