
फ्युचर्स किमतीः सप्ताह- २४ ते ३० मे, २०२५
महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन यंदा नेहमीपेक्षा लवकर झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहील. १ जून पासून NCDEX मध्ये ऑक्टोबर डिलीवरीसाठी मक्याचे व डिसेंबर डिलीवरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू होतील. यामुळे NCDEX मध्ये पुढील महिन्यात कपाशीचे नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलीवरीसाठी, मक्याचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलीवरीसाठी तर हळदीचे जून, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर डिलीवरीसाठी व्यवहार चालू असतील. MCX मध्ये कापसाचे जुलै व सप्टेंबर डिलीवरीसाठी व्यवहार चालू असतील.
या सप्ताहात खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर झाले. कमीत कमी वाढ (१ टक्का) मुगाच्या हमीभावात झाली, तर सर्वात अधिक वाढ रागीमध्ये (१३.९ टक्के) झाली. इतर प्रमुख पिकांपैकी ज्वारी (९.६ ते ९.७ टक्के), कारळ (९.४ टक्के), सोयाबीन (८.९ टक्के) व कापूस (८.३ टक्के) अशी हमीभाव वाढ झाली.
हमीभाव मे महिन्यात जाहीर करण्याचा हेतू शेतकऱ्यांना यातून पीक-पेरणीला मार्गदर्शन मिळावे हा असतो. ऑक्टोबर नंतर शेतवस्तुंचे भाव काय असतील याचा अंदाज मे-जून मध्ये करणे कठीण आहे. या वर्षी तर ते जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे जाहीर झालेले हमीभाव पेरणीसाठी एकमेव मार्गदर्शक आहेत. साधारणतः ऑगस्ट मध्ये पुढील भावांचा अंदाज करता येईल.
फ्यूचर्स भाव त्यासाठी उपयोग पडतील. काही सांख्यिकीय प्रारूपेसुद्धा त्यासाठी वापरता येतील. या महिन्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खरेदीदारांशी बोलणी करावीत व हमीभावाने किंवा अधिक भावाने विक्री करण्याचे करार करावेत. मका किंवा कापूस यांच्यासाठी, जर फ्युचर्स भाव हमीभावांपेक्षा अधिक असतील तर हेजिंग करावे.
बाजारभाव जर हमीभावापेक्षा कमी होण्याची शक्यता असतील तर ऑगस्टपासूनच खरेदीसाठी शासनाच्या मागे लागावे. विक्रीच्या नियोजनासाठी व हमीभावापेक्षा अधिक भाव कसा मिळेल यासाठी सर्व प्रयत्न असावेत.
जर शेतकरी एकत्र आले व त्यांनी पुरवठ्यावर नियंत्रण आणले तर बाजारातल्या किमतींवर ते निश्चितपणे परिणाम करू शकतील. शासनाकडे फ्यूचर्स व ऑप्शन व्यवहार अधिकाधिक शेती-मालासाठी उपलब्ध करण्यासाठी सतत मागणी करावी. यामुळे शेतकरी एकत्र येऊन खरेदी-विक्री करतील व सतत वाढत असलेली जोखीम कमी करू शकतील.
या सप्ताहात कापूस, मूग, सोयाबीन, व तूर यांच्या किमती घसरल्या. कांद्याच्या किमती वाढल्या. ३० मे २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.५ टक्क्याने घसरून रु. ५४,१८० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव सुद्धा ०.४ टक्क्याने घसरून रु. ५४,४०० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५७,५०० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६.१ टक्क्यांनी अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात १.५ टक्क्यांनी घसरले.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,४७७ वर आले होते. या सप्ताहात ते रु. १,४७८ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स ०.१ टक्क्यांनी घसरून रु. १,५२६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत. एप्रिल फ्युचर्स रु. १,६०० वर आले आहेत.
कापसाचे या वर्षासाठी (२०२५-२६) हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,७१० व लांब धाग्यासाठी रु. ८११० आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात रु. २,२२१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२२२ वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती रु. २,२३१ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,२४२ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.५ टक्क्यांनी अधिक आहे. मक्याचा यंदाच्या हंगामासाठी हमीभाव रु. २,४०० आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमी भावापेक्षा कमी आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात १.५ टक्क्यांनी घसरून रु. १४,३८९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने वाढून रु. १४,४४७ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती १.८ टक्क्यांनी वाढून रु. १४,३०० वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १४,४३० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.१ टक्क्यांनी कमी आहेत. सांगली मधील (राजापुरी) स्पॉट भाव ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १५,४८८ वर आला आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने वाढून रु. ५,८५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक वाढती आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १ टक्क्याने घसरून रु. ७,२०० वर आली आहे. मुगाचा चालू हंगामासाठी हमीभाव रु. ८,७६८ जाहीर झाला आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,४४४ वर आली होती. या सप्ताहात ती २.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,३४३ वर आली आहे. चालू वर्षासाठी हमीभाव रु. ५,३२८ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात १.८ टक्क्यांनी घसरले.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ६,८१६ वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. ६,७५८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ८,००० आहे. आवक कमी होऊ लागली आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात वाढून रु. १,४३८ वर आली आहे. कांद्याची आवक कमी होत आहे. किमती आता वाढू लागतील.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,७०० वर आली होती; या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.