Onion Market : जूनमध्ये कांदा आवक घटण्याची शक्यता

Onion Rate Maharashtra : मागील दोन आठवड्यांपासून बाजारातील कांदा आवक पावसामुळे काहीशी कमी झाली आहे. त्यातही बाजारात येणारा गुणवत्तापूर्ण माल कमी आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण मालाचे भाव वाढले आहेत, असे व्यापारी सांगत आहेत.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Pune News : कांदा दरात मागील आठवडाभरात सुधारणा दिसून येत आहे. मात्र, कांदा उत्पादकांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. कांद्याची गुणवत्ता कमी झाली.

पाऊस आणि तापमानातील चढ-उताराचा धोका कायम आहे. त्यामुळे जून महिन्यात कांदा आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराला आधार असेल. शिवाय नाफेडची कांदा खरेदी होते का आणि कशी होते, याचाही परिणाम दिसेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

मागील दोन आठवड्यांपासून बाजारातील कांदा आवक पावसामुळे काहीशी कमी झाली आहे. त्यातही बाजारात येणारा गुणवत्तापूर्ण माल कमी आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण मालाचे भाव वाढले आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. पावसात भिजलेला आणि कमी गुणवत्तेच्या मालाचे भाव प्रति क्विंटल ३०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत आहेत. तर गुणवत्तापूर्ण माल १४०० ते १८०० रुपयाने विकला जात आहेत.

कांद्याचा कमाल दर वाढलेला दिसत असला तरी शेतकऱ्यांचे गणित मात्र बिघडलेले आहे. राज्यात जवळपास १२ मे पासून पावसाला पोषक वातावरण होते. त्यानंतर राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाला. १८ मे नंतर पावसाचा जोर वाढून शेतीपिकांनाही दणका बसला. यात कांद्याचे मोठे नुकसान झाले. शेतात काढणीसाठी तयार कांदा, काढणी करून सुकवण्यासाठी ठेवलेला कांदा, बाजारात विक्रीच्या हिशोबाने ठेवलेला कांदा आणि चाळीतील काद्यांचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Onion
Onion Procurement: केंद्राच्या कांदा खरेदीचे घोडे आडले कुठे?

कळवण तालुक्यातील (जि. नाशिक) बोर्डी गावाचे अभ्यासू कांदा उत्पादक पंडित वाघ यांनी सांगितले, की पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. मजुरांची टंचाई होती. त्यामुळे वेळेत काढणी झाली नाही. यंदा कांदा काढणी खूपच पुढे-मागे झाली. २ ते ४ टक्के शेतकऱ्यांचा कांदा काढायचाच बाकी होता. नेमका याच काळात पावसाने दणका दिला. हा पूर्ण कांदा खराब झाला.

नगर जिल्ह्यातील नेवासा येथील प्रगतिशील शेतकरी काशिनाथ पागिरे सांगतात, की यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र वाढले होते. श्रीगोंदा, राहुरी भागांत लागवडी जास्त दिसल्या. मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कांदा काढणी झाली होती. शेतकऱ्यांनी हा कांदा शेतातच सुकण्यासाठी ठेवला होता.

पावसाचे वातावरण झाल्यानंतर अंदाज हाच होता की, मे महिन्यात दर वर्षीप्रमाणे एक-दोन दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल. त्यानुसार शेतकऱ्यांनी पावसापासून कांद्याचा बचाव करण्यासाठी उपाय केले.

पण दोन आठवडे पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याची रास करून कांदा झाकून ठेवला होता पण खालून पाणी शिरले. एवढा पाऊस होईल, याचा अंदाजच आला नाही. त्यामुळे शेतातील कांद्याचे मोठे नुकसान झाले, असे पागिरे यांनी सांगितले.

Onion
Onion Rate : चार दिवसांपासून कांदा दरात काहीशी वाढ

चाळीतील कांद्याचे काही ठिकाणी नुकसान

कांद्यासाठी यंदा वातावरण विचित्र राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कांदा काढणीच्या काळात विक्रमी उष्णता होती. त्याचा परिणाम पिकावर दिसतच होता. कांदा काढणीनंतर शेतकऱ्यांनी चाळीत साठवला. पण अनेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीची चांगली व्यवस्था नाही.

ज्या शेतकऱ्यांनी लवकर कांदा चाळीत साठवला त्यांच्या कांद्याचे नुकसान दिसत नाही. मात्र पाऊस पडण्याच्या आसपास चाळीत साठवलेल्या कांद्यावर विक्रमी उष्णता आणि नंतर लगेच पावसामुळे कमी झालेले तापमान याचा परिणाम झाला. कांदा चाळीत खराब होत आहे, असे शेतकरी सांगत आहे.

चिंता कायम

शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला. पण तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. मे महिन्याच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी उष्णता, नंतर पाऊस झाला. जून महिन्यात तापमानात जास्त वाढ झाली किंवा मोठे चढ-उतार राहिले तर चाळीतील कांद्यावर याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आवक कमी

सध्या बाजारातील कांद्याची आवक कमी आहे. जून महिन्यात शेतकरी लागवडी आणि शेतीकामात व्यग्र असतील. तसेच पाऊस असेल तर शेतकरी चाळी फोडणार नाहीत. त्यामुळे जून महिन्यातील कांदा आवक सरासरीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भाव काहीसे वाढू शकतात. या काळात शेतकऱ्यांनी कांद्याची गुणवत्ता आणि बाजारभाव पाहून विक्रीचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

पावसाचा कांदा पिकाला फटका बसला आहे. बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण माल कमी येत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. जून महिन्यात कांदा आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.
- मनोज जैन, कांदा व्यापारी आणि निर्यातदार, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील काही भागात कांदा पिकावर मे महिन्यातील उष्णता आणि पावसाचा परिणाम झाला आहे. पावसाने गुणवत्ता कमी झालेला कांदा शेतकऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी लगेच चाळी फोडण्याची शक्यताही कमीच आहे.
- काशिनाथ पागिरे, कांदा उत्पादक, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com