Sesame Market : दिवाळीनंतर तीळ दरात वाढीची शक्‍यता

Sesame Rate : गेल्या हंगामाप्रमाणे दिवाळीनंतर तिळाच्या दरात काही अंशी तेजी येईल, अशी शक्‍यता आहे.
Sesame Market
Sesame Market Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : गेल्या हंगामात १५,५०० रुपयांपर्यंत दर गेल्याने यंदाही तीळ दरात तेजी राहील, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. यंदा मात्र संपूर्ण हंगामात तिळाला उठाव नसल्याने तिळाचे दर दबावात असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. गेल्या हंगामाप्रमाणे दिवाळीनंतर तिळाच्या दरात काही अंशी तेजी येईल, अशी शक्‍यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत उन्हाळी भुईमूग पिकात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्याच्याच परिणामी या पिकांमध्ये शेंगधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकाचा पिच्छा सोडत तिळाला पसंती दिली. सध्या दारव्हा तालुक्‍यात सर्वाधीक तीळ लागवड होते. त्यापाठोपाठ इतरही काही तालुक्‍यांमध्ये तिळाखालील क्षेत्र कमी अधिक प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले.

Sesame Market
Sesame Market : तिळाचे दर १६ हजार रुपयांवर

यवतमाळ बाजारपेठेत याच कारणामुळे तिळाची आवक अधिक होत असल्याने नागपूरसह इतर जिल्ह्यांतून खरेदीदार या ठिकाणी तीळ खरेदीसाठी येतात. गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला तिळाचे दर १३,५०० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर दिवाळीपर्यंत या दरात आणखी तेजी येत ते १५,५०० रुपयांवर पोचले.

Sesame Market
Sesame Market : विदर्भातील बाजारात तीळ १२ हजार रुपयांवर

ज्या शेतकऱ्यांनी संक्रांत सणाच्या पार्श्‍वभूमीवर दर तेजीच्या अपेक्षेने तिळाची साठवणूक केली होती. त्यांना यामुळे चांगलाच परतावा मिळाला. यंदा मात्र सुरुवातीपासूनच तिळाचे दर दबावात असल्याचे चित्र आहे. १२ हजार रुपयांनी तिळाचे व्यवहार झाले. ३१ जुलैला यवतमाळ बाजार समितीत ११२०० ते ११९०० असा दर होता. त्यानंतर ११५०० रुपयांपर्यंत हे दर खाली आले.

सद्यःस्थितीत १०९०० ते ११३५० रुपयांनी तिळाचे व्यवहार होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दरातील तेजीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवणूक देखील करुन ठेवली आहे. साधारणतः दिवाळीनंतर सण उत्सवाच्या काळात ही तेजी येईल, अशी अपेक्षा आहे.

कारंजा येथे दर दबावात

कारंजा (वाशीम) बाजार समितीत तिळाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. विदर्भातील इतर बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाली आहे. तर काही बाजारात तीळ आवक होतच नसल्याचे चित्र असताना कारंजा बाजारात ५० ते १० क्‍विंटल आवक नियमित नोंदविली गेली आहे. या ठिकाणी कमीत कमी ११,७१५ आणि जास्तीत जास्त ११,७९० रुपयांचा दर होता. त्यानंतर आवक आणि दर दोघांत घट नोंदविली गेली. ११,६५० रुपयांवर आता तिळाचे दर स्थिर आहेत.

सात एकरांवर तिळाची लागवड होती. पाच क्‍विंटलचा उतारा मिळाला. या पिकाचा १७ ते १८ हजार रुपये उत्पादकता खर्च असून यंदा अपेक्षित दर मिळाले नाही. १२ हजार रुपयांनी व्यवहार होत आहेत. गेल्या हंगामात तिळाला १५,५०० रुपयांचा दर होता. सुरुवातीला विक्री केली त्यावेळी १३,५०० रुपयांचा दर मिळाला. यंदा मात्र दर दबावात असल्याचे चित्र आहे.
- ओंकार काळमेघ, तीळ उत्पादक, गाझीपूर, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com