Sugarcane Nutrient Management: उस उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन आणि आंतरपिके तंत्रज्ञान!

Sugarcane Fertilizers Management: सुरू उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन आणि आंतरपिकांचा समतोल वापर महत्त्वाचा आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश खतांचे प्रमाण संतुलित केल्यास ऊसाचा विकास जलद होतो. यासोबतच आंतरपिके घेतल्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादन खर्चातही बचत होते.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. दत्तात्रय थोरवे

Sugarcane Farming: सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी. उसाचे पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर नत्र खताचा तिसरा हप्ता देऊन बाळबांधणी करावी. ऊस पीक ४ ते ४.५ महिन्यांचे झाल्यानंतर रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करावी.

सुरू उसाचा कालावधी १२ महिने आणि त्यानंतर एक किंवा त्यापेक्षा जास्त खोडवे घेण्यासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. ऊस लागवडीपूर्वी माती तपासणी करून अहवालानुसार खताचे नियोजन करावे. उसाची मुळे १ ते १.५ मीटर खोलीपर्यंत जात असल्याने खोल नांगरट करणे गरजेचे आहे. भारी जमिनीतील १.५ ते २ फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी ५ फूट अंतरावर उताराच्या दिशेने मोल नांगराने नांगरट करावी.

अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ ते ०.६ टक्क्यापेक्षा जास्त असावे. लागण केल्यानंतर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कायम राखण्यासाठी ठिबक सिंचन, पाचटाचा वापर, आंतरपिके आणि आंतरमशागत या तंत्राचा वापर करावा.

सुरू उसाला हेक्टरी १० टन आणि सऱ्या पाडल्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत जमिनीत मिसळून द्यावे किंवा ताग, धैंचा जमिनीत गाडावा. कारखान्याचे प्रेसमड कंपोस्ट उपलब्ध असल्यास हेक्टरी ६ टन चोपण जमिनीत मिसळावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामधून द्यावे. हुमणी नियंत्रणासाठी सरीमध्ये मेटारायझियम अ‍ॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना हेक्टरी २० ते २५ किलो प्रति १२५ किलो शेण खतातून मिसळावे.

Sugarcane Farming
Sugarcane Farming: उसाला तुरा यावा की येऊ नये?

बुरशीजन्य रोग नियंत्रण तसेच कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि ३०० मिलि डायमेथोएट १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अ‍ॅसिटोबॅक्टर १० किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.

जिवाणू संवर्धकामुळे प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र आणि २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते, उत्पादनात वाढ होते. बेणे प्रक्रिया करताना शेडनेटचे कापड वापरून त्यात बेणे टाकून त्यासह बेणेप्रक्रिया करावी. या पद्धतीने बेणे बुडविणे आणि काढणे या प्रक्रिया कमी कष्टात व सुलभ होते.( ॲग्रेस्को शिफारस)

सरीतील जास्त आंतर, उसाची सावकाश होणारी उगवण, वाढीचा कमी वेग, जमिनीचा प्रकार, कॅनॉलच्या पाण्याचा अतिरिक्त वापर, कच्चा शेणखताचा वापर, रासायनिक खतांचा जास्त आणि असमतोल वापर, तापमान आणि पीक पद्धती यामुळे तणे आढळून येतात. हरळी, लव्हाळा आणि गुंडाळणाऱ्या वेलवर्गीय तणांमुळे ऊस उत्पादनात हमखास घट येते. सुरुवातीला ४ महिने तणे उसाबरोबर स्पर्धा करीत असतात. उसाच्या वाढीवर परिणाम करतात. विशेषतः फुटवे फुटताना आणि कांडी लागताना तणे त्रासदायक ठरत आहे.

उसाचे पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर नत्र खताचा तिसरा हप्ता देऊन बाळबांधणी करावी. ऊस पीक ४ ते ४.५ महिन्यांचे झाल्यानंतर रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करावी. यांत्रिक पद्धतीने मशागत केल्यास तणनियंत्रण, मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, ओलीचे संरक्षण, कीड व रोग नियंत्रण आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण राखण्यात मदत होते.

आंतरपिके

ऊस लावल्यानंतर उगवण पूर्ण होण्यास ३ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर फुटवे फुटण्यास सुरुवात होते. फुटव्यांची पूर्ण वाढ होण्यास आणि संपूर्ण रिकामे क्षेत्र झाकण्यासाठी ३ ते ४ महिने लागतात. फुटव्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोन सरींतील जागा रिकामी राहते.

ऊस पिकात आंतरपीक घेताना ते अधिक पैसा देणारे, कमी कालावधी येणारे, बाजारपेठ जवळ असणारे, जमिनीची कार्यक्षमता वाढविणारे आणि उसावरील उत्पादन खर्च कमी करण्यास मदत करणारे असावे. सर्वसाधारणपणे उसाच्या मोठ्या बांधणीपूर्वी आंतरपिकाची काढणी होईल असे पीक घ्यावे.

वेलवर्गीय पिकांचे वेल उसात जाऊ नये म्हणून वरच्यावर रिकाम्या जागेत सावरावे.

आंतरपिके पीक ४.५ ते ५ फूट सरीमध्ये प्रमाण

भाजीपाला पिके कांदा, भेंडी, चवळी, गवार, राजमा, घेवडा, पालक, मेथी, पालक, कोथिंबीर १ः२ किंवा १ः३

वेलवर्गीय पिके टरबूज, कलिंगड, काकडी, दोडका, कारली, दुधी भोपळा १ः१

तेलबिया पिके भुईमूग, सूर्यफूल १ः२ किंवा १ः१

कंदवर्गीय पिके गाजर, मुळा, लालबीट १ः१ किंवा १ः२

हिरवळीच्या खतांची पिके ताग, धैंचा, चवळी १ः२

Sugarcane Farming
Sugarcane Farming : उस उत्पादनात मोठी भरारी ; एकरी १२४-१२८ टन उत्पादन

सुरू हंगामासाठी जाती

सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने सुरू हंगामासाठी विविध जातींची लागवडीसाठी शिफारस केली आहे.

शिफारशीत जातींचे उत्पादन आणि वैशिष्ट्ये

जात सरासरी उत्पादन

(टन/हे.) वैशिष्ट्ये

ऊस साखर

को.८६०३२ (निरा) १०६.०० १४.४४ एकरी ७५ टनांपेक्षा अधिक उत्पादन.

को.एम.०२६५ (फुले-२६५) १५०.०० २०.३१ को.८६०३२ पेक्षा २० ते २५ टक्के जादा उत्पादन, क्षारयुक्त व चोपण जमिनीत इतर जातींपेक्षा १४ महिन्यांत अधिक उत्पादन.

को.९२००५ (फुले ९२००५) १२८.६९ १४.२१ कोल्हापूर जिल्ह्यात या वाणाचे अपेक्षित उत्पादन मिळते.

एम.एस.१०००१ (फुले १०००१) १३२.८२ १९.३१ लवकर साखर तयार होते, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, क्षारपड जमिनीसाठी योग्य.

को.एम.९०५७ (फुले ९०५७) १३०.०५ १७.६१

गूळ गुळाचे उत्पादन अधिक मिळते. साखर उतारा चांगला. उसाचे वजन चांगले, फूट कमी असल्याने जवळ लागवड करावी.

फुले ऊस १५०१२ (एमएस १७०८२) १३० १८.७७ अधिक ऊस व साखर उत्पादन, ऊस जाड, न लोळणारा, पाण्याचा ताण सहन करणारा, क्षारयुक्त जमिनीत चांगली वाढ, रसवंतीसाठी उत्तम, लालकुज आणि मररोगास मध्यम प्रतिकारक, खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड व खवले किडीस कमी प्रमाणात बळी पडते, तुरा उशिरा व कमी प्रमाणात येतो.

फुले ऊस १३००७ (एमएस १४०८२) १३० १७.५८ अधिक ऊस व साखर उत्पादन, उत्तम खोडवा, ऊस मध्यम जाड, नागमोडी कांडी, क्षारपड व चोपण जमिनीत चांगला वाढतो, पाण्याचा ताण सहन करणारा, लालकूज व चाबूक काणीस प्रतिकारक, शेंडे किडीस कमी प्रमाणात बळी पडते, तुरा तुरळक व कमी प्रमाणात येतो.

फुले ऊस १५००६ (एमएस १६०८१) १३५ १८.९४ अधिक ऊस आणि साखर उत्पादन, जाड व उंच वाढणारा, न लोळणारा, पानाच्या देठावर कूस नाही, पाचट सहज निघते, काणी व पिवळ्या पानाच्या रोगास प्रतिकारक, खोडकीड, कांडी कीड, शेंडेकीड व खवले किडीस मध्यम प्रतिकारक्षम, काणी व पिवळ्या पानाच्या रोगास प्रतिकारक.

अन्नद्रव्ये आणि रासायनिक खतमात्रा (किलो प्रति हेक्टरी)

खतमात्रा

देण्याची वेळ अन्नद्रव्ये (किलो/ हे.) सरळ खते (किलो/ हे.)

(शिफारस १) मिश्रखते (किलो/ हे.) (शिफारस २)

नत्र स्फुरद पालाश युरिया सिं.सु.फॉ. म्यु.ऑ.पो. युरिया १०ः२६ः२६

लागणीच्या वेळी २५ ६० ६० ५४ ३७५ १०० ४ २३१

लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी १०० -- -- २१७ -- -- २१७ --

लागणीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी २५ -- -- ५४ -- -- ५४ --

मोठ्या बांधणीच्या वेळी १०० ५५ ५५ २१७ ३४४ ९१ १७१ २१२

एकूण २५० ११५ ११५ ५४३ ७१९ १९१ ४४६ ४४३

- डॉ. राजेंद्र भिलारे, ९८२२०७२४२८

(ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com