Pulses
Pulses Agrowon

Pulses Market : कडधान्यांतील दरवाढ कायम राहण्याची शक्यता

Pulses Rate : संपूर्ण वर्षात केवळ पिवळ्या वाटाण्याची आयात २० लाख टन किंवा अधिक होऊ शकेल. याचा थेट परिणाम हरभऱ्याच्या किमती हमीभावाच्या आसपास राहण्यात होईल.

Pulses Market Update : मागील आठवड्यात आपण पिवळ्या वाटाण्याच्या सढळ आयातीमुळे हरभरा आणि तूर बाजारपेठेवर होऊ शकणाऱ्या परिणामांचा ऊहापोह केला होता. त्याप्रमाणे मागील काही दिवसांपासून हरभऱ्याच्या किमतीमध्ये नरमाईचा कल अजूनही संपलेला नाही. परंतु तुरीच्या किमतीवर अजून तरी कुठलाच परिणाम झालेला दिसत नाही.

उलटपक्षी महिनाभर १० हजार रुपयांच्या आसपास स्थिर राहिल्यानंतर तुरीच्या किमती परत सहा ते आठ टक्के वाढल्याचे दिसून येत आहे. याचे वेगवेगळे अर्थ लावता येऊ शकतात. एक म्हणजे आयात होत असलेला वाटाणा बाजारात येण्याऐवजी थेट गोदामांमध्ये जात आहे.

किंवा तुरीसह सर्व कडधान्यांमध्ये साठवणुकीचा कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात या पिकांच्या किमती कशा राहतील आणि त्यावर इतर कुठल्या घटकांचा प्रभाव राहील हे ही पाहणे महत्त्वाचे आहे.

अंतर्गत घटक

सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही तुरीवर नियंत्रण मिळवणे कठीण दिसू लागल्यामुळे पिवळा वाटाण्याच्या खुल्या आयातीची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. ती कदाचित पूर्ण वर्षासाठी, पण टप्प्याटप्प्याने, वाढवली जाण्याची शक्यता आता व्यापारी वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

असे झाल्यास कॅनडा, रशिया आणि इतर छोट्या देशांमधील पीकपाणी पाहता या संपूर्ण वर्षात केवळ पिवळ्या वाटाण्याची आयात २० लाख टन किंवा अधिक होऊ शकेल. याचा थेट परिणाम हरभऱ्याच्या किमती हमीभावाच्या आसपास राहण्यात होईल. तसेच तुरीत नरमाई आणता आली नाही तरी तेजी बोथट करण्यात केंद्र सरकार नक्कीच यशस्वी होईल, असे सध्याचे चित्र आहे.

दुसरी शक्यता म्हणजे कडधान्य पुरवठा वाढविण्यासाठी यापुढील काळात हिरव्या वाटाण्याची आयात देखील खुली केली जाऊ शकते. त्यातून तीन ते चार लाख टन वाटाणा सहज आयात होऊ शकेल. म्हणजे निदान पुढील तुरीच्या हंगामापर्यंत कडधान्य महागाई आहे त्या स्थितीत ठेवणे शक्य होईल.

रिझर्व्ह बॅंकेने नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये पुढील काळात खाद्य महागाई कमी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. तर केंद्र सरकारने कडधान्य पुरवठा पोर्टलवर घोषित करण्यासाठीच्या सक्तीची मुदत वाढवली आहे. यातून एक बोध मिळत आहे तो म्हणजे पुढील सहा महिने तरी कडधान्य महागाई स्थिर राहण्याची शक्यता जास्त आहे.

बाह्य घटक

कोणत्याही पिकाचा बाजारकल ठरवण्यात उत्पादन, मागणी याबरोबरच हवामान या घटकाचा देखील महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे येत्या तिमाहीमध्ये विक्रमी उष्णतेच्या लाटा येण्याचा हवामान संस्थांचा इशारा आणि त्याचबरोबर दुष्काळाच्या छटा तीव्र होत गेल्यामुळे राज्यात आणि देशाच्या अनेक भागांत सुरू झालेली पाणीटंचाई या पार्श्‍वभूमीवर पुढील काळात अन्नमहागाईची समस्या परत डोके वर काढू शकेल.

सामान्यपणे या काळात वाढलेला भाजीपाला पुरवठा, आंब्यांचा हंगाम यामुळे कडधान्यांची मागणी कमजोर होत असते. परंतु पाणीटंचाईमुळे भाज्यांच्या हंगाम नरम राहील व कांदे, बटाटे आणि कडधान्य यांच्या मागणीत अपेक्षेहून अधिक वाढ झाल्यामुळे त्या प्रमाणात किमती वाढून खाद्य महागाईला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे.

हवामानाबरोबरच कमोडिटी बाजारावर कायम आपला प्रभाव ठेवणाऱ्या खनिज तेलाच्या भरमसाट वाढलेल्या किमतीदेखील कृषिमाल बाजारपेठेचा कल ठरवत असतात. मागील चार-सहा आठवड्यांत कच्चे तेल ७० डॉलर्सवरून ८६ डॉलर्स प्रतिपिंप म्हणजे २२-२३ टक्के वाढले आहे.

याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम सहा-आठ आठवड्यांनंतर दिसून येतो. म्हणजे या महिनाअखेरपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवण्यासाठी तेल कंपन्या आणि अर्थजगताचा दबाव येऊ शकेल. मे मध्यापर्यंत चालणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका पाहता कदाचित ही वाढ काही काळापुरती पुढे ढकलली जाईल एवढेच.

Pulses
Pulses Procurement : तेलबिया, कडधान्य खरेदीच्या एजन्सी नियुक्तीसाठी नवे धोरण

याव्यतिरिक्त व्याजदर कपातीच्या अपेक्षेने अमेरिकी डॉलर वाढत असताना आधीच नीचांकाजवळ घसरलेल्या रुपयावर अधिक ताण येईल. त्यातून खाद्यतेले आणि इतर आयातीत अन्न, वस्तूंच्या किमती वाढून महागाईच्या चिंतेत वाढच होईल.

वरील सर्व परिस्थिती आणि भारतीय लोकांचे कडधान्यांशी असलेले नाते याची पुरेपूर जाणीव परदेशी निर्यातदारांना असल्यामुळे आपल्या उत्पादनाच्या किमती ते चढ्याच ठेवतील.

जूननंतर कदाचित चांगल्या पावसाच्या अपेक्षेने आणि कच्च्या तेलात नरमाई आल्यास बाजारकल फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल. परंतु खरीप पेरण्या पूर्ण होईपर्यंत तरी प्रत्यक्ष किमती खाली येण्याची शक्यता दिसत नाही.

कस्तुरी कापूस नियोजन

या महिन्याअखेर सिंचनाची आणि पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रात कापूस लागवडीला सुरुवात होईल. पंजाबमध्ये यापूर्वीच कापसाची लागवड सुरू झाल्याची माहिती आहे. या स्तंभातून मागील पाच-सहा आठवड्यांत कस्तुरी भारत या कापसाच्या ब्रॅण्डिंगविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.

कापूस महामंडळ आणि टेक्स्प्रोसील या दोन केंद्रपुरस्कृत संस्थांच्या सहकार्याने चांगल्या दर्जाच्या कापसापासून कस्तुरी ब्रॅण्ड गाठी तयार करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. हेतू हा की भारतीय कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात ऑस्ट्रेलिया, अमेरिका किंवा इजिप्तच्या बरोबरीने विकला जावा. त्यातून काही अब्ज डॉलर्सचा अधिक परतावा भारतीय कापसाला मिळाल्याने त्याचा फायदा मूल्य साखळीतील सर्वांना मिळेल. या प्रयत्नांना चांगले यश येताना दिसत आहे.

Pulses
Pulses Trade Restrictions : व्यापार निर्बंध अखेरच्या टप्प्यात?

कस्तुरी ब्रॅण्ड परिचयात्मक कार्यक्रम शृंखलेत वरील दोन्ही संस्थांनी नुकतेच परभणी आणि जळगाव या दोन ठिकाणी जिनर्स आणि शेतकरी यांच्यासाठी कार्यक्रम केले. त्यामध्ये कापूस महामंडळाचे औरंगाबाद विभागाचे कापूस खरेदी प्रमुख देखील उपस्थित होते.

या वेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. एक म्हणजे कस्तुरी दर्जाचा कापूस मिळण्यासाठी आणि त्यामुळे क्विंटलमागे शेतकऱ्याला २०० रुपये अधिक मिळण्यासाठी बियाणे हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढील काळात बियाणे घेतानाच काळजी घेणे गरजेचे आहे. विक्रेत्याला त्या बियाण्यातून कुठल्या दर्जाचा कापूस (२७ किंवा २९ एमएम) निर्माण होणार याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने अशी विचारणा केल्यास यातून विक्रेत्यावर देखील दबाव निर्माण होईल आणि चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्याची वाट मोकळी होईल.

त्याच बरोबर कापूस महामंडळाकडून देखील शेतकरी आणि जिनर्स या दोघांनाही पुढील हंगामापासून कस्तुरी कापसासाठी अधिक मोबदला मिळण्याचा दरवाजा लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. सामान्यपणे पहिल्या वेचणीचा कापूस चांगल्या दर्जाचा असतो. तो नंतरच्या वेचण्यांतील कापसाबरोबर न मिसळता वेगळा ठेवला पाहिजे. तर कस्तुरी दर्जाच्या गाठी तयार करण्यासाठी त्याचा वापर करता येईल.

तसेच कापूस महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांसाठी येत्या हंगामात कस्तुरी कापसाला अधिक भाव देण्याची योजना असल्याचे सांगितले आहे. मात्र हमीभाव खरेदीमध्ये हे शक्य होणार नाही; तर महामंडळाची खुल्या बाजारातील व्यापारी तत्त्वावरील खरेदी करताना क्विंटल मागे अधिक भाव देण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे.

शेतकऱ्यांसाठीच नाही तर जिनर्ससाठी देखील कस्तुरी ब्रॅण्ड गाठी बनवण्याच्या प्रक्रियेसाठी सध्याच्या प्रतिगाठ ११७० रुपयांऐवजी १०-१५ टक्के अधिक मोबदला देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून एक स्पष्ट होत आहे, की यापुढील काळात कस्तुरी ब्रॅण्ड यावरच सरकारची भिस्त राहणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील हंगामाचे नियोजन करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. गरज भासल्यास याबाबत संस्थात्मक पातळीवर परिचयात्मक कार्यक्रम घेण्यासाठी शेतकरी नेते आणि संस्था यांच्यावर दबाव आणावा. निवडणुका तोंडावर असल्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com