Onion Market : नामपूरमध्ये कांदा लिलाव १४ दिवस बंद राहणार

Onion Auction Closed : दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर नामपूर बाजार समितीच्या आवारातील, ऐन कांद्याच्या दरवाढीच्या काळात पहिल्यांदा तब्बल दोन आठवडे कांदा मार्केट बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कांदा लिलाव बंद
कांदा लिलाव बंद Agrowon
Published on
Updated on

Nashik News : दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर नामपूर येथील बाजार समितीच्या आवारातील कांद्याचे लिलाव मंगळवारपासून (ता. ७) २० नोव्हेबरपर्यंत बंद राहणार आहेत. ऐन कांद्याच्या दरवाढीच्या काळात पहिल्यांदा तब्बल दोन आठवडे कांदा मार्केट बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बंदमुळे मार्केटची कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प होणार आहे. आर्थिक टंचाई, मंजूर टंचाई, कांदा व्यापाऱ्यांचा विनंती अर्ज आदी बाबींमुळे कांदा खरेदी मार्केट बंद राहणार आहे.

पणन संचालनालयाने अधिसूचना काढून तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समिती बंद ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र असे असताना तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस बाजार बंद राहिल्यास शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे पणनच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मागणीच्या तुलनेत कांद्याच्या पुरवठ्यात घट झाल्यानंतर कांद्याला मागील सप्ताहात ५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत होते; मात्र केंद्र शासनाने मागील सप्ताहात निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला किमान निर्यात मूल्य प्रतिटन ८०० डॉलर केले. त्याचा फटका बाजार कामकाजावर झाला. त्यामुळे दरात दीड हजार रुपयांवर घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कांदा लिलाव बंद
Chana Farming : हरभरा बीजोत्पादनात देशमुखांचे नाव खात्रीचे

केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी अस्थिर निर्णयामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे नामपूर शहर कांदा व्यापारी असोसिएशन यांच्या मागणीनुसार कांदा मार्केट दोन आठवडे बंद राहणार आहे. मात्र तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस मार्केट बंद करू नये, असे आदेश पणन संचालक यांनी दिले असले तरी नामपूरसह जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद राहणार असल्याने बाजार समित्यांनी पणनच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. ऐन भाववाढीच्या काळात कांदा खरेदी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यतींद्र पगार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. परंतु कांदा व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे बाजार समितीचे संचालक मंडळ टीकेची धनी होण्याची शक्यता आहे.

कांदा लिलाव बंद
Warana Milk : वारणा दूध संघातर्फे जातिवंत जनावरांचे प्रदर्शन, वारणा श्री किताबही मिळणार
दिवाळीच्या काळात भेडसावणारी मजूर टंचाई कांद्याचे लिलाव बंदचे प्रमुख कारण आहे. कांद्याच्या दराबाबत दैनंदिन दोलायमान स्थिती असल्याने कांदा व्यापारी माल खरेदी करून धोका पत्करण्यास तयार नसतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती प्रशासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी २१ तारखेला कांदा विक्रीस आणावा. शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे.
युवराज पवार, उपसभापती, नामपूर बाजार समिती
नऊ महिने साठविलेला चाळीतील कांदा खराब होऊ लागला आहे. नामपूरला दैनंदिन सुमारे २७/३० हजार क्विंटल कांद्याची आवक होत असून १४ दिवस तुंबलेला माल एकाच वेळी मार्केटला आल्यास कांद्याचे भाव पाडले जातील. संचालक मंडळाने याबाबत पुनर्विचार करावा.
शैलेंद्र कापडणीस
जिल्हा उपाध्यक्ष-शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना दिवाळीच्या काळात व्यापाऱ्यांनी बाजार समितीत लिलाव बंद ठेवू नये. शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीचे नियोजन बाजार समितीकडून करण्यात यावे. शेतकऱ्यांना आर्थिक गरज असल्याने सणासुदीला कामकाज सुरू ठेवावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
- फय्याज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com