Jowar Production : रब्बी ज्वारीच्या उत्पादनात घट होईल का?

बागायती भागात ऊस आणि फळबागा वाढल्यामुळे रब्बी ज्वारीच्या पिकावर भलताच परिणाम होतोय. परतीच्या पावसामुळे रब्बी ज्वारीची लागवड उशीरा झाली. त्यात आता शेतकऱ्यांना एक वेगळीच समस्या भेडसावू लागलीय.
Jowar Rate
Jowar RateAgrowon

कापूस उत्पादक शेतकरी सीएआयवर नाराज

१. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीएआयसारख्या संस्था कापूस निर्यात घटण्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडत आहेत. देशात यंदा ३४४ लाख गाठी कापूस उत्पादन होणार असून गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन १२ टक्के अधिक राहील, असा अंदाज सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी नुकताच व्यक्त केला. शेतकरी अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षेने माल साठवून ठेवत असल्याचं निर्यात खोळंबल्याचं त्यांचं मत आहे. परंतु देशात पाऊस, रोगराई, गुलाबी बोंडअळी यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असतानाही सीएआय उत्पादनवाढीचा अंदाज कसा काय जाहीर करतंय, अशी संतप्त भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय. याआधीही सीएआयचे कापूस उत्पादनवाढीचे अंदाज सपशेल चुकले आहेत; कापसाचे भाव पाडण्यासाठी सीएआय प्रयत्न करत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

Jowar Rate
Tur Market: आयात वाढली तरी तुरीतील तेजी कायम राहणार?

तूर आणि हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव

२. तूर हे खरिपातलं महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. तर हरभरा हे रब्बीतलं. या दोन्ही पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परतीचा पाऊस लांबल्याने यंदा रब्बीत हरभरा लागवडीला उशीर झाला. सध्या पीक रोपावस्थेत आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी विशेषतः विदर्भातील काही भागात पीकवाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय. तीच स्थिती तुरीची मराठवाड्याच्या काही भागात आहे. तूर पीक सध्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच फुले लागण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येते, असे तज्ज्ञांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मर रोग व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असा त्यांचा सल्ला आहे.

टोमॅटोच्या दरात घसरण

३. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे भाव घसरले आहेत. जुलैमध्ये पावसामुळे आवक कमी झाली होती. त्यावेळी चढे भाव असल्यामुळे टोमॅटो चर्चेत होता. त्यावेळी एक किलो टोमॅटो बाजारात ६० ते ८० रूपये भावाने विकला जात होता. आता आवक वाढल्यामुळे चित्र उलटे झाले आहे. बाजारसमित्यांमध्ये १० किलो टोमॅटोच्या क्रेटला ६० ते १०० रूपये दर मिळतोय. म्हणजे प्रति किलो ६ ते १० रूपये भाव शेतकऱ्यांना मिळतोय. या भावातून ट्रान्सपोर्टचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत.

Jowar Rate
Chana Wilt : हरभऱ्याला बसतोय मर रोगाचा फटका

हरभऱ्याच्या दराची किल्ली नाफेडच्या हाती

४. हरभऱ्याचे दर वाढतील की कमीच राहतील, याची किल्ली नाफेडच्या हातात आहे. नाफेड ही सरकारी एजन्सी असून शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्याचे काम करते. सध्या देशातील प्रमुख बाजारपेठांत हरभऱ्याचे दर वाढले आहेत. चालू रब्बी हंगामात कडधान्यांचा पेरा कमी असल्याने भाव चढे राहायला पाहिजेत. परंतु नाफेडकडे २५ लाख टनाच्या आसपास हरभऱ्याचा साठा आहे. त्यातील १५ लाख टन हरभरा विकून साठा १० लाख टनापर्यंत नेण्याचा नाफेडचा इरादा असल्याचं सांगितलं जातंय. नाफेडने हरभरा विक्रीचा सपाटा लावला आहे. परंतु आधी सप्टेंबरमध्ये आणि नंतर १६ नोव्हेंबरला नाफेडने चक्क हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकला. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल ५३३५ रूपये आहे. परंतु नाफेडने १६ नोव्हेंबरला महाराष्ट्रात ४६०१ ते ४६०३ रूपये, मध्य प्रदेशात ४५५१ रूपये, कर्नाटकात ४७०१ ते ४७०३ रूपये दराने हरभऱ्याची विक्री केली. नाफेडच्या या धोरणामुळे किमतीवर दबाव येत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये हरभरा भावात सुधारणा झाली तरी हमीभावापेक्षा दर फार वर जाणार नाहीत. परंतु हरभऱ्यात फार मोठी मंदीही येण्याची शक्यता नाही. दर ४,७०० ते ४,७५० रूपयांच्या खाली घसरणार नाहीत, असा जाणकारांचा अंदाज आहे.

रब्बी ज्वारीच्या उत्पादनात घट होईल का?

५. यंदा राज्यात रब्बी ज्वारीचं उत्पादन (Rabi Jowar Production) घटण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यंदा परतीचा पाऊस लांबला. अनेक ठिकाणी २३ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरूच होता. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत ज्वारी पेरायला (Jowar Sowing) उशीर झाला. काही भागांत मात्र ज्वारीची वेळेत पेरणी झाली. पावसाच्या तडाख्यातून पीक वाचलं. परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता एक वेगळीच डोकेदुखी सतावू लागलीय. ही ज्वारी आता फुलोऱ्यात आलीय. ज्वारीच्या पिकासाठी ही संवेदनशील अवस्था असते. या काळात अवकाळी पाऊस झाला किंवा हवामानात मोठा बदल झाला तर सगळं मुसळ केरात जातं. पण यंदा वेगळाच ताप झालाय शेतकऱ्यांना. एरवी डिसेंबरच्या मध्यापर्यंत ज्वारीचं पीक राखणीला येतं. शेतकरी गोफणगुंडा वापरून किंवा फटाके, चित्र-विचित्र आवाज करून, ज्वारीचे दाणे खाण्यासाठी आलेल्या पाखरांना हुसकावून लावतात. पण यंदा मात्र पीक फुलोऱ्यात असतानाच पाखरांनी पिकावर हल्लाबोल केलाय.

पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत हे चित्र सध्या दिसतंय. फुलोऱ्यातल्या पिकाचाच पक्ष्यांकडून फडशा पडला तर उत्पादन घटणार. हुरड्यासाठी तरी ज्वारीची कणसं मिळतील का, अशी सध्या अवस्था आहे. कारण हुरड्याला येण्यापूर्वीच पाखरांमुळे कणसं रिकामी होऊ लागलीत. त्यामुळे यंदा हुरड्या पार्ट्यांची रंगत फिकी पडण्याची चिन्हे आहेत. या सगळ्याला कारणीभूत आहे ती बदललेली पीकपध्दती. बागायती भागात ऊस आणि फळबागांचं क्षेत्र वाढलंय. जिथं इतर पिकं शेतात नाहीत, तिथं पाखरांना खाण्यासाठी शेतात दुसरं काही शिल्लकच नाही. त्यामुळे या पाखरांनी फुलोऱ्यातल्या ज्वारीवरच आक्रमण केलंय. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित त्यामुळे बिघडण्याची शक्यता आहे. सध्या शहरी ग्राहकांमध्ये ज्वारीचं आकर्षण वाढू लागलंय. लोक आरोग्याबद्दल जागरूक झालेत. रब्बी ज्वारी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीची मागणी आणि किंमती वाढू लागल्या आहेत. अशा स्थितीत उत्पादन घटलं तर शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा घेता येणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com