
Amravati News: तापमानातील वाढ, अवेळी पडणारा पाऊस, वातावरणातील बदल यासह इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादकतेवर परिणाम झाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंबिया बहरातील फळांना ४५ ते ५० हजार रुपये प्रतिटन दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्टमध्ये आंबिया बहरातील फळांची आवक होणार आहे.
संत्रा विपणन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात २५ ते ३० टक्क्यांच्या मर्यादेत आंबिया बहराची फळे शिल्लक राहिलेली आहेत. सुरुवातीच्या काळात काढलेली अल्प प्रमाणातील फूट, अति उष्णतेमुळे झालेली संत्रा फळगळ, पावसाळ्यात झालेली बुरशीजन्य पिवळी होऊन गळलेली फळे यांमुळे आंबिया बहराच्या संत्रा फळांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला.
परिणामी, उच्च प्रतीच्या, दर्जेदार बागा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथे अमरावती, वरुड, मोर्शी, अचलपूर येथीलच नाही तर सौंसर (मध्य प्रदेश), गाझियाबाद (उत्तर प्रदेश), राजस्थान येथील व्यापारी संत्र्यांचे सौदे करण्यासाठी दाखल झाले. त्यामुळे यंदा चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
या वर्षी संत्रा बागांवर फुलधारणा तर झाली परंतु त्याचे रूपांतर फळांत झाले नाही, तसेच जानेवारीमध्ये नवती व फुलधारणेच्या क्रियेमध्ये सिट्रससायला रोगाने झाडांचे शेंडे वाळवून टाकले; परिणामी झाडांवर फुटीच्या तुलनेत फळे कमी आहेत, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात बाजारपेठेत आवक कमी राहून भावांमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
फक्त २५ ते ३० टक्के संत्रा उत्पादकांना चढ्या दरांचा फायदा
अमरावती जिल्ह्यात संत्रा पीक ८२ हजार ३७८ हेक्टर क्षेत्राखाली आहे. यापैकी आंबिया बहर अंदाजे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो. फेब्रुवारी-मार्चमध्ये आंबिया बहराकरिता फुटीनंतर फळे सेट होण्याचा काळ असून, या वर्षी याच कालावधीत तापमानाने चाळिशी गाठली. त्याचा थेट परिणाम फूट-फळगळीवर झाल्याने सद्यःस्थितीत एकूण २५ ते ३० टक्के बागांमध्येच संत्रा फळे शिल्लक असल्याचे सांगितले जाते.
विमा ट्रिगर कालावधी वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, गारपीट या बाबींसाठीच विमा मर्यादित न ठेवता ऑक्टोबरपर्यंत विमा संरक्षण कालावधी वाढवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. संत्रा हे वार्षिक पीक असल्याने विमा कवच संपूर्ण वर्षभर असायला पाहिजे. वेगाच्या वाऱ्यामुळे संत्र्याचे नुकसान होत असल्याने याचा समावेश विमा योजनेत करण्यात यावा, असे पीकविमा शेतकरी प्रतिनिधी पुष्पक खापरे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.