Agrowon Podcast : सोयाबीनचे भावात चढ उतार

Market Bulletin : सध्या कापूस आणि सोयाबीनसह महत्वाच्या शेतीमाल बाजारात चढ उतार सुरु आहेत. माल विकताना आपल्याला मालाला नेमका काय भाव मिळतोय? भावावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Market Bulletin
Market BulletinAgrowon
Published on
Updated on

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीनसह महत्वाच्या शेतीमाल बाजारात चढ उतार सुरु आहेत. माल विकताना आपल्याला मालाला नेमका काय भाव मिळतोय? भावावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

सर्वात आधी आपण सोयाबीन बाजारात आज काय स्थिती होती ते पाहू… सोयाबीनच्या भावात आज राज्यात आणि देशात क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये घट झाली होती. देशात केवळ बाजार समित्याच नाही तर प्रक्रिया प्लांट्सचे भावही आज काहिसे नरमले होते. सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५५० रुपयांचा भाव मिळाला होता. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. राज्यात सध्या शेतकरी जागेवरून सोयाबीन विक्रीला प्राधान्य देत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई आणि देशातील उद्योगांची सावध खरेदी यामुळे सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई आली, असे अभ्यासकांनी सांगितले. 

Market Bulletin
Agrowon Podcast : सोयाबीन, कापसाचे भाव काय राहिले?

कापसाच्या भावातही आज काहिशी नरमाई आली होती. कापसाचे भाव आज क्विंटलमागं किंचित कमी झाले होते. बाजारातील कापसाची आवक आता वाढत आहे. आज दुपारपर्यंत वायद्यांमध्ये कापसाचे भाव खंडीमागे ४८० रुपयांनी कमी झाले होते. कापूस वायदे ५८ हजार २२० रुपयांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे कमी झाले होते. बाजारातील कापूस आवकेनुसार दरात सध्या चढ उतार सुरु आहेत. बाजार समित्यांमधील भाव आजही ६ हजार ८०० ते ७ हजार २५० रुपयांच्या दरम्यान होते. सध्या शेतकरी हाती आलेला कापूस लगेच विकत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर काही शेतकरी यंदाही चांगल्या भावाच्या अपेक्षेने थांबू शकतात. पण हे प्रमाण कमी दिसते. यंदा देशातील कापूस उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे कापसाच्या भावात पुढील काळात वाढ होण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

Market Bulletin
Agrowon Podcast : हळदीचे उत्पादन यंदा वाढेल का?

कांद्याचे भाव आज काहीशी सुधारले होते. बाजारात कांदा आवकही गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहिशी अधिक दिसते. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क काढले. पण कांद्याचे किमान निर्यातमूल्य दप्पट करून ८०० डाॅलर प्रतिटन केले. तसं पाहिलं तर ४० टक्के निर्यातशुल्क काढल्याचा कोणताही फायदा कांदा निर्यातीला होणार नाही. कारण किमान निर्यात मुल्यात वाढ केली आहे. शुल्क होते तेव्हाची स्थिती आणि किमान निर्यात मुल्यात वाढ केल्यानंतरची स्थिती सारखीच आहे. यामुळे कांदा निर्यातील प्रोत्साहन मिळणार नाही. आजही बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. सध्या देशात कांद्याचा पुरवठा कमी आहे. तसेच पुढील दीड ते दोन महिने कांद्याची टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भावही तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीच्या भावात मागील आठवड्यापासून आणखी वाढ झाल्याचे दिसते. तुरीचे भाव मागील दोन महिने काहीसे कमी होऊन स्थिरावले होते. पण दिवाळी आणि दसऱ्यामुळे तुरीला मागणी वाढण्याचा अंदाज होता. त्यानुसार तुरीला उठाव वाढला. यामुळे तुरीच्या भावातही किमान एक हजार रुपयांची वाढ झाली. सध्या देशातील बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १२ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारात सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीच्या भावात चांगलीच वाढ झाली. सरकार तुरीची आयात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण भारतात भाव वाढल्याने निर्यातदार देशही तुरीची निर्यात मर्यादीत स्वरुपात करत आहेत. निर्यातदार देशांनाही चांगल्या भावाची अपेक्षा आहेच. त्यामुळे तुरीचे भाव देशातील बाजारात तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हिरव्या मिरचीला चांगलाच उठाव मिळत आहे. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. हिरव्या मिरचीला मात्र बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे दर तेजीत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. मिरची पिकाला अनेक भागात पाण्याची टंचाई भासत आहे. तर नव्या लागवडीही पाण्याअभावी रेंगाळल्या आहेत. नव्या लागवडी मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीची बाजारातील आवक मर्यादीतच राहून भावातील तेजीही टिकून राहू शकते, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com