
Kolhapur News: उत्तर प्रदेशातील जी एस ऊस प्रजनन आणि संशोधन संस्था आणि उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेमधील तज्ज्ञांनी लाल कुज रोगाला प्रतिकारक ठरणाऱ्या उसाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनवाढीच्या दृष्टीनेही या जाती फायदेशीर ठरणार आहेत, असा ऊस तज्ज्ञांचा दावा आहे.
उसाची सीओ ०२३८ (करण) ही जात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या जातीमध्ये लाल कुज रोग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने उत्पादनात घट दिसून आली आहे. या जातीला पर्याय म्हणून सीओएसई-१७४५१ आणि सीओएसएच-१९२३१ या दोन नव्या जाती विकसित करण्यात आल्याचे ऊस आयुक्त प्रभू एन सिंह यांनी सांगितले.
सेओराही येथील जी एस ऊस प्रजनन आणि संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी पॉलिक्रॉस पद्धतीने सीओएसई- १७४५१ या जातीची निर्मिती केली आहे. शाहजहापूरमधील उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेतील तज्ज्ञांनी सीओएसई ९५४२२ जातीमध्ये आंतर-संकरीकरण तंत्राचा वापर करून सीओएसएच-१९२३१ या जातीची निर्मिती केली आहे.
सीओएसएच-१९२३१ या जातीची संपूर्ण उत्तर प्रदेशात आणि सीओएसई- १७४५१ जातीची उत्तर प्रदेशातील पूर्व विभागामध्ये लागवडीची शिफारस आहे. या जातींमध्ये साखरेसाठीच्या रसाचे प्रमाण १७.८ टक्के आणि सुक्रोजचे प्रमाण १३.२ टक्के आहे, जे पारंपरिक जातींपेक्षा जास्त आहे.
काकोरी प्रकरणातील शहीद राजेंद्र नाथ लाहिडी यांच्या सन्मानार्थ सीओएसएच-१९२३१ या जातीला ‘लाहिडी’ हे नाव देण्यात आले आहे. सीओएसई-१७४५१ या जातीला ‘कृष्ण’ हे नाव देण्यात आले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा नंद यांनी ही जात विकसित केली आहे. याव्यतिरिक्त, सीओएलके-१६४७० या जातीला उत्तर प्रदेशातील पूर्व विभागासाठी मध्य-उशिरा पक्व होणारी जात म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मर्यादित लोकप्रियता आणि कमी लागवडीमुळे सीओ-१२०२९, सीओएसइच-९९२२९ आणि सीओएसइच-९६२६८ या जातींची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
लाल कुज रोगाचा परिणाम
उत्तर प्रदेश, बिहार राज्यात प्रथम लाल कुज रोग दिसून आला. रोगकारक बुरशी वारा, पाऊस आणि कीटकांमुळे पसरते. रोगाचा प्रादुर्भाव सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत होतो. प्रादुर्भावामुळे उसाचे वजन २९ टक्क्यांनी कमी होते. उसाचा दर्जा खालावतो. २५ ते ७५ टक्के सुक्रोज कमी होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.