Soybean Market : सोया-मक्याची गोष्ट

Maize Market : अनुमानित ‘ला निना’मुळे दक्षिण अमेरिकेला दुष्काळाचा धोका संभवतो आणि त्यामुळे सोयाबीनचे समीकरण भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू शकेल ही शक्यता अजूनही कायम आहे.
Soybean Maize
Soybean MaizeAgrowon

Commodity Market Update : आपल्या देशातील कृषी बाजारपेठ ही कायमच राजकारण आणि राजकीय नेते यांच्या प्रभावाखाली राहिल्याने, खरं तर ती तशी प्रयत्नपूर्वक ठेवल्याने, सध्या संभ्रमावस्थेत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीचे अजूनही दोन महत्त्वाचे टप्पे बाकी असताना शेतकरी वर्गातील असंतोष वाढत आहे. दुसरे कारण म्हणजे पुढे चांगला पाऊस दिसत असला तरी सध्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे.

दक्षिण भारतात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढत आहे आणि पाण्याचे साठे १५ टक्क्यांहून खाली घसरले आहेत. कुठे अवेळी पावसाच्या अतिरेकाने पूर देखील आले आहेत तर दुसरीकडे गारपिटीने भाजीपाला, फळपिके उद्ध्वस्त होत आहेत.

यातून स्थानिक बाजारपेठेत स्थैर्य येण्यात अडथळे निर्माण होत असल्यामुळे केंद्राला सातत्याने हस्तक्षेप करावा लागत आहे. मागील आठवड्यात शुल्कमुक्त वाटाणा आयातीला ऑक्टोबरपर्यंत दिलेली मुदतवाढ आणि हरभरा आयातीवरील ६६ टक्के शुल्क काढून टाकणे हे निर्णय कुठेतरी याच दबावाखाली घेतले असावेत.

या निर्णयांमुळे हरभरा उत्पादकांना श्रावणापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामात चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे. आयातीत आणि स्थानिक असा एकत्रित किमान २७-२८ लाख टन वाटाणा, १०० लाख टन हरभरा आणि १२ लाख टन मसूर यांच्या दबावाखाली कडधान्य किमती वाढणे निदान खरीप तोंडावर आलेला असताना तरी दुरापास्त झाले आहे. याला फक्त तुरीचा अपवाद ठरू शकतो.

विविध हवामान संस्थांच्या अंदाजांनुसार यंदा पाऊस लवकर येणार असल्याचे सांगितले जात आहे. पावसात सातत्य राहिल्यास कदाचित पेरण्या नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागतील. तुरीचे क्षेत्र गरजेपेक्षा जास्त वाढण्याची बरीच शक्यता आहे.

परंतु सोयाबीन आणि मका याबाबतचे नियोजन देखील महत्त्वाचे राहील. या दोन्ही पिकांच्या बाबतीत येथील किमतीवर जागतिक बाजारांचे प्रभाव बऱ्यापैकी जाणवत असल्यामुळे पेरण्यांचे नियोजन करतानाच देशाबाहेरील बाजारपेठेत डोकावून पाहावे लागेल.

Soybean Maize
Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

आठवड्याअखेरीस अमेरिकेत सोयाबीन एका महिन्यात सात ते आठ टक्के वाढले आहे. गव्हाने दहा महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. मका देखील महिन्याभरात १२-१३ टक्के वाढला आहे. यामध्ये वायदे बाजारातील तांत्रिक घटक असले तरी हवामानविषयक अनुमानांमध्ये बदललेली परिस्थिती आणि या आठवड्यात प्रसिद्ध होणारे अमेरिकी कृषी खात्याचे (यूएसडीए) आणि ब्राझीलमधील कोनाब संस्थेचे २०२४-२५ वर्षाचे पीकविषयक अंदाज हे घटक महत्त्वाचे ठरतात. हे अंदाज येत्या काळात बाजाराला दिशादर्शक ठरण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेत तेजी आलेली असू शकते. याबाबतचे चित्र पुढील आठवड्यात आणखी स्पष्ट होईल.

दोराब मिस्त्री काय म्हणाले?

वरील परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गोदरेज इंटरनॅशनलचे संचालक आणि नामांकित कमोडिटी बाजार तज्ज्ञ दोराब मिस्त्री काय म्हणाले हे पाहूया. मिस्त्री यांना खाद्यतेल आणि तेलबिया क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. दुबईत नुकत्याच पार पडलेल्या खाद्यतेल परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणात त्यांनी पुढील काळात तेलबिया क्षेत्रासाठी कोणते घटक महत्त्वाचे राहतील आणि त्यांचा किमतीवर काय परिणाम होतील हे सांगितले.

वास्तविक मागील काही महिने खाद्यतेलांच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त दबावाखाली राहिल्या आहेत. याची कारणे अनेक असली तरी मुख्य कारण म्हणजे युक्रेन आणि रशिया येथील सूर्यफूल उत्पादन घटण्याचा अंदाज सपशेल फसले. या दोन देशांमध्ये प्रदीर्घ काळ युद्ध सुरू असल्यामुळे तेथील सूर्यफूल उत्पादन बाधित झाले असल्याचे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात रशियामध्ये तर सूर्यफूल बियांच्या उत्पादनाने २०० लाख टनाची पातळी गाठल्याचे आता दिसून आले आहे.

त्यामुळे सूर्यफूल तेलाची उपलब्धता वाढली असल्याचे मिस्त्री यांनी नमूद केले. युक्रेनमधील एक मोठे धरण फुटल्याने तेथील शेतीचे प्रचंड नुकसान होईल अशी माध्यमांमध्ये चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात तसे चित्र नाही. याच्या जोडीला बांगलादेश, श्रीलंका, नायजेरिया, पाकिस्तान, इजिप्त आणि इराणसारख्या आर्थिकदृष्ट्या मागास देशांमधील निर्माण झालेल्या अमेरिकी डॉलर्सच्या तुटवड्याचा देखील खाद्यतेल मागणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे सोयाबीन आणि खाद्यतेलाच्या किमती घसरल्या आहेत.

भारताबाबत बोलायचे झाल्यास मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही सरकार अतिरिक्त उत्पादन संपूर्णपणे खरेदी करण्याच्या बाबतीत थिटे पSsडले आहे. त्यामुळे सोयाबीनवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. चालू हंगामातील मोठे उत्पादन आणि मागील वर्षातील शिल्लक साठे यांचा सोयाबीनवर आधीच दबाव आहे. त्यात आता मोहरीच्या विक्रमी उत्पादनाची जोड मिळाल्यामुळे हा दबाव आणखीन वाढला आहे. या वर्षी देखील तेलबियांचा वर्षअखेरीस शिल्लक साठा खूप मोठा राहील आणि त्याचा दबाव किमतीवर होत राहील, असे सध्याचे चित्र आहे.

Soybean Maize
Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात भरमसाठ वाढ

भारतीय तेलबिया उत्पादकांसाठी २०२४ हे वर्ष ‘मेक ऑर ब्रेक’ म्हणजे ‘इस पार या उस पार’ राहील असेही मिस्त्री म्हणाले. यापैकी वरील उदाहरणे ‘इस पार’साठी कारणीभूत ठरतील तर ‘उस पार’ जाण्यासाठी कुठले घटक उपयोगी येतील याबाबत थोडी संदिग्धता आहे. परंतु अमेरिकेत होऊ घातलेल्या दोन व्याजदर कपाती, त्यामुळे येणारी डॉलरमधील नरमाई, बायो डिझेलसाठी वाढलेली खाद्यतेल मागणी, तसेच चीनमध्ये तिसऱ्या तिमाहीत अपेक्षित आर्थिक विकास या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.

त्याबरोबरच शेतीमाल बाजारपेठ मंदीत राहील हे गृहीत धरणे बेभरवशाच्या हवामानामुळे धोकादायक ठरू शकेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मागील महिन्यात या स्तंभातून अनुमानित ‘ला निना’मुळे दक्षिण अमेरिकेला दुष्काळाचा धोका संभवतो आणि त्यामुळे सोयाबीनचे समीकरण भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू शकेल ही शक्यता व्यक्त केली होती. मिस्त्री यांनी हवामान या एकाच घटकामुळे कृषी क्षेत्रातील गणित बदलू शकते असे म्हणून एक प्रकारे या शक्यतेला दुजोराच दिला आहे.

मक्याचा पर्याय

वरील माहितीची एकंदर गोळाबेरीज करता असे म्हणता येऊ शकेल की ‘इस पार’ घटक अधिक सक्रिय असताना पेरण्या करताना सोयाबीनसाठी हात थोडा आखडता घेतल्यास अधिक व्यावहारिक ठरू शकेल. या परिस्थितीत कमी केलेले क्षेत्र कशासाठी वापरावे याचा विचार केल्यास सध्या तरी मका हा आश्वासक पर्याय वाटत आहे.

केंद्र सरकारच्या अनुमानानुसार मक्यामध्ये ६०-८० लाख टन उत्पादन वाढीची देशाला गरज आहे. हे उद्दिष्ट गाठणे एक-दोन वर्षांत शक्य नाही. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात कितीही वाढ झाली तरी इथेनॉल उद्योग ती शाश्वतपणे शोषून घेण्यास समर्थ असल्याचे वाढत असलेल्या उत्पादन क्षमता दर्शवत आहेत.

रब्बी हंगामात आघाडीवर असलेल्या बिहारमधील मका राज्याबाहेर जाण्याचे प्रमाण वेगाने कमी होत असल्यामुळे मक्याला वर्षातील आठ-नऊ महिने तरी चांगला भाव मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. जर परदेशातील जीएम मका आयात करण्याच्या मागणीला केंद्र पातळीवर परवानगी दिली नाही तर मक्याच्या किमती चांगल्या राहतील. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र ८५-९० टक्के ठेऊन उरलेले क्षेत्र मक्याकडे वळविण्यासाठी परिस्थिती पोषक राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com