
Latur News : मध्यंतरी हमीभाव केंद्राची खरेदीची मुदत संपली आणि त्यानंतर बारदानाही संपला. हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीसाठी अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले. यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाचा नाद सोडून बाजारात सोयाबीनच्या विक्रीला पसंती दिली.
यातूनच येथील अडत बाजारात सोमवारी (ता. १३) २७ हजार ४९७ तर बुधवारी (ता. १५) २३ हजार २४६ क्विंटल आवक झाली. त्यानंतर हमीभावाने खरेदीला मुदतवाढ मिळाली व बारदानाही उपलब्ध झाला आणि बाजारातील सोयाबीनची आवक कमी होत गेली. शुक्रवारी (ता. १७) ११ हजार ७२१ क्विंटल आवक होऊन कमाल चार हजार ३१० तर किमान तीन हजार ६६७ भाव मिळाला.
गुरुवारी (ता. नऊ) १३ हजार ३७३ आवक होती तर कमाल भाव चार हजार ३५० तर किमान भाव तीन हजार १५१ रुपये होता. शुक्रवारी (ता. दहा) १८ हजार १३१ क्विंटल आवक होती तर चार हजार ३१३ रुपये कमाल तर तीन हजार ९३१ रुपये किमान भाव होता. शनिवारी (ता. ११) १६ हजार ६९६ क्विंटल आवक झाली. चार हजार ३५० रुपये कमाल तर तीन हजार ५७१ रुपये किमान भाव होता. सोमवारी २७ हजार ४९७ क्विंटल आवक होऊन चार हजार ३१९ रुपये कमाल तर तीन हजार आठशे रुपये किमान भाव होता.
बुधवारी २३ हजार २४६ क्विंटल आवक होऊन चार हजार तीनशे रुपये कमाल तर तीन हजार ९९१ रुपये किमान भाव मिळाला. गुरुवारी (ता. १६) १९ हजार ८८८ क्विंटल आवक झाली. कमाल चार हजार २५० तर किमान चार हजार ५० भाव मिळाला.
काही महिन्यात बाजारात सोयाबीनची आवक तसेच भावात चढउतार सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी काहींना खरेदीचे मेसेज आले नाहीत तर अनेक शेतकऱ्यांकडील सोयाबीनच्या खरेदीला केंद्राकडून नकार दिला जात आहे.
पाऊस तसेच चुकीच्या साठवणुकीमुळे सोयाबीन खराब झाले आहे तर सोयाबीनमधील काडीकचऱ्याचेही निमित्त खरेदीच्या नकाराला दिले जात आहे. आता तर बारदाना नसल्याचे कारण पुढे केले जात असून केंद्रसंचालकांकडून त्यांच्या बगलबच्च्यांच्याच सोयाबीन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.
बाकी शेतकऱ्यांना बारदाना अजून आला नाही. आला तरी खरेदी सुरू होण्यास वेळ लागेल, आताच सोयाबीन विक्रीला घेऊन येऊ नका, अशा सूचना केंद्र संचालकांकडून देण्यात येत आहे. त्यानंतरही विक्रीसाठी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन विविध कारणे सांगून परत पाठवले जात आहे. सोयाबीनमध्ये दोष काढून खरेदीसाठी क्विंटलमागे पैसेही मागण्यात येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बारदाण्याची चणचण कायम
सोयाबीनच्या हमीभाव खरेदीसाठी सुरुवातीला आणि सध्या बारदानाची चणचण भासत आहे. धाराशिव जिल्ह्यात बारदानाची एक गाडी आली होती. प्रत्येक केंद्राला दीड हजार बारदाना देण्यात आला. सोमवारी आणखी बारदाना येणार आहे.
त्यानंतर आणखी बारदाना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज बाजपेयी यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच बारदाना असून आणखी बारदाना येण्याची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.