
गहू हे आपल्या रोजच्या आहारातील धान्य. गव्हाची पोळी किंवा चपाती शिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे. गहू खरेदी करताना सामान्यतः सोनेरी, वजनदार गव्हाला पसंती दिली जाते. मात्र सध्या काळा गहू चर्चेत आहे. तुम्ही म्हणाल, खपली गहू, जोड गहू तर माहिती आहेत पण काळा गहू (Black Wheat) ही काय भानगड आहे ? पंजाबमधील मोहाली येथील राष्ट्रीय कृषी अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेने (नाबी) काळ्या गव्हाचे वाण विकसित केले आहे. विद्यापीठाने या गव्हाचे पेटंट देखील मिळवले आहे.
काय आहेत काळ्या गव्हाची वैशिष्ट्ये?
काळा गहू बहुगुणी असून कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींमध्ये उपयुक्त आहे. याशिवाय काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिड असतात, त्यामुळे या गव्हाचे पोषणमूल्य अधिक आहे. समृद्ध पौष्टिक व सकस आहारात त्याचा समावेश करता येईल. अॅन्थोसायनीन (१४० पीपीएम) या घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा गहू काळा असतो. अॅन्थोसायनीन हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आहे. ब्लूबेरी, जांभूळ या फळांमध्ये अॅन्थोसायनीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे या फळांचा रंग काळपट जांभळा असतो. अॅन्थोसायनीनमुळे फळांची पौष्टीकता वाढते. परंतु जांभूळ आणि ब्लूबेरी वर्षभर उपलब्ध नसतात. काळ्या गव्हामुळे ही पौष्टीकतत्वे रोजच्या आहारातून अगदी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात.
कोणते पदार्थ बनवता येतील ?
चपाती, पराठा, पुरी, नान या सारख्या रोजच्या जेवणातल्या पदार्थाशिवाय बिस्कीट, केक, पिझ्झा बेस, नुडल्स, बर्गर यासारखे पदार्थही काळ्या गव्हापासून बनवता येतात. त्यामुळे लहान मुले आणि प्रौढांच्या आहारात काळ्या गव्हाचा समावेश करणे अगदी सहज शक्य आहे,
सात वर्षांच्या संशोधनानंतर विकसित
राष्ट्रीय कृषी अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेत २०१७ मध्ये काळ्या गव्हाचे संशोधन झाले. जवळपास सात वर्षांच्या संशोधनानंतर काळ्या गव्हाचे वाण विकसित करण्यात आले या गव्हाला ‘नबी एमजी’ (NABI MG) असे नाव देण्यात आले आहे. हा गहू काळा, निळा आणि जांभळ्या रंगात उपलब्ध आहे. सामान्य गव्हापेक्षा तो खूपच पौष्टिक आहे. हा काळा गहू जनुकीय सुधारणा (जीएम) केलेला नाही. तर जपानमधील जास्त उत्पादनक्षम आणि विविध रोगांसाठी प्रतिकारक असणाऱ्या पीबीडल्बू ६२१ या वाणाच्या गव्हातील जर्मप्लाझमशी संकर करून काळ्या गव्हाचे वाण विकसित करण्यात आले आहे.
कुठे झाले लागवडीचे प्रयोग?
उत्तरेकडील राज्यामध्ये प्रायोगीक तत्वावर काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. बिहार राज्यातील नौबतपूर येथील सोना गावात प्रथमच काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली. अलीकडे महाराष्ट्रातही विदर्भ आणि सातारा जिल्ह्यामध्ये काळ्या गव्हाची लागवड केली गेली. काळ्या गव्हाचे गुण लक्षात घेतले तर येणाऱ्या काळात गहू खाणा-यांनाही आणि पिकवणा-यांनाही फायद्याचा ठरु शकतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.