.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Market Bulletin :
गव्हाचे दर तेजीतच
देशात गव्हाचा पुरवठा कमी असल्याने सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असूनही गव्हाच्या भावात मागील महिनाभरात ३ टक्क्यांची वाढ झाली. गव्हाचा भाव देशभरात सरासरी ३२०० ते ३३०० रुपयांवर पोचला.
गव्हाची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर भाव कमी होतील. पण चांगल्या मालाचे भाव हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता धुसर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल. तसेच बाजारातील पाईपलाईनही रिकामी आहे. म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणीही चांगली राहील. याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो.
हरभरा दर टिकून
हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली. हरभरा बाजारात हमीभावाच्या आसपास विकला जात आहे. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याची एन्ट्री झाली. आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर १५ दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल. त्यावेळी हरभरा भाव हमीभावाच्या खाली जाऊ शकतात. पण सरकारही यंदा खरेदीत उतरणार आहे. त्यामुळे हरभरा बाजारालाही आधार असेल, असे अभ्यासकांनी सांगितले.
कांद्याचे भाव टिकून
देशातील बाजारात कांद्याचा भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहे. बाजारातील कांदा आवक स्थिर असल्याने कांद्याच्या भावावरील दबाव काहीसा कमी झाला. कांद्याला उठावही चांगला मिळत आहे.
त्यामुळे कांद्याचा सरासरी बाजारभाव १७०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. कांद्याच्या बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहील. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार कायम आहेत. भाव एका पातळीच्या बाहेर पडताना दिसत नाहीत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३०३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे.
सोयाबीनचा भाव एकाच पातळीदरम्यान दिसत आहे. बाजारातील आवक काहीशी कमी दिसत असली तरी दरावर त्याचा परिणाम दिसत नाही. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३५० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस स्थिरावला
कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. त्यामुळे कापसाचे बाजारभावही स्थिर दिसत आहे. कापसाची बाजारातील आवक रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान आहे. तर उद्योगांची खरेदी गरजेपुरती सुरु आहे. सीसीआयला सध्याही चांगला कापूस मिळत आहे. सध्याही कापूस दर हमीभावाच्या खालीच आहेत.
कापसाला आजही सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मार्चपासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सधारणाही होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.