Maize Market : मक्यातील विक्रमी तेजी टिकून राहणार का?

Maize Rate : एनसीडीईएक्स या कमोडिटी वायदे एक्स्चेंजवर सांगली हजर बाजारातील मक्याचे भाव २,७३५ रुपये क्विंटल वरून आठवड्याअखेर २,८३६ रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहेत.
Maize Market
Maize MarketThomson Reuters Foundation

Maize Market Update : मागील आठवड्यात आपण या स्तंभात प्रत्येकी दीड लाख टन सूर्यफूल आणि मोहरी तेल, पाच लाख टन मका आणि १० हजार टन दूध भुकटी आयात करण्यासंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर चर्चा केली होती.

एकीकडे दूध खरेदी दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना असताना दूध भुकटीच्या आयातीला परवानगी देऊन केंद्राने त्यांचा नाहक रोष ओढवून घेतला असे म्हणताना आपण उरलेल्या तीन मालाची आयात जरी विहित अटीनुसार झाली तरी उत्पादकांवर त्याचा कुठलाच विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले होते.

विशेषत: मक्याच्या आयात परवानगीमुळे लागलीच सेंटिमेंट बिघडेल आणि मक्याचा बाजारभाव घसरून येथील उत्पादकांचे नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र मागील संपूर्ण आठवड्यात मक्याची बाजारातील किंमत पाहिली तर या स्तंभातून मांडलेली भूमिका योग्य असल्याचे दिसून येईल.

एनसीडीईएक्स या कमोडिटी वायदे एक्स्चेंजवर सांगली हजर बाजारातील मक्याचे भाव २,७३५ रुपये क्विंटल वरून आठवड्याअखेर २,८३६ रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहेत. तर इतर प्रमुख बाजारांतील मक्याचे भाव २,५६० ते २,६०० रुपयांच्या पातळीवर पोचले असून तोही एक विक्रम आहे. सलग दुसऱ्या वर्षी मक्याने हा पराक्रम केला आहे.

थोडे मागे गेल्यावर दिसून येईल या स्तंभातून मागील वर्षात अनेकदा मक्याच्या क्षेत्रवाढीचा सल्ला देतानाच आपण मका २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत २६५० ते २७०० रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता व्यक्त केली होती.

१४ ऑगस्ट च्या अंकातील `मका उत्पादकांना ऊर्जा मिळणार` हा लेख किंवा १८ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेला `म.. म.. मका` हा लेख वानगीदाखल सांगता येतील. प्रत्यक्षात किमतीचे हे लक्ष्य दुसऱ्या तिमाहीतच गाठले गेले आहे. त्यामुळे आज परत एकदा मक्याच्या बाजारावर दृष्टीक्षेप टाकणे उचित ठरेल.

Maize Market
Maize Market : मका आवक घटली

मका तेजीची कारणे

मक्याची आजची बाजारातील स्थिती पाहता सध्याची विक्रमी तेजी पुढील काळात अजून वाढण्यास जागा असल्याचे संकेत मिळत आहेत. या हंगामातील आत्तापर्यंतच्या तेजीला मक्याची चहुदिशेने वाढलेली उपयुक्तता कारणीभूत आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ पशुखाद्य आणि काही प्रमाणात मानवी अन्न या गोष्टींसाठी वापरला जाणारा मका आता विविध प्रकारच्या प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.

यामध्ये पॉपकॉर्न व्यतिरिक्त नाचोज्, फ्रोझन टिक्की सारख्या पदार्थांसोबतच कॉर्न स्टार्च, कॉर्न शुगर, मका पीठ यांची मागणी वाढत आहे. शेतीमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण यांच्या मते हरभरा जेव्हा महाग होतो, तेव्हा मका त्याच्या रंग आणि इतर पूरक गुणधर्मांमुळे बेसन उद्योगात देखील बऱ्यापैकी वापरला जाऊ लागला आहे.

मात्र पशुखाद्य क्षेत्रात देखील चाऱ्याच्या आणि उसाच्या टंचाईमध्ये मूरघास गाठीसाठी मका मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्या व्यतिरिक्त प्लॅस्टिकला पर्यायी कापड बनवण्यासाठी देखील मक्याचा वापर केला जाऊ लागला आहे.

परंतु मक्यात खऱ्या अर्थाने गेमचेंजर घटक ठरला आहे तो त्याचा इंधन म्हणून वाढत जाणारा वापर. आपल्या देशात पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २०२६ अखेर २० टक्क्यांवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ते जेमतेम १२ टक्क्यांपर्यंत गेल्याचे सांगितले जात आहे. हे इथेनॉल प्रामुख्याने उसापासून,

धान्यापासून किंवा मक्यापासून बनवले जाते. परंतु मागील काळातील दुष्काळी परिस्थितीत उसाचे उत्पादन घटून साखर निर्मितीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी उसाच्या तुलनेत मक्याचा वापर वाढविण्याकडे सरकारचा कल आहे.

इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ५० ते ६० लाख टन मक्याची आवश्यकता लागणार आहे. मक्याचे उत्पादन आधीच ३० लाख टनांनी घटलेले असताना अन्न, पशुखाद्य आणि ऊर्जा या तिन्ही क्षेत्रातील वाढीव मागणी पूर्ण करणे कठीण दिसत होते.

देशांतर्गत किमती आकर्षक झाल्याने आपसूकच निर्यातीकडे ओढा राहिला नाही. आपली २०२३-२४ सालातील निर्यात त्यापूर्वीच्या वर्षातील ३५ लाख टन वरून १३-१४ लाख टनापर्यंत घसरली.

मक्याचे क्षेत्र वाढणार?

आज मक्याचे देशांतर्गत क्षेत्रनिहाय वापराचे अधिकृत आकडे उपलब्ध नसले तरी निर्यातील कमी झालेला २० लाख टन मका पूर्णत: इथेनॉल निर्मितीमध्ये गेला असण्याची शक्यता आहे. असे असतानाही इथेनॉल मिश्रण केवळ १२ टक्के एवढेच झाले असेल आणि उसाच्या उपलब्धतेवरील प्रश्नचिन्ह कायम असताना २० टक्के मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी किती मका लागेल याचे गणित मांडल्यास पुढची वाटचाल काय राहील, याचे चित्र स्पष्ट होईल.

हा संदर्भ लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या पाच लाख टन मका आयातीच्या अधिसूचनेचा अर्थ लावला पाहिजे. मका आयातीचा देशांतर्गत बाजारावर लगेचच परिणाम होण्याची शक्यता धूसर असल्याचे कारण त्यातून लक्षात येईल.

Maize Market
Maize Production : एकरी ४२ क्विंटल मका उत्पादनातील आदर्श

या पार्श्वभूमीवर खरिपातील पेरण्या सुरू झालेल्या असताना आपल्या उपलब्ध क्षेत्राचा वापर करताना शेतकरी बाजारभावाच्या अनुषंगाने विचार करताना तूर, नंतर मका, उडीद, कापूस, मूग आणि शेवटी सोयाबीन या क्रमाने पसंती देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अर्थात पिकांची निवड करताना अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. हा निर्णय केवळ सांख्यिकी किंवा गणिती सूत्रानुसार घेता येत नाही. शेतकऱ्यांना आपापल्या विभागातील पाऊसपाणी, हवामान, जमिनीचा कस, बाजाराच्या पायाभूत सुविधा, निविष्ठांची उपलब्धता, कर्जाचा पुरवठा इत्यादी गोष्टींचा विचार करूनच पीक निवडीचा निर्णय घ्यावा लागतो.

बाजाराचा विचार करता मक्याची इथेनॉल निर्मितीसाठीची मागणी वाढतच जाणार आहे. देशात लहान मोठे निदान ३५ नवीन इथेनॉल प्रकल्प बांधणीच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यातून व्यावसायिक स्तरावरील उत्पादन पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. इथेनॉल मागणी आणि किंमत ही साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडित असते.

मागील दोन महिन्यांत कच्चे तेल २५ टक्के महाग होऊन आता ८८ डॉलर प्रति पिंप या पातळीला पोचले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल उत्पादनाचा खर्च चांगलाच वाढला आहे. अशा वेळी इथेनॉलची मागणी आणि खरेदी किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

असे झाले तर मक्याची मागणी वाढून बाजारभाव देखील वधारू शकतात. प्राप्त परिस्थितीत सांगली-मका ३००० रुपयांची पातळी पार करून ३,१०० ते ३,१५० तर इतर केंद्रांमध्ये २,८०० ते २,८५० रुपयांची पातळी गाठू शकेल.

सावधगिरीचा इशारा

ज्याप्रमाणे ऊर्जा क्षेत्रासारख्या आजवर `अदृश्य` गोष्टीने आलेल्या तेजीने अनेकांना आश्चर्य चकित केले आहे त्याप्रमाणे एखादा `अदृश्य` घटक मका मंदीत आणू शकला नाही तरी तेजीला वेसण घालू शकतो, ही गोष्टही लक्षात ठेवली पाहिजे.

कमोडिटी बाजारात असा अनुभव अनेकदा आलेला आहे. हा `अदृश्य` घटक कदाचित जीएम मक्याच्या आयातीला परवानगी हा असू शकेल किंवा केंद्र सरकारचे धोरणात्मक निर्णय असू शकतो. त्यामुळे याची जाणीव ठेऊनच निर्णय घ्यावेत आणि व्यवहार करावेत, हा सावधगिरीचा सल्ला देणे येथे प्रस्तुत ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com