
सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई आल्यानंतर आज सुधारणा दिसून आली. सोयापेंडच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत १० डाॅलरचा टप्पा पार केला होता. तर सोयापेंडही ३१४ डाॅलरवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. मात्र देशात भाव किमान पातळीवर स्थिर दिसत आहेत. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दबावातच
देशातील बाजारात कापसाची आवक शिगेला पोचलेली आहे. त्याचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आलेली नाही. कापसाचा भाव आजही ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज शुक्रवारच्या तुलनेत दरात सुधारणा दिसून आली. आज दुपारपर्यंत दरपातळी ६८.२७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होती. शुक्रवारच्या तुलनेत भावपातळी जवळपास एक टक्क्याने अधिक होती. जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरपातळीही स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
केळीच्या भावात घसरण
नव्या केळीची राज्यात काढणी सुरु झाल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात केळीची काढणी सुरु झाली. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव दिसून येत आहे. दुसरीकडे थंडीमुळे केळीला उठावरही चांगला असल्याचे व्यापारी सांगत आहेत. असे असूनही आवकेमुळे दरावर दबाव दिसून आला. महत्वाच्या केळी बाजारांमध्ये सध्या १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान केळी विकली जात आहे. पुढील काही आठवडे बाजारातील केळी आवक कायम राहील, असा अंदाज आहे.
लसूण तेजीतच
देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे. लसणाची आवक वाढायला आणखी वेळ लागेल, असे व्यापारी सांगत आहेत. दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे. बाजारातील मर्यादीत आवक आणि चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे. आजही देशातील बाजारात लसणाला सरासरी २५ हजार ते २८ हजार रुपयांचा भाव मिळाला. गुणवत्तापूर्ण लसणाचा भाव २८ हजारांच्या पुढे दिसत आहे. बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
गहू दरात सुधारणा
देशातील बाजारात गव्हाची आवक कमीच आहे. दुसरीकडे यंदा सरकारने गहू उत्पादनात वाढीचा अंदाज दिला तरी याबाबत बाजाराच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे बाजाराला आधार मिळत आहे.
सरकारने स्टाॅकमधील गहू विकल्यानंतर आठवडाभरातच पुन्हा गव्हाचे भाव वाढायला सुरुवात झाली होती. आज बाजारात गहू २८०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला गेला. नवा माल बाजारात येईपर्यंत गव्हाची टंचाई कायम राहणार आहे. त्यामुळे दरातही चढ उतार राहतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.