
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : जिल्ह्यात यंदा नवीन लागवड असलेल्या केळीच्या पिकावर सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे झाडाची पाने वाळत चालली आहेत. पिकाची वाढ खुंटण्याची व इतर नुकसानाची शक्यता निर्माण होत आहे. प्रामुख्याने बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात लागवड असलेल्या बऱ्याच केळी बागांमध्ये हा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
गेले वर्षभर केळीला चांगला दर मिळाल्याने सिंचनाची सुविधा असलेले अनेक शेतकरी यंदा केळीच्या लागवडीकडे वळाले आहेत. काही लागवड ऑगस्टमध्ये झालेली आहे. या लागवडी आता चार महिन्यांच्या झाल्या आहेत. रोपांची निकोप वाढ सुरू असतानाच मागील १५ ते २० दिवसांत वातावरणात बरेच बदल झाले.
सुरुवातीला कडाक्याची थंडी, नंतर पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुकेही पडले. यामुळे बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाला पोषक वातावरण मिळाले. परिणामी करप्याचा प्रादुर्भाव दिसून आला. केळीसोबतच कांदा बीजोत्पादन, लिंबू बागांमध्ये अशा प्रकाराची लक्षणे दिसून येत आहेत. कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वाढू लागली आहे.
मी तीन एकरांत केळीची ऑगस्टमध्ये पेरणी केली आहे. रोपे जोमाने वाढू लागलेले असताना पानांवर आता करपा वाढत आहे. मागील काही कडक्याची थंडी आणि आता धुके यामुळे हा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.
- ज्ञानेश्वर ढोरे, शेतकरी, महागाव, जि. बार्शीटाकळी
वातावरणातील बदलांमुळे केळी, कांदा, लिंबू अशा विविध पिकांना करपा व बुरशीजन्य रोग आढळून येत आहेत. या रोगाची सुरुवात खालच्या पानावरून होते. सुरुवातीला ठिपके लहान, लांबट फिक्कट पिवळे दिसतात. सध्या तापमान कमी होऊन धुके पडल्यामुळे रोगाचा प्रसार होत आहे. यासाठी बुरशीनाशकाचा वापर केल्यास रोगाचे प्रभावी नियंत्रण करता येते. त्यासाठी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- गजानन तुपकर, विषय विशेषज्ज्ञ, उद्यानविद्या, केव्हीके
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.