
आंतरराष्ट्रीय बाजारात गहू, मक्याचे वायदे सुधारले
आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या दरात मागील काही आठवड्यांत मोठी घट पाहायला मिळाली होती. रशिया आणि युक्रेनमधून गव्हाचा पुरवठा सुरु झाला. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढला. त्यामुळं दर नरमले होते. पण सोमवारी गव्हाच्या वायद्यांत सुधारणा पाहायला मिळाली. सोमवारी गव्हाचे वायदे अडिच टक्क्यांनी तर मक्याचे वायदे एक टक्क्याने सुधारले होते. गव्हाचे वायदे ७.७९ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. तर मक्याचे वायदे ५.७० डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. या दरवाढीचा बाजारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.
जागतिक हरभरा उत्पादनवाढीचा अंदाज
जगात हरभरा उत्पादनात भारत अग्रेसर आहे. तसेच भारतात वापरही अधिक होतो. भारतात यंदा हरभरा उत्पादन वाढले. सरकारच्या मते यंदा १३१ लाख टन हरभरा उत्पादन झालं. भारतात बंपर उत्पादन झाल्यानं जागतिक उत्पादनही विक्रमी राहिल, असा अंदाज इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशन अर्थात आयपीजीएनं व्यक्त केलाय. आयपीजीएच्या मते यंदा जगातिक हरभरा उत्पादन १८० लाख टनांच्या दरम्यान राहील. महत्वाच्या उत्पादक देशांमध्ये उत्पादकता वाढल्याचा हा परिणाम असल्याचं आयपीजीएचं म्हणणं आहे. मात्र उत्पादनाबरोबरच वापरही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दराला आधार मिळू शकतो.
जगात ज्वारीचा वापर वाढण्याची शक्यता
जगात अलिकडच्या काळात पुन्हा ज्वारीचा वापर आहारात वाढतोय. ज्वारीला मानवी आहार, पशुखाद्य आणि इतर वापरासाठी मागणी असते. कोरोनानंतर पोषक आहार म्हणून जेवणात गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीच्या भाकरीला पसंती मिळतेय. त्यामुळे जगात ज्वारीलाही मागणी वाढतेय. यंदा जगात ज्वारीचा वापर वाढण्याची शक्यता आहे. २०२२-२३ च्या हंगामात मानवी आहारात २७० लाख टन ज्वारीचा वापर होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ग्रेन्स काऊंसीलनं व्यक्त केलाय. मागील हंगामात २२० लाख टन ज्वारीचा वापर झाला होता. तर पशुखाद्य आणि इतर वापर स्थिर राहण्याची शक्यता आहे. जगात ज्वारीचा वापर वाढण्याची शक्यता असल्यानं दरही वाढू शकतात, असं जाणकारांनी सांगितलंय.
अमेरिकेतील मक्याचा साठा यंदाही स्थिर राहणार
रशिया- युक्रेन युद्धामुळे मक्याचाही पुरवठा कमी झाला होता. त्यातच जागतिक पातळीवर मक्याचा इथेनाॅलसाठी वापर वाढतोय. परिणामी मक्याचे दर तेजीत आहेत. जगातिक मका निर्यातीत अमेरिकेचा मोठा वाटा आहे. त्यानंतर ब्राझील आणि अर्जेंटीनाचा नंबर लागतो. २०२२-२३ च्या हंगामात अमेरिकेतील मक्याचा साठा स्थिर राहील. अमेरिकेत मक्याचा ३८० लाख टनांचा साठा राहील, असं आंतरराष्ट्रीय ग्रेन्स काऊंसीलनं म्हटलंय. तर ब्राझीलमध्ये ८० लाख टन आणि अर्जेंटीनात २० लाख टन आणि युक्रेनमध्ये १०० लाख टन मक्याचा साठा राहील, असा अंदाजही आंतरराष्ट्रीय ग्रेन्स काऊंसीलनं व्यक्त केलाय. चालू हंगामात मक्याचा वापर मात्र वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसत असून दर तेजीत आले आहेत.
केळी का मिळतोय उच्चांकी दर?
देशात केळी लागवडीत (Maharashtra In Banana Cultivation) महाराष्ट्र महत्वाचं राज्य आहे. केळीची लागवड (Banana Cultivation) आता जळगाव आणि नांदेड जिल्ह्याव्यतिरिक्त इतरही जिल्ह्यांमध्ये वाढतेय. मात्र केळी पिकाला अतिपाऊस (Heavy Rain), दुष्काळ (Drought) अशा अनेक नैसर्गिक संकटांचा (Natural Calamity) फटका बसतोय. या संकटातून केळी पीक (Banana Crop) वाचले तरी दराचा प्रश्न मात्र कायम असतो. तसचं राज्यात केळीचा एकच दर निश्चित नसतो. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांत विविध दर असतो. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यामुळं केळी दराचा प्रश्न सतत उपस्थित होतो. मात्र सध्या केळीचा दर उच्चांकी पातळीवर पोचलाय.
यंदाच्या उन्हाळ्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात १२२ वर्षांतील उच्चांकी तापमान होतं. त्यामुळं केळी बागांना मोठा फटका बसला. अनेक बागा सुकून गेल्या. तसचं बहुतेक ठिकाणी पिकाची उंची खुंटली. त्यानंतर विविध प्रकारच्या कीड-रोगांचा प्रादुर्भावही झाला. परिणामी चालू हंगामात केळीचं उत्पादन घटलं. त्यामुळं दरात मोठी वाढ झाल्याचं जाणकारांनी सांगितलं. पुरवठा कमी होत असल्यानं उत्तर भारतातील बाजारात कमाल दराने प्रती क्विंटल २५०० रुपयांचा पल्ला गाठलाय. सर्वसाधारण भाव २ हजार ते २१०० रुपये मिळतोय. केळी कापणीचा हंगाम मे आणि जून महिन्यात सुरू झाला. मे महिन्यात केळीला सर्वसाधारण १६०० ते १७०० रुपये दर मिळाला. तर जूनमध्ये १८०० ते २००० रुपये आणि सध्या २००० ते २५०० रुपये क्विंटल भाव मिळतोय. स्थानिक बाजारात २००० ते २१०० रुपयाने केळीचे व्यवहार होत आहेत. ही तेजी आणखी काही दिवस राहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.