
Pune News: गहू आणि तांदूळ उत्पादनाच्या चक्रात अडकलेल्या पंजाबमध्ये फलोत्पादन क्रांतीही घडत आहे. पंजाबमध्ये मागील १० वर्षात फळबागांची लागवड तब्बल दीडपटीने वाढली आहे. विशेष म्हणजे अपुऱ्या मनुष्यबळावर पंजाबच्या फलोत्पादन विभागाने शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळवण्यात यश मिळवले आहे.
पंजाबमध्ये मागील काही वर्षांपासून पीक पध्दतीत बदल करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पंजाबच्या फलोत्पादन विभागाने मागील १० वर्षांपासून शेतकऱ्यांना फलोत्पादन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यामुळे २०११-१२ ते २०२३-२४ या दशकात पंजाबमधील फलोत्पादन लागवडीत तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली. फळबागांखालील लागवड क्षेत्र ६ लाख ८८ लाख एकरवरून ११ लाख ९१ हजार एकरवर पोचले आहे. विशेष म्हणजे फलोत्पादन विभागाने ही कामगिरी २५ टक्के मनुष्यबळावर साध्य केल्याची चर्चा आहे.
पंजाबमध्ये फळबागांची लागवड वाढत असली तरी आजही एकूण क्षेत्रात फळबाग लागवडीचे प्रमाण कमीच आहे. पंजाबमध्ये एकूण ७८ लाख २६ हजार हेक्टर शेतजमिन आहे. त्यापैकी केवळ ६.१६ टक्के क्षेत्रावर फळबागा आहेत. आजही गहू आणि तांदूळ पिकांचे वर्चस्व पंजाबमध्ये कायम आहे. पंजाबमध्ये किन्नो, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा, लिची, पेरू, पिअर, द्राक्ष, बोर, आवळा, केळी ही फळपिके घेतली जात आहे. तर बटाटा, कांदा, लसूण, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लाॅवर, मिरची, वाटाणा, टरबूज, खरबूज, गाजर, मुळा आदी पिकांचेही क्षेत्र वाढत आहे.
उत्पादनात चांगली वाढ
पंजाबमध्ये फलोत्पादनात चांगली वाढ झाली आहे. फलोत्पादन ५२ लाख टनांवरून ९५ लाख टनांपर्यंत वाढले. तर २०२३-२४ मध्ये फलोत्पादनाचे मूल्य २०११-१२ च्या तुलनेत ४ पटीने वाढले होते. २०११-१२ मध्ये पंजाबमधील फलोत्पादनाचे मूल्य ६ हजार २६७ कोटी रुपये होते, ते २०२३-२४ मध्ये २६ हजार ५८० कोटींवर पोचले होते. पंजाबच्या एकूण शेतीच्या जीडीपीत १७ टक्के वाटा फलोत्पादनचा होता.
पीक बदलामध्ये यश
पंजाबमध्ये गहू आणि भात ही मुख्य पिके घेतली जातात. पण या दोन्ही पिकांना पाणी जास्त लागते. तसेच खतांचा वापरही बेसुमार केला जातो. त्यामुळे पीक पध्दतीत बदल करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पण या पिकांना पर्याय देण्यात सरकारला यश आले नाही. पण आता शेतकऱ्यांचा फलोत्पादनाकडे कल पाहून पंजाब सरकार फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.