
Amravati News: तापमान वाढीमुळे यंदा आंबिया बहारातील संत्रा फळांची गळती होत आहे. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होत आहे, मात्र यातून बागायतदारांना चांगला दर आणि परतावा मिळेल, अशी अपेक्षा श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी व्यक्त केली.
मृग बहरातील संत्रा उत्पादकता अनेक कारणांनी प्रभावीत झाली. त्यामुळे यावर्षी मृग बहर घेणाऱ्या संत्रा उत्पादकांना चांगला परतावा मिळाला. सध्या मृगाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून काही शेतकऱ्यांकडे बागेत शिल्लक असलेल्या संत्रा फळांचे दर ५५ हजार रुपये टनांवर पोहोचले आहेत. त्याचवेळी कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेल्या संत्रा फळांना त्यापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याचे जिचकार यांनी सांगितले.
अशीच काहीशी स्थिती यंदा आंबिया बहरातही राहील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सध्या विदर्भात उन्हाचा पारा वाढता आहे. संत्रा बागांसाठी आवश्यक तापमानापेक्षा तीन अंश सेल्सिअस तापमान अधिक आहे. तापमानातील वाढ आणि त्याच्या परिणामी होणारी फळगळ याच कारणामुळे आंबिया बहरातील संत्र्याला यावर्षी चांगला परतावा मिळेल, असे ते सांगतात.
सप्टेंबर अखेरीस आंबिया बहरातील फळांची आवक सुरू होते. त्यानंतर जानेवारीपर्यंत या हंगामातील फळांची उपलब्धता होते. गेल्या हंगामात आंबिया बहरातील फळांना १५ ते १७ हजार रुपयांचा दर मिळाला होता. मात्र यावर्षी आतापासूनच लहान आकारातील फळांची गळ सुरू होत आहे. त्याच कारणामुळे आंबिया बहरातील फळांचे दर ३५ हजार रुपये टनपेक्षा अधिक राहतील, असे जिचकार यांनी सांगितले.
तापमानात वाढीबरोबरच गेल्या वर्षी झालेल्या संततधार त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसामुळे सध्या अनेक भागात कीड-रोगांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. त्याचादेखील परिणाम उत्पादकतेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेसुद्धा आंबिया बहरातील फळांचे दर तेजीत राहतील, असे सांगण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.