
फ्यूचर्स किमती : सप्ताह १९ ते २५ ऑगस्ट २०२३
या सप्ताहात कापूस, हरभरा, सोयाबीन, कांदा व टोमॅटो यांच्या किमतींत घट झाली तर हळद, मूग व तूर यांच्या किमती वाढल्या. तुरीचे उत्पादन या वर्षी घटण्याचा अंदाज असल्याने तुरीच्या किमती वाढत आहेत.
या सप्ताहात त्यांनी प्रति क्विंटल रु. १०,००० चा पल्ला ओलांडला. मूग सुद्धा रु. ८,३०० वर गेला आहे. १८ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालीलप्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.९ टक्क्याने वाढून रु. ६०,९६० वर आले होते. या सप्ताहात ते १.४ टक्क्याने घसरून रु. ६०,०८० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५९,१८० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्यांनी कमी आहेत. कापसाचे भाव वाढण्याचा कल आहे. आवक कमी होत आहे.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५५१ वर आले होते. या सप्ताहात ते १.८ टक्क्याने घसरून रु. १,५२२ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६७ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. कपाशीचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने घसरून रु. २,०८० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (सप्टेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,०९१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,११६ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.७ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात २.९ टक्क्यांनी घसरून रु. १४,१३५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.५ टक्क्यांनी वाढून रु. १४,६३२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती १.२ टक्क्याने घसरून रु. १६,१७४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १६,६५८ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १३.८ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीमधील तेजी कमी होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ५.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,८५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी घसरून रु. ५,६७५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभऱ्याचे भाव वाढत आहेत.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने वाढून रु. ७,८५० वर आली होती. या सप्ताहात ती ५.७ टक्क्यांनी वाढून रु. ८,३०० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या काही सप्ताहांत वाढत होती; आता ती घसरू लागली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,१५१ वर आली होती. या सप्ताहात ती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,०२५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.४ टक्क्याने घसरून रु. ९,५३६ वर आली होती. या सप्ताहात ती ५.३ टक्क्यांनी वाढून रु. १०,०४२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,०००आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे. पुढील वर्षाचे उत्पादन अनिश्चित आहे.
कांदा
कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,३३० होती; या सप्ताहात ती रु. २,१५० वर आली आहे. भारतातील साप्ताहिक रब्बी आवक अजूनही ४ लाख टनांच्या आसपास आहे; मात्र पुढील खरीप पीक अनिश्चित आहे. त्याचा परिणाम किमतीवर दिसून येत आहे. सरकारने रु. २,४१० भावाने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचे जाहीर केले आहे.
टोमॅटो
या महिन्यात टोमॅटोचे भाव ६० टक्क्यांनी घसरून रु. १,९०० वर आले. या नाशवंत पिकाच्या किमती सर्वस्वी आवकेवर अवलंबून असतात. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत देशातील बाजार समित्यांमधील एकूण दैनिक सरासरी आवक ६,००० टन होती. त्या वेळी दैनिक सरासरी किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ८,३७१ होती.
गेल्या सात दिवसांत सरासरी आवक ८३ टक्क्यांनी वाढून रु. १०,९८९ वर आली. याच अवधीत किंमत ७७ टक्क्यानी घसरून रु. १,९२९ वर आली. थोडक्यात, टोमॅटोच्या किमती स्थिर ठेवावायच्या असतील, तर पुरवठासुद्धा स्थिर ठेवावा लागेल.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.