Pulses Market : कडधान्य आयातीचा महापूर धोकादायक पातळीवर

Pulses Import : खाद्यतेल आयातीनंतर कडधान्य आयात ही सर्वात मोठी परकीय चलन खाणारी कृषी आयात ठरली आहे. विशेष म्हणजे कॅनडा आणि भारत यांच्या मध्ये मागील वर्षात ताणले गेलेले राजनैतिक संबंध मसूर आणि वाटाणा आयातीच्या आड येण्याचे आडाखे देखील फोल ठरले आहेत.
Pulses
PulsesAgrowon

Pulses Market Update : या सदरात या महिन्याच्या सुरुवातीला वाटाण्याच्या आयातीचा तूर-हरभऱ्याच्या बाजारावर होणारा परिणाम या विषयावर लेख लिहिला होता. त्यामध्ये पिवळ्या वाटाण्याची आयात १२ लाख टनांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली होती. प्रत्यक्षात व्यापारी वर्तुळातील आकडेवारीनुसार आयात १८ लाख टनापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे.

आय-ग्रेन या कृषिविषयक माहिती देणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीनुसार रशिया आणि कॅनडामधून मागील काही महिन्यांतील वाटाणा आयात १८.३४ लाख टन झाल्याचा अंदाज आहे. शुल्क-मुक्त आयातीची अखेरची तारीख अजून वाढवल्यास त्यात आणखी दोन लाख टनाची भर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आयात किमान २० लाख टनाचा टप्पा गाठेल, असे सध्याचे चित्र आहे.

Pulses
Pulses Market : कडधान्यांची यंदा दुप्पट आयात

अर्थात असे असूनही हरभरा, तूर किंवा मूगडाळ यांच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. उलट किरकोळ बाजारात त्यांचे दर ८-१० टक्के वाढल्याचे माध्यमांकडून सतत म्हटले जात आहे. त्यामुळे आयात केलेला वाटाणा नक्की कुठे जातोय हा प्रश्‍न निर्माण होतो. कडधान्यांची साठेबाजी (साठवणूक म्हणू हवे तर) होते आहे का, ही शंका घ्यायला जागा आहेच.

आणि केंद्र सरकारने पोर्टलवर दर आठवड्याला कडधान्य साठा घोषित करण्याची सक्ती केलेली असूनही त्याचा किरकोळ बाजारावर परिणाम कसा होत नाही अशी प्रश्‍नांची साखळी पुढे येते. त्याची उत्तरे कदाचित पुढील दोन-तीन आठवड्यांत जेव्हा निवडणूक-ज्वर शिगेला जाईल आणि भाषणांमध्ये महागाईचे आरोप-प्रत्यारोप होतील तेव्हा मिळू शकतील. असो. आज आपण कडधान्य आयातीचा एकूणच बदललेला नूर आणि त्याचा शेती आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याची चर्चा करणार आहोत.

नुकतेच कडधान्य आयातीचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरून या क्षेत्रात बदललेला कल लक्षात येईल. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाची कडधान्य आयात २०१८ नंतरच्या विक्रमी पातळीला पोहोचली आहे. एकूण आयात ४६.५ लाख टन एवढी झाली आहे. २०२२-२३ मध्ये हाच आकडा २५.३ लाख टन एवढा होता. म्हणजे आयातीत ८४ टक्के वाढ झाली आहे.

तर आयातीवरच्या खर्चात ९३ टक्के वाढ होऊन तो मागील वर्षात ३.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. मसूर आयात प्रथमच १० लाख टनांचा आकडा पार करून १२ लाख टनावर गेली आहे. अर्थात, वाटाण्याच्या आयातीचा बराच मोठा वाटा चालू आर्थिक वर्षात गणला जाईल. अन्यथा आयातीचा आकडा ५२-५५ लाख टनांवर गेला असता. म्हणजे चालू वर्षात देखील आयात मागील वर्षापेक्षा जास्त झाली नाही तरी ती बऱ्यापैकी राहील, अशी सध्याची स्थिती दिसते.

खाद्यतेल आयातीनंतर कडधान्य आयात ही सर्वांत मोठी परकीय चलन खाणारी कृषी आयात ठरली आहे. विशेष म्हणजे कॅनडा आणि भारत यांच्या मध्ये मागील वर्षात ताणले गेलेले राजनैतिक संबंध मसूर आणि वाटाणा आयातीच्या आड येण्याचे आडाखे देखील फोल ठरले आहेत. ही आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते की मागील काही वर्षांत कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजनांवरील शेकडो कोटी रुपये योग्य ठिकाणी खर्च झालेले नाहीत.

हमीभाव बऱ्यापैकी वाढवले गेले तरी एक तर खरेदी त्या प्रमाणात झालेली नाही. आणि दुसरे म्हणजे खरेदी करून सरकारी गोदामांत ठेवलेली कडधान्ये महागाई नियंत्रणांच्या नावाखाली वारंवार हमीभावापेक्षा कमी किमतीत विकण्याच्या निर्णयांमुळे बाजार मंदीत राहिला.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्यांनी कडधान्य पिकांकडे दुर्लक्ष केले. त्यातच प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. त्यामुळे कडधान्याची टंचाई निर्माण झाली. एवढे पुरेसे नाही म्हणून केंद्राने कडधान्य बाजारात अगणित वेळा हस्तक्षेप करून धोरण-धरसोडीचा जो कळस गाठला. त्यामुळे बाजाराचा सूर बिघडला असून तो अजूनही रुळावर आलेला नाही. त्यातून देशातील शेतकऱ्यांचे आणि सरकारचे आर्थिक नुकसान झाले. परंतु कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यानमार व आफ्रिकी देश आणि आता अगदी ब्राझील, अर्जेंटिना या देशातील शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढले आहे.

Pulses
Pulses Market : कडधान्यांतील दरवाढ कायम राहण्याची शक्यता

सकारात्मक धोरणबदल आवश्यक

या पार्श्‍वभूमीवर निदान पुढील काळात केंद्रात येणाऱ्या नवीन सरकारला कडधान्य क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. आयात शुल्कात वाढ, हमीभावाने खरेदीत वाढ याबरोबरच देशातील कडधान्य उत्पादकांच्या थेट बॅंक खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

शेवटी ‘भाव भगवान आहे’ या म्हणीनुसार धोरणबदल करून कडधान्यांचे भाव पाडण्यापेक्षा हंगामातील पहिल्या चार महिन्यांत तरी ते मजबूत राहण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली पाहिजेत. तरच कडधान्यांची आयात १०-२० लाख टनाच्या कक्षेत नियंत्रित ठेवता येईल. अन्यथा, कडधान्य आयात देखील खाद्यतेलाच्या मार्गावर जाण्याचा धोका निर्माण होईल.

नाही म्हणायला येत्या काळात निसर्गाची कृपा होऊन ‘एल निनो’ लवकर संपुष्टात येऊन सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस होण्याचे अंदाज आल्याने कृषी बाजारपेठेतील मागील दोन वर्षांतील ताण-तणावाचे वातावरण निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. अर्थात, पावसाचे आगमन आणि वितरण हे दोन घटक कळीचे ठरणार आहेत.

कापसातील तेजी अल्पजीवी

कापूस बाजारात मागील महिन्यात आलेली तेजी अल्पजीवी ठरली असून अमेरिकेतील वायदे बाजारात कापूस १०३ सेंट्सवरून सुमारे २५ टक्के घसरला आहे. त्यामानाने भारतातील घसरण कमी असली तरी बाजारात परत मंदी आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात वस्त्रोद्योग निर्यात सलग दुसऱ्या वर्षी घटली आहे.

जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे ही घट झाल्याचे म्हटले आहे. मात्र सुती वस्त्रे आणि प्रावरणे यांची निर्यात ६ टक्के वाढली असल्याचे टेक्स्प्रोसील या सरकारी संस्थेने म्हटले आहे. जागतिक बाजार मंदीत असल्याने निर्यातीला ब्रेक लागला असल्याने बाजारात नजीकच्या काळात मोठी वाढ संभवत नाही.

हळद बाजारातील घडामोडी

मागील आठवड्यात आपण हळद बाजारावरील लेखात हळदीच्या किंमतीमध्ये मध्यम कालावधीमध्ये तेजी येण्यास पूरक घटकांची चर्चा केली होती. तसेच वायदे बाजारातील एप्रिल काँट्रॅक्ट समाप्तीमुळे तांत्रिक कारणांनी किंमतीत आलेल्या तात्पुरत्या करेक्शननंतर ही तेजी पहायला मिळेल असे म्हटले होते. त्याप्रमाणे एप्रिल काँट्रॅक्ट आता समाप्त झाले असून, प्रत्यक्षात चालू जून महिन्याच्या काँट्रॅक्ट मध्ये क्विंटलमागे २,००० रुपयांहून अधिक तेजी आली आहे.

याच लेखामध्ये २०२३-२४ या पणन हंगामाकरिता हळद उत्पादनाची जी आकडेवारी दिली होती, ती खासगी क्षेत्रातील विश्‍लेषक, निर्यातदार, व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संस्थांच्या अनुमानांवर आधारित होती. भारतातील आघाडीचे हळद निर्यातदार असलेल्या लक्ष्मी मसाले कंपनीनुसार वरील कालावधीकरिता हळदीचे अनुमानित उत्पादन ५ लाख १० हजार टन असून, मागील वर्षात ते ५ लाख ४० हजार टन होते. तर एव्हनटेल या रिसर्च संस्थेच्या अहवालात चालू वर्षासाठी अनुमानित उत्पादन ५ लाख २० हजार टन एवढे दाखवले आहे.

निजामाबाद येथील अनुभवी व्यापारी हा आकडा साडे पाच लाख टनांच्या आसपास असल्याचे म्हणत आहेत. केंद्र सरकारचे आकडे मात्र याच्याशी मेळ खात नाहीत. केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या मसाला मंडळाने ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अनुमानानुसार हळद उत्पादन ११ लाख टनांहून जास्त दाखवले होते. म्हणजे खासगी संस्थांच्या तुलनेत सरकारचे हळद उत्पादनाचे आकडे जवळपास दुप्पट आहेत. मसाला मंडळाचे सुधारित अंदाज अजून आलेले नाहीत. येत्या काही काळात सुधारित अंदाज प्रकाशित केले जातील आणि त्यात अनुमानित उत्पादनामध्ये घट दाखवली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com